धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : लहानपणी इवल्याशा पायांनी दुडूदुडू धावणारा आपला मुलगा समाजात घट्टपणे पाय रोवून समर्थपणे उभा राहावा, अशी इच्छा प्रत्येक पालकांची असते. मात्र नियतीने त्याचे दोन्ही पाय निकामी करून घात केला, अशा विपरीत परिस्थितीत केवळ आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत 73 टक्के गुण मिळवून नेत्रदीपक यश प्राप्त करीत आदर्श ठेवला आहे. अथर्व उमेश बढिये, असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
स्थानिक कोठारीनगरात राहणारा अथर्व बढिये हा लहानपणी सर्वसामान्य मुलांसारखा धावायचा, बागडायचा. मात्र वयाच्या पाचव्या वर्षी खेळता खेळता अचानक अथर्व पडला आणि तेव्हापासून अथर्वचे तोल जाऊन पडणे सुरू झाले. वयाच्या अकराव्या वर्षी स्नायूंच्या विकृतीचा हा आजार इतका बळावला की अथर्व कायमचा दिव्यांग झाला व व्हीलचेअर कायमची त्याच्या नशिबी आली. अशाही परिस्थितीत डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अथर्वने शिक्षणाची जिद्द कायम ठेवत आठवीपर्यंतचे आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.
प्रकृतीचा त्रास वाढत असताना नवव्या वर्गात अचानक अथर्वचे शाळेत जाणेच बंद झाले. मात्र दहावीचे वर्ष हे आयुष्याचा टर्निंग पॉइंट, आता कसं करावं? या विचारानेच अथर्व हैराण व्हायचा. वर्गमित्रांसोबतच शालेय प्रशासनाने सुद्धा अथर्व दहावीच्या परीक्षेला बसू शकेल याची आशाच सोडली होती. मात्र अथर्वची आई संगीता यांनी दिलेल्या प्रेरणेने अथर्वने घरीच अभ्यास सुरू केला.
एकही दिवस शाळेत न जाता संपूर्ण वर्षभर अथर्वने घरीच अभ्यास केला. शैक्षणिक जिद्द पाहून अथर्वची मुंबईची आत्या माधुरी झेले त्याला शिकवण्यासाठी खास धामणगावला आली. मामे बहिण श्रेया पांडे हिला लेखनिक बनवून अथर्वने दहावीचे सर्व पेपर दिले. बुधवारी (ता.29) जाहीर झालेल्या निकालामध्ये अथर्वने तब्बल 73 टक्के गुण प्राप्त करीत देदीप्यमान यश प्राप्त केले. आपल्या यशाचे श्रेय त्याने आईवडील, आत्या आणि बहिणीला दिले असून भविष्यात डॉक्टर होण्याचा मनोदय व्यक्त केला.
संपादन - स्वाती हुद्दार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.