नवेगावबांधात राहायची पर्यटकांची रेलचेल...कोरोनामुळे आता शुकशुकाट...पर्यटकांना प्रतीक्षा

नवेगावबांध : पर्यटकांअभावी असलेला शुकशुकाट.
नवेगावबांध : पर्यटकांअभावी असलेला शुकशुकाट.
Updated on

नवेगावबांध (जि. गोंदिया) : गोंदिया-भंडारा जिल्ह्यात विस्तारलेल्या नवेगाव-नागझिरा अभयारण्यात पर्यटकांना फिरण्यासाठी आनंदाची पर्वणीच आहे. अभयारण्यातील वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झाल्याने आता हमखास प्राणी पहावयास मिळतात. मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन व संचारबंदी लागू झाल्याने पर्यटकांनी या राष्ट्रीय उद्यानाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांअभावी ओस पडले आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्‍यातील इटियाडोह धरणावरही येणे-जाणे थांबले आहे.

नवेगावबांध अभयारण्यात जाण्यासाठी बकी गेट, खोली गेट, जांभळी गेट, पितांबर टोला गेट तयार केले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून जाण्यासाठी कोहमारावरून 3 किलोमीटर अंतरावरून बकी गेट हे फार सोयीचे आहे. रायपूर, गोंदिया, नागपूरकडून येणाऱ्या पर्यटकेंसाठी फारच सोयीचे गेट ठरले आहे. नवेगाव अभयारण्यात जाण्यासाठी खोली, बकी, जांभळी व पितांबर/टोला गेटची निर्मिती करण्यात आली आहे. चुटीया गेट मात्र बंद करण्यात आले आहे. एकूण क्षेत्राच्या फक्त वीस टक्के राखीव जंगलातच पर्यटन व्हावे, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असल्यामुळे पर्यटकांसाठी हा गेट बंद करण्यात आला आहे. नवेगावबांध अभयारण्य 133.78 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरला आहे; तर नागझिरा अभयारण्य हा 152. 81 चौरस किलोमीटर क्षेत्रात विस्तारला आहे.


वन्यप्राणी, पक्ष्यांचा अधिवास

या अभयारण्यात भरपूर वन्य प्राणी पाहावयास मिळतात. बकी गेटने पुढे गेल्यास थात्रेमारी बोअरवेल, गोपीचुहा, बदबदा झरी, बोद्राई झरी, टी. के. पॉइंट परिसर, झलकारगोंदी तलाव, राणीडोह, आगेझरी, काळी माती कुरण, काटेथूवा, कमकाझरी, चोपण बोअरवेल आदी परिसरात बिबट्या, नीलगाय, वाघ, हरिण, अस्वल, सांबर, चितळ, उडणारी खार आदी प्राणी, मोर पक्षी मोठ्या संख्येने पाहावयास मिळतात. उन्हाळ्याच्या दिवसात तर रानगवा प्राण्याचे झुंडचे झुंड पाहावयास मिळतात.
पक्ष्यांमध्ये भुस्तरिखा, सोंपाठीसुतार, तांबट सुतार, मराठा सुतार, लावा, वेडा राघू, रॉबिन, सातभाई, नीलकंठ, तीतर, हरियाल आदी पक्षी मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात. याच जंगलात औषधी वनस्पती त्यात बेहडा, हिरडा, बेल, ऍपटा, बिजा, भुईनिम, बिबा, मरवेल आदी वनस्पती पाहावयास मिळतात. झलकारगोंदी तलाव परिसरात दुर्मिळ पांढरा सांभर पहावयास मिळतो.

नागझिरा अभयारण्यातील रेस्ट हाऊस परिसरात हरणांचा कळप हमखास पाहायला मिळतो. पर्यटकांना न्याहारी घेण्यासाठी उपाहारगृहाची सोय केली आहे. पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी चार चाकी वाहन भाडे तत्त्वावर मिळण्याची व्यवस्था केली आहे. बाहेर शहरातून आलेल्या पर्यटकांना मनमुराद आनंद घेण्यासाठी खुली चारचाकी वाहनांची सोय आहे.

जंगल सफारीचा आनंद हरवला

नागझिरा अभयारण्यात जाण्यासाठी पिटेझरी गेट, चोरखमारा गेट व मंगेझरी गेट ह्या ठिकाणावरून अभयारण्यात जाण्यासाठी गेट आहे. त्यात टायगर रोड, चित्तर मार्ग रोड, बैसान रोड, तिब्बत रोड, सातमोडी रोड, घाटमारा रोड आदी रस्त्यांनी जंगल सफारी केल्यास प्राणी पहावयास मिळतात. या सुमारे 200 च्या जवळपास पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. एरव्ही नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील पर्यटक संकुल पर्यटकांनी, शालेय सहलींनी गजबजलेले असते. नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत पर्यटकांबरोबरच शालेय सहली मोठ्या प्रमाणावर येतात. तसेच एप्रिल ते जून या कालावधीत मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. मात्र आता येते शुकशुकाट पसरली आहे.

बालोद्यानात मुलांचा किलबिलाट नाही

येथील सौंदर्य न्याहाळत असतात. निसर्गसंपन्न, वन्यप्राण्यांनी वैभवसंपन्न अशा या राष्ट्रीय उद्यानात पर्यटक मनमुराद आनंद लुटत असतात. लहान बालके व त्यांच्या आया बालोद्यानात आपला वेळ घालवतात. लहान मुले येथील खेळण्यांवर खेळण्यात तल्लीन होतात. आता मात्र येथील बालोद्यानात मुलांचा किलबिलाट पूर्वीसारखा ऐकायला मिळत नाही. त्यामुळे पर्यटक संकुल ओस पडले आहे. तसेच तालुक्‍यातील इटियाडोह धरण, प्रतापगड किल्ला व शिवमंदिर या ठिकाणीसुद्धा पर्यटकांअभावी शुकशुकाट पाहायला मिळतो. नवेगाव नागझिरा अभयारण्यातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान व नागझिरा अभयारण्य पर्यटकांअभावी ओसाड पडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.