अनेक नागरिक उरलेले अन्नपदार्थ प्लास्टिक पिशवीत टाकून फेकतात. हेच प्लास्टिक भुकेल्या गायी, गुरे खातात. त्यातून अनेकदा त्यांचा मृत्यूही होतो.
गडचिरोली: वाढते शहरीकरण, लुप्त झालेली गायराने, चराईची ठिकाणे आणि प्लास्टिक वापराचे वाढलेले प्रमाण, यामुळे मोकाट फिरणाऱ्या गायींच्या पोटात प्लास्टिक जात असून ते त्यांच्यासाठी कर्दनकाळ ठरत आहे. अनेक नागरिक उरलेले अन्नपदार्थ प्लास्टिक पिशवीत टाकून फेकतात. हेच प्लास्टिक भुकेल्या गायी, गुरे खातात. त्यातून अनेकदा त्यांचा मृत्यूही होतो.
मागील काही वर्षांत ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे. रस्त्यावरील उकिरड्यावर चरणारी गाई-गुरे माणसाने टाकलेल्या प्लास्टिकचे बळी ठरत असल्याचे दिसून येत आहे. प्राण्यांचा अकस्मात मृत्यू होण्यासाठी प्लास्टिक कारणीभूत ठरत आहे. विशेष म्हणजे प्लास्टिकमुळे मृत्यू झालेल्या जनावरांचे मांसही गिधाडे किंवा कावळे खात नाहीत. त्यामुळे ते सडते. प्लास्टिक मात्र विघटनशील नसल्याने ते तसेच राहते.
प्लास्टिक खाण्याचे प्रमाण गायींच्या बाबतीत अधिक आहे. गायींच्या जबड्याच्या विशिष्ट रचनेमुळे गायींना त्या काय खात आहेत, हे नेमके कळत नाही. त्यांचे ओठ पुरेसे संवेदनशील नसतात. त्यांची पचनसंस्था प्लास्टिकचे पचन करू शकत नाही, त्यामुळे हे प्लास्टिक पचनसंस्थेमध्ये साठून राहते आणि पचनसंस्थेमध्ये अडथळे निर्माण होतात. गाय कधी उलटी करत नाही, मात्र गायीच्या नाकावटे अन्न बाहेर येते तेव्हा पचनसंस्थेमधील अडचण लक्षात येते.
मुंबईसारख्या महानगरात अशा गायींवर शस्त्रक्रिया करण्याचीही सोय आहे. मात्र, गडचिरोलीसारख्या मागास व पायाभूत सुविधाही पुरेशा नसलेल्या शहरात अशा शस्त्रक्रियांची सोय हे दिवास्वप्नच आहे. घोडे किंवा इतर प्राण्यांचे ओठ, दात संवेदनशील असतात. त्यामुळे काय खायचे नाही हे त्यांना कळते. मात्र, प्लास्टिकच नाही तर उकिरड्यावरील कचऱ्यामधून लोखंडाचे तुकडे, खिळेसुद्धा गायींच्या पोटात जातात.
हा उपाय करून बघा
पशुपालन अधिकारी डॉ. कैलाश मोडे यांनी या समस्येवर उपाय सुचविला आहे. १०० ग्राम मोहरीचे तेल, १०० ग्रॅम तीळ व १०० ग्रॅम लिंबोळी (कडूनिंबाचे बी), १०० ग्रॅम एरंडेल तेल हे सगळ्या प्रकारचे तेल एकत्र करून गायीच्या ५०० ग्रॅम दुधापासून तयार केलेल्या ताकात घालून चांगले मिसळून घ्यावे किंवा ५० ग्रॅम तुरटी, ५० ग्रॅम संधैव मीठ बारीक करून त्यात २५ ग्रॅम सबंध मोहरी टाकावी. हे द्रावण दोन ते तीन दिवस पाजावे आणि चारा खाऊ घालावा. असे केल्याने गाय रवंथ करत असताना प्लास्टिक बाहेर येते. थोड्याच दिवसांत सगळे प्लास्टिक बाहेर पडते, असे डॉ. मोडे यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.