गिरड (जि. वर्धा) : लॉकडाउन संपायला आता दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. लॉकडाउन वाढणार की नाही याचे उत्तर कुणाकडेही नाही. देशातील कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता लॉकडाउन वाढवायलाच पाहीजे अशी स्थिती आहे. मात्र, अनेकांना आता हे पटणार नाही, हेही तितकेच खरं आहे. कारण, लॉकडाउनमुळे नागरिक पार वैतागले आहेत. लॉडाउनमुळेच पायी घरी जाण्यासाठी निघालेल्या इसमाने वाटेतच टोकाचा निर्णय घेतल्याने देशातील काय स्थिती आहे, याचा अंदाज लावता येईल...
लॉकडाउनमुळे अनेक मजूर व नागरिक परराज्यात अडकले आहेत. जवळपास दीड महिन्यांपासून त्यांचे हाल होत आहेत. आहे त्या ठिकाणी योग्य सोय होत नसल्याने कोणत्याही परिस्थितीत घरी जाण्यासाठी नागरिक जिद्द करू लागले आहेत. मात्र, लॉकडाउनमुळे ते शक्य नाही. म्हणून नागरिक पायी घरी जाण्यासाठी निघत आहेत. आठशे-नऊशे किलोमीटर लोक पायी चालत घरी जात आहेत. वाटेत नागरिक व सामाजिक संस्थेकडून खायला-प्यायला मिळत असल्याने त्यांची सोय होत आहे.
वर्धा जिल्ह्याच्या राज्य मार्ग क्रमांक 258 उमरेड-सेवाग्राम मार्गाने नागपूर जिल्ह्यातील सिर्सी गावावरून एक इसम वर्धा जिल्ह्यातील गिरड गावाकडे पायदळ निघाला होता. हा व्यक्ती लांब प्रवास करून थकल्याने झाडाच्या आश्रयात थांबला होता. काही वेळानी गिरड येथील शेतकरी अजय झाडे यांच्या शेतात निंबाच्या झाडाला दुपट्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. झाडाला कुणीतरी अडकल्याचे दिसल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.
गिरड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ठाणेदार महेंद्र सूर्यवंशी हे घटनास्थळी दाखल झाले. इसमाच्या मृतदेहाचा पोलिसांनी पंचनामा करून कोरोनाबाबत संपूर्ण प्राथमिक खबरदारी घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविलेला आहे. उत्तरीय तपासणीच्या वेळी मृतदेहाच्या कोरोना चाचणीसाठी स्वॅप घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याची शक्यता सध्या तरी वर्तविण्यात येत आहे.
कामाच्या शोधात शहरात गेलेले मजूर लॉकडाउनमुळे तिथेच अडकले आहेत. त्यांची योग्य ती सोय होत नसल्याने पायी प्रवास करीत गावाकडे परत येत आहेत. रस्त्यात काही ठिकाणी शासन आणि सामाजिक संस्थेकडून जेवणाची राहण्याची व्यवस्था केली जात असली तरी उन्हात शेकडो किलोमीटरच्या पायपीटीमुळे अनेक मजूर वैतागले आहेत. या इसमाने पायपीटीने वैतागूनच मृत्यूला कवटाळले असावे, अशी चर्चा आहे.
वर्धा जिल्हा सिमेच्या हद्दीत शेतातील निंबाच्या झाडाला 45 ते 50 वयोगटातील इसमाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. 30) उघडकीस आली. मृताची अद्याप ओळख पटली नाही. मृताजवळ बंद मोबाईल आढळून आल्याने पोलिसांना शोध घेण्यासाठी सोईचे झाले आहे. मृताच्या अंगावर तपकिरी रंगाचा चौकडा शर्ट आणि निळसर जीन्स घातलेला आहे.
लॉकडाउन सुरू असतानाही नागरिक पायीच घरी जात आहेत. यासाठी ते वाट्टेल तेवढा प्रवास करायला तयार आहे. कुणी सहाशे तर कुणी आठशे किमीचा प्रवास करून आपले घर आणि गाव गाठत आहे. यामुळेच सरकारने परराज्यात किंवा दुसरीकडे अडकलेल्या मजुरांना घरी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने मजुरांची पायपीट थांबेल आणि अशी घटना आणखी होणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.