पुसद (जि. यवतमाळ) : राज्यातील सर्व विभागातील विकासाची कामे करणाऱ्या तीन लाख कंत्राटदारांची चाळीस हजार कोटी रुपयांची देयके थकलेली आहेत. त्यासाठी कंत्राटदार संघटना आंदोलन करीत असून सरकारला मात्र जाग आलेली नसल्याने महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता व इतर संघटनांच्या गुरुवारी दुपारी ऑनलाइन बैठकीत शासनाची कोंडी करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी दैनिक ’सकाळ’ला ही माहिती दिली. संघटनेच्या वतीने ४० हजार कोटींची थकीत देयके त्वरित अदा करावी, यांसह इतर पाच मागण्यांसाठी आंदोलनाची सुरवात ३० सप्टेंबरपासून कामबंद आंदोलनाने करण्यात आली.
त्यानंतर शासनास आठ दिवस वेळ देऊनही जाणीवपूर्वक मागण्या व प्रलंबित देयकांबाबत कोणत्याही प्रकारचा योग्य निर्णय शासनाने घेतलेला नाही. त्यातच कंत्राटदारांनी थोडी कळ सोसावी, असे महायुतीतील पक्ष प्रवक्ते हे वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीतून सांगत आहेत. लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे सरकारवर लोड येत आहे, अशी कबुली त्यांनी मुलाखतीत दिली आहे.
सरकारच्या विरोधात राज्य संघटना व राज्यातील इतर अनेक संघटना व मजूर संस्था यांनी राज्यातील २९ जिल्ह्यात शासन, प्रशासनाच्या धोरणांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. जिल्हा ठिकाणी जिल्हाधिकारी यांना संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. तरीही शासन अजूनही या विषयावर गंभीर नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे गुरुवारी कंत्राटदारांच्या बैठकीत काम बंद ठेऊन सरकारची कोंडी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीला महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना राज्य अध्यक्ष अभि. मिलिंद भोसले महासचिव सुनील नगराळे, कार्याध्यक्ष संजय मैंद, निवास लाड, सुरेश कडू पाटील, सुबोध सरोदे, अनिल पाटील, प्रकाश पालरेचा, मंगेश आवळे, प्रकाश पांडव, कांतिलाल डूबल, राजेश देशमुख, रवींद्र चव्हाण, कैलास लांडे, प्रशांत कांरडे, सिंकदर डांगे, नितीन लवाळे, नरेंद्र भोसले व मोठ्या संख्येने कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजूर संस्था यांचा सहभाग होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.