दिग्रस (जि. यवतमाळ) : एका शिक्षकाने आवड म्हणून काही कोंबड्या पाळल्या. पण, लॉकडाउन काळात संकट आले आणि याच काळात आवडीचे रुपांतर व्यवसायात झाले. त्यांनी परसबागेतच कुक्कुटपालन सुरू केले असून ते महिन्याला पाच ते सात हजारांचा नफा मिळवित आहेत.
शेतकऱ्यांना जोडधंदा करण्यासाठी नेहमी प्रेरित केले जाते. काळाची गरज ओळखून शेतकरीच नव्हे तर सर्वांनीच जोडधंदा सुरू करून आपले उत्पन्न निश्चित करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाच्या संकटकाळात तर भरवशाचा जोडधंदा असेल तरच माणूस जगू शकतो आणि अशा विपरीत परिस्थितीत तग धरू शकतो, हा सर्वांचाच अनुभव आहे. मडावी यांच्या छंदाने आता व्यवसायाचे रूप घेतले असून तरुण बेरोजगारांसाठी त्यांनी या व्यवसायातून आदर्श निर्माण केला आहे. मडावी तसे व्यवसायाने शिक्षक. त्यांना जोडधंदा करण्याची गरज नसतानाही केवळ आवड म्हणून त्यांनी काही कोंबड्या पाळायला सुरुवात केली. हळूहळू त्यांना या कामात रस निर्माण झाला. घराच्या अंगणात असलेले हे कुक्कुटपालन त्यांनी घराच्याच मोकळ्या जागेत स्थानांतरित केले.
दिग्रस शहरातील राजनगरमध्ये तुळशीराम मडावी यांचे छोटेखानी घर आहे. या राहत्या घराच्या बाजूलाच त्यांच्या मोकळ्या शिल्लक जागेत छोटीशी परसबाग होती. या जागेतच त्यांनी हा व्यवसाय थाटला. या व्यवसायात त्यांनी 1 ते सव्वा लाखाची गुंतवणूक केली. 85 हजार रुपयांचे पक्के शेड उभारले. उर्वरित गुंतवणूक आवश्यक साहित्य व गावरान कोंबड्यात केली. चार महिन्यांपूर्वी केवळ 20 कोंबड्यांवर कुक्कुटपालन सुरू केलेल्या मडावी यांच्याकडे सध्या 75 कोंबड्या आहेत. आजूबाजूच्या खेड्यातून ते कोंबड्या खरेदी करतात. या गावरान कोंबड्यांचे व्यावसायिक पालनपोषण ते या शेडमध्ये करतात. शेड सोडून उरलेल्या मोकळ्या जागेत काही काळ ते कोंबड्यांना मोकळे पण सोडतात. कोरोनामुळे सध्या गावरान कोंबडीच्या अंड्याला मोठी मागणी आहे. त्यातून त्यांना दररोज चारशे ते पाचशे रुपयांचे उत्पन्न मिळते. तर काही गावरान कोंबड्यांची ते विक्री करतात. यातून त्यांना किमान दरमहा पाच ते सात हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. छंदातून थाटलेला हा व्यवसाय मडावी यांच्याकडे आता आर्थिक सुबत्तेचे कारण ठरला आहे.
भरवशाचा जोडधंदा -
कुक्कुटपालनाचा व्यवसाय हा शेतीतच नाही तर घरातील परसबागेतही होऊ शकतो. कोरोनाच्या संकटकाळात अनेक व्यवसाय मोडकळीस आल्याने अनेकजण भरवशाचा जोडधंदा शोधत आहेत. शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन व्यवसायाकडे अनेक शेतकरी वळले. ते त्यातून आर्थिक उन्नतीसुद्धा साधत आहेत. कुक्कुटपालनाचा व्यवसाय हा शेतीतच नाही तर घरातील पारस बागेतही होऊ शकतो, हे मी आज अनुभवावरून सांगू शकतो. घरातील शिल्लक जागेत, छतावर किंवा घरातील मोकळ्या आवारात शेड तयार करून आपण छोटेखानी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करून त्यातून खर्च वजा जात पाच ते सात हजार रुपये उत्पन्न घेऊ शकतो, अशी माहिती तुळशीराम मडावी यांनी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.