पुन्हा राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसचे तीन मंत्री पक्षाच्या मशाल रॅलीत अनुपस्थित    

three ministers of congress are absent in Mashal rally
three ministers of congress are absent in Mashal rally
Updated on

यवतमाळ ः किसान कॉंग्रेसने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढलेली आजची मशाल रॅली जिल्हाभर चर्चेचा विषय ठरली. या रॅलीदरम्यान पुन्हा एक चर्चा होती, ती म्हणजे तीन मंत्र्यांच्या अनुपस्थितीची. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह जिल्हा कॉंग्रेस कमीटी आणि किसान कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. पण कॉंग्रेसचे तीन महत्वाच्या मंत्र्यांच्या अनुपस्थितीने रॅलीदरम्यान आणि नंतर भलत्याच चर्चा रंगल्या.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे तिन्ही मंत्री यवतमाळला होते. जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित होते. पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यालाही या तीन मंत्र्यांची उपस्थिती होती. पण किसान कॉंग्रेसने आयोजित केलेल्या मशाल रॅलीत मात्र या तिन्ही मंत्र्यांचा सहभाग नव्हता. मग जो तो आपआपल्या परिने या मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा अर्थ लावत होता. अनुपस्थिचा अर्थ मग थेट विधानसभा अध्यक्षांपर्यंतही जोडण्यात आला.

तिन्ही मंत्र्यांच्या मशाल रॅलीत अनुपस्थितीचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, विजय वडेट्टीवार यांनी आढावा बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला ते गेले होते, अशा माहिती मिळाली. तर यशोमती ठाकूर आणि डॉ. नितीन राऊत हे आपापल्या कार्यकर्त्यांच्या घरी भेट द्यायला गेले असल्याचे कळले. यवतमाळात आलेले सर्व मंत्री मशाल रॅलीत सहभागी झाले असते तर अधिक चांगले झाले असते आणि एकीचा संदेश गेला असता अशाही प्रतिक्रिया काही कार्यकर्त्यांनी ‘सरकारनामा’जवळ व्यक्त केल्या.

भाजप प्रणित केंद्र सरकारने शेतकऱ्यांना उध्वस्त करण्यासाठी केलेल्या काळ्या कायद्याविरोधातली धग आज यवतमाळ येथे मशाल रॅलीतून जाणवली. मशाली पेटवून शेतकऱ्यांनी या काळ्या कायद्याविरोधात आपला रोष व्यक्त केला. शेतकऱ्यांना गुलामीत लोटणारे जुलमी कायदे रद्द करा, अन्यथा त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा सज्जड इशारा शेतकऱ्यांनी या आंदोलनातून केंद्र सरकारला दिला. 

मशाल रॅलीमध्ये काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार, जिल्हाध्यक्ष मनमोहन भोयर, चंद्रकांत चौधरी, अशोक भुतडा, जावेद अन्सारी, शैलेश इंगोले, हेमंतकुमार कांबळे, विठ्ठल आडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी सरकार विषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली. यवतमाळ येथे प्रथमच शेतकऱ्यांचे अभिनव आंदोलन झाले. मशालींच्या ज्वाळांप्रमाणे शेतकऱ्यांचा रोष देखील धगधगत होता. या आंदोलनात जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. 

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.