यवतमाळ : गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना भारतात दाखल झाला. कोवीड-१९ या विषाणूने वर्ष लोटूनही आपला पिच्छा सोडला नाही. कोरोनाचे ‘गूढ’ अद्याप कायम आहे. कडक संचारबंदी, जनता कर्फ्यू पाळला, तरीही राज्यात कोरोनाची दुसरी लाट जोरात आली आहे. त्यात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. तरीही, सोशल मीडियावर ‘कोरोना नाहीच, मला कोरोना होणार नाही,’ अशा आशयाचे संदेश फिरताना दिसत आहे. कोरोना नाही म्हणणे किंवा मला कोरोना होणार नाही, असे म्हणणे हा भ्रमच मुळी चुकीचा आहे. कोरोना काय आहे हे ज्याला कोवीड-१९ होतो तोच सांगू शकतो. त्यामुळे खोट्या भ्रमात कुणीही राहू नये, हा भ्रम एखाद्याला मरणाच्या दारात नेऊ शकतो, असे मत अभियंता ग्रुपचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रवीण पांडे यांनी व्यक्त केले.
कोरोनावर मात केल्यावर त्यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. कोरोना कसा झाला, उपचार, मोजूनतापून काढलेला तो एक-एक क्षण या विषयावर पांडे यांनी मन मोकळे केले. २८ सप्टेंबरची मध्यरात्र अंगात ताप घेऊनच आली होती. २९ ला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. औषधोपचार सुरू केले. ऑक्सिजनची पातही योग्य असल्याने घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला. दोन ऑक्टोबरला किंचित खोकला वाढला.
सीटी स्कॅनमध्ये स्कोअर पाच म्हणजे माइल्ड प्रादुर्भाव जाणवला. त्याच दिवशी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये स्वत: गाडी चालवत दाखल झालो. पुढील दोन दिवस अगदी सामान्य गेलीत. पाच ऑक्टोबरला ऑक्सिजन लेवल ८७ वर येताच प्रचंड त्रास सुरू झाला. श्वास घेणेही कठीण झाले होते. डॉक्टरांनी काळजी घेत लगेच अतिदक्षता विभागात हलविले. व्हेंटीलेटरवर पुढील पंधरा दिवस काढावे लागले. सर्वकाही बेडवरच अशी दिनचर्या सुरू होती. दरम्यान, रेमडिसिवर व प्लाझ्मा थेरपीमुळे प्रतिसाद आला.
विनामास्क एक मिनिटही राहणे शक्य नव्हते. दरम्यान, मी अतिगंभीर असल्याची माहिती सर्व मित्र परिवारांना कळली. डॉक्टर आणि अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांना फोनाफानी सुरू झाली. माझी ढासळलेली प्रकृती बघून तेथेच भरती असलेले संतोष ढवळे निगेटिव्ह येऊनही तीन दिवस हलले नाहीत. त्यांना खासदार भावना गवळी यांनी सूचना दिल्या होत्या. इकडे उपचार सुरू असताना घरी मुलगा व मुलगी दोघेही पॉझिटिव्ह आले. घरीच विलगीकरणात करण्यात आलेल्या उपचाराने ते बरे झाले होते.
माझा रुग्णशय्येवरचा मुक्काम २६ दिवसांचा झाला. आता मी ऑक्सिजनवर आलो होतो. चाचणी निगेटिव्ह आल्यावर डॉ. भडके यांच्याकडे आठ दिवस उपचार घेतले. दोन महिने ऑक्सिजनवर काढले. सुपर स्पेशालिटीमधील २६ दिवसांत तेथील रुग्ण हेच माझे नातेवाईक झाले होते. तत्कालीन पालकमंत्री संजय राठोड, जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, पीपीई किट घालून अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळेंसह भेट देऊन गेले. जिल्हा प्रमुख पराग पिंगळे प्रकृतीची अपडेट घेत होत.
नागमंदिर ग्रुपच्या सर्व मित्रांनी बाहेरून औषध पुरवठा व कुटुंबांची काळजी घेत दोन्ही जबाबदार्या सांभाळल्या. डॉ. गिरीश जतकर, डॉ. अमोल देशपांडे, डॉ. अनिकेत भडके, डॉ. पद्मावार, तसेच सुश्रृषा करणारे श्याम बनसोड, शुभम, रवी जाधव, विकास क्षीरसागर, अभियंता ग्रुपचे अभिजित दाभाडकर यांनी दिलेली सेवा कायम ऋणातच ठेवणारी आहे. काही जण कोरोना नाही म्हणतात, त्यांना कसे समजावे हेच कळत नाही. ज्याला कोरोना होतो त्यालाच त्याचे भयंकर रूप कळते. शासकीय रुग्णालय म्हटले की, नाक मुरडनारे कमी नाहीत.
यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर बोट ठेवता येईल, अशी एकही गोष्ट माझ्या निदर्शनास आली नाही. नियमित दोन, तीन वेळा सॅनिटायझेशन, उच्च प्रतीचा आहार, स्च्छता तर तोंडात बोटे टाकायला लावणारी होती. थोड्या किरकोळ अडचणी कर्मचार्यांच्या समर्पीत भावनेमुळे दुर्लक्ष करायला भाग पाडणार्या होत्या. डॉक्टरांसह कर्मचार्यांच्या पीपीई किटमधून टपटप घाम पडत असल्याचे मी स्वत: बघितले आहे. तासनतास किट घालून रुग्णांची सेवा करणे, खाणे, पिणे बंद.
आपला व कुटुंबाचा जीव धोक्यात टाकून काम करणार्या ‘मेडिकल’च्या कोविड योद्ध्यांना त्रिवार सलाम करावा, असेच त्यांचे कार्य आहे. कोरोनातून बरे झाल्यावर कमजोरी येणे हे सामान्य आहेच. पण जे रुग्ण अतिगंभीर होतात, त्यांच्यात कोरोनातून बरे झाल्यानंतर दिसणारे परिणाम पाच ते सहा महिने कायम राहतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोना शारीरिकसोबत मानसिक आघातही करतो. फार हिंमत व धीराने काम घ्यावे लागते. त्यामुळेच या विषाणूला ‘गुढ’ म्हणावे लागते.
तर बेड व ऑक्सिजन मिळणेही कठीण जाईल
सर्वांनाच पुन्हा लॉकडाउन नको आहे. मात्र, त्याचा प्रभाव आपण बेफिकरीने वागून वाढवित आहोत. कोणतेही शासन व यंत्रणा हे थोपवू शकणार नाही. ते आपल्याला आरोग्य सुुविधा पुरवतील इतकेच. कोरोनाचा संसर्ग हा हा आपल्यालाच आटोक्यात आणायचा आहे. दुसरी लाट आपण सांभाळू शकलो नाही तर, बेड व ऑक्सिजन मिळणेही कठीण जाईल. त्यासाठी लसीकरण करून सुरक्षित होणे हाच पर्याय आहे.
- प्रवीण पांडे
अध्यक्ष, अभियंता ग्रुप, यवतमाळ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.