शेतात पाणी द्यायला गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला, अन्य दोघेही जखमी; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

tiger attack on three farmers in ghonsa of yavatmal
tiger attack on three farmers in ghonsa of yavatmal
Updated on

घोन्सा (जि. यवतमाळ) : बंदीवाढोना गावासह आजुबाजूच्या शेतशिवारात वाघाने धुमाकुळ घातला आहे. वेगवेगळ्या घटनांमध्ये वाघाच्या हल्ल्यात तीन शेतमजूर गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार (ता.१४) मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली. तिघांना प्राथमिक उपचारानंतर यवतमाळ येथे पाठविण्यात आले असून, त्या तिघांची प्रकृती स्थिर आहे. पैकू मडावी, अजय आत्राम, प्रकाश आत्राम, असे जखमींचे नावे आहेत.

झरीजामणी तालुक्यातील बंदीवाढोना येथे रामदास भीमा कुमरे यांचे शेत आहे. रविवार दुपारी तीन वाजताच्या सुमारास कुमरे यांच्या शेतातील ज्वारीला पाणी देण्यासाठई गावातीलच पैकू मडावी (वय ३५)वर्ष हे गेले होते. त्या ठिकाणी आधीपासूनच एक वाघ दबा धरून होता. अचानक वाघाने पैकू यांच्यावर हल्ला केला. आरडाओरड केल्यामुळे वाघाने घटनास्थळावरून पळ काढला. परंतु, वाघाच्या हल्ल्यात पैकू मडावी यांच्या डोक्यासह पाय आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या. जखमी पैकू मडावी याला गावातील उपसरपंच उमेश राठोड, जाबीर सैय्यद, प्रवीण चव्हाण, हुसेन मडावी यांनी खासगी वाहनाने पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर दुसऱ्या घटनेत अजय आत्राम आणि प्रकाश आत्राम यांच्यावर सुद्धा वाघाने हल्ला केला. दोन घटनेतील शेतमजूर गंभीर जखमी झाले असून, तिसऱ्या घटनेत तरुणाने अत्यंत शिताफिने वाघाच्या तावडीतून सुटका केली. त्यामुळे त्यांना किरकोळ जखमा झाल्या होत्या. या घटनेमुळे परिसरात एकच दहशत पसरली असून, गावातील नागरिकांनी लाठी, काठी घेऊन जंगल परिसरात एकच गर्दी केली होती. 

दरम्यान, याची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होवून पाहणी केल्याची माहिती मिळाली. एकंदरीत सध्या शेतशिवारात सध्या कामे करण्यासाठी मजूर जात आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. तिन्ही जखमींवर पांढरकवडा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. तर पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे दाखल करण्यात आले आहे. वनविभागाने या वाघांचा त्वरीत बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

पैनगंगा अभयारण्यात दोन वाघ -
विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील पैनगंगा अभयारण्यात वनविभागाच्या पथकाला गस्त घालताना दोन वाघाचे दर्शन झाले. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, त्यामधील एक नर, तर दुसरी मादी आहे. पैनगंगा अभयारण्यात सध्या जंगली प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, वाघ, बिबट्यांमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. खरबी रेंजमध्ये दोन वाघाचे दर्शन झाल्याने अभयारण्यातील नागरिक घाबरले असून, नागरिकांनी सतर्क राहून जंगलात गुरे घेऊन जाणे तसेच लाकडे आणण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

चिंचघाट येथे दोन बैलांचा मृत्यू -
झरीजामीण तालुक्यात वाघाचे वास्तव्य आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशात तालुक्यातील चिंचघाट येथे सुद्धा दोन बैलावर वाघाने हल्ला चढविला होता. या हल्ल्यात दोन्ही बैलाचा जागीच मृत्यू झाला. याचा पंचनामा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे वाघाचा बंदोबस्त लावावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.