वर्धा : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगाचे चक्र बदलले. अनेकांचे रोजगार गेले. नोकरी गेल्याने आलेल्या नैराश्यातून अनेकांनी ऐन उमेदीच्या वयातच मृत्यूला कवटाळल्याच्या घटनाही पुढे आल्या. जुनं खोड, अशी म्हण प्रचलित आहे.
कोरोनामुळे वसंतराव दौलमवार यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी हातचे काम गेले. मात्र, ते खचले नाहीत; तर इतरांची गुलामगिरी करण्यापेक्षा त्यांनी आपल्या शेतात उत्पादित ज्वारी व्यापाऱ्यांना विक्री न करता थेट ग्राहकांना विक्री सुरू केली. यातून दिवसाकाठी त्यांना हजार रुपये मिळत असल्याचे त्यांनी 'सकाळी' शी बोलताना सांगितले.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील आकोली येथील रहिवासी वसंतराव दौलमवार यांना समृद्धी महामार्गाच्या कामात नोकरी मिळाली. चार पैसे पदरी पडावे, याकरिता ते उतारवायात आपल्या पत्नीसह सेलू येथे आले. समृद्धी महामार्गाचे काम व्यवस्थित सुरू होते. मार्चपासून जगात कोरोना विषाणूने थैमान घातले. परिणामी, समृद्धी महामार्गाचे कामही बंद पडले. यात वसंतराव दौलमवार यांचीसुद्धा नोकरी गेली.
परत गावी गेल्यावर तिथेही त्यांना काम मिळाले नाही. उन्हाळ्याचे दिवस अस्याने त्यांनी सेलूतच राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे आकोली येथे शेती आहे. शेतात मोठ्या प्रमाणात ते ज्वारी आणि बाजरीचे उत्पादन घेतात. त्यांनी व्यापाऱ्यांना ज्वारी न विकता आपणच ग्राहकांना थेट विक्री करण्याचा निर्णय घेतला.
गत एक महिन्यापासून वसंतराव दौलमवार वर्धा शहरात रस्त्याच्या कडेला जागा मिळेल तिथे दुकान थाटून ज्वारी २५ आणि बाजरी ३० रुपये पायली प्रमाणे विकत आहेत. दररोज दोन क्विंटल ज्वारीची विक्री होते. ग्राहकांना थेट विक्रीमुळे चार पैसे मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना महामारीत आलेल्या संकटातून मार्ग काढत वसंतराव दौलमवार यांनी रोजगार शोधला. शेतीवर अनेक व्यवसाय करता येतात. शेतात उत्पादित माल स्वत:च विकला तर फायदाही होतो. युवकांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीकडे वळावे, असेही ते म्हणाले.
व्यापाऱ्यांनी २० रुपये प्रतिकिलोने ज्वारी मागितली होती. त्यावेळी त्यांनी ज्वारी विकली नाही. कोरोना महामारीत नोकरी गेल्याने ग्राहकांना थेट २५ रुपये पायलीप्रमाणे ज्वारी विक्री सुरू केली. दररोज दोन क्विंटल ज्वारीची विक्री होत आहे. यातून दररोज हजार रुपये मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. हेच हजार रुपये त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे.
(संपादन : दुलिराम रहांगडाले)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.