नागपूरः मृत्यू होण्याच्या पाच कारणांपैकी "हृदयविकार' हे एक प्रमुख कारण आहे. हृदयनिकामी झालेल्या रुग्णांसाठी "प्रत्यारोपण' हा शेवटचा पर्याय आहे. राज्यात पुणे, मुंबई व औरंगाबाद आणि नागपुरात खासगी रुग्णालयात "हृदय प्रत्यारोपणा'ची सोय आहे. परंतु, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ही सोय नाही. मात्र, मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची हृदय प्रत्यारोपण केंद्र उभारण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. मंगळवारी (ता. 3) हृदय प्रत्यारोपण केंद्रासाठी सादर झालेल्या प्रस्तावानुसार दोन सदस्यांनी "सुपर'च्या हृदय शल्यक्रिया विभागांची पाहणी केली.
विदर्भात पहिले यकृत प्रत्यारोपण केंद्र उभारण्याचा मान खासगी रुग्णालय असलेल्या लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलला मिळाला. मात्र, सरकारी रुग्णालयात "सुपर'मध्ये हृदय प्रत्यारोपण केंद्र उभारण्याचे धाडस मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी केले आहे. सुपरमध्ये यापूर्वी किडनी प्रत्यारोपण सुरू झाले. साठ किडनी प्रत्यारोपण झाले आहेत. आता "हृदय प्रत्यारोपण केंद्र' उभारण्याच्या परवानगीचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाकडे सादर केला. त्यानुसार 3 डिसेंबरला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, मेयोतील शल्यचिकित्सक डॉ. सुनील लांजेवार आणि डॉ. दीप्ती देशमुख यांच्या पथकाने सुपरच्या हृदयरोग विभागाचे निरीक्षण केले.
या वैद्यकीय पथकाने सुपरमधील "हृदय विभागा'तील शल्यक्रियागृह, वॉर्ड तसेच उपलब्ध यंत्राची पाहणी केली.
प्रत्यारोपणासाठी आवश्यक सुविधांसह तज्ज्ञांबाबतचे नियोजनाची माहिती घेतली. यावेळी मेडिकल-सुपरचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, सुपरच्या हृदय शल्यक्रिया विभागाचे विभागप्रमुख डॉ. निकुंज पवार, विशेष कार्यअधिकारी डॉ. मिलिंद फुलपाटील यांच्याशी या पथकाने चर्चा केली. यावेळी सुपरमध्ये हृदय प्रत्यारोपणासाठी डॉ. आनंद संचेती, डॉ. निकुंज पवार यांच्यासह जागतिक दर्जाचे तज्ज्ञ डॉ. प्रशांत वैजनाथ मदत करणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. मित्रा यांनी दिली. समितीचा अहवाल आरोग्य विभागाकडे सादर होईल. यानंतर सुपरच्या हृदय प्रत्यारोपण केंद्राच्या भाग्याचा निर्णय होईल.
हृदय प्रत्यारोपण करण्याचा परवाना देताना हवेचा सकारात्मक प्रभाव असलेले तीन अतिदक्षता विभाग, दोन डायलिसीस मशीन, हृदयाच्या ठोक्यांचा अचूक वेध घेणारे "इग्मो', नायट्रिक ऑक्साइड व्हेंटिलेटर, जंतुसंसर्ग टाळण्यासाठी पॉझिटिव्ह प्रेशर असलेला वॉर्ड आणि कार्डियाक बायोप्सी असे निकष पाळावे लागतात. हे निकष पूर्ण केल्यानंतर परवानगी मिळते.
हृदय प्रत्यारोपण केंद्र परवानगीसाठी आवश्यक निकष पूर्ण करण्यात येतील. अधिकृत परवानगी मिळाल्यानंतर हृदयाची गरज असलेल्या रुग्णांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येते. केंद्र मंजूर झाल्यास विदर्भासह मराठवाडा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील गरीब हृदय रुग्णांसाठी वरदान ठरेल.
- डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.