नागपूर : विदर्भ क्रिकेट संघटनेच्या आतापर्यंतच्या सहा दशकांच्या इतिहासात जे घडले नाही, ते विदर्भाच्या "ज्युनियर्स'नी करून दाखविले. विदर्भाच्या मुलांनी पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर उपांत्य लढतीत मुंबईचा पराभव करून 19 वर्षांखालील मुलांच्या कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेत सलग तिसऱ्यावर्षी अंतिम फेरी गाठून नवा इतिहास रचला. आतापर्यंतच्या इतिहासात विदर्भाच्या कोणत्याही वयोगटातील संघाने बीसीसीआयच्या अखिल भारतीय स्पर्धेत लागोपाठ तीनवेळा अंतिम फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ होय.
कळमना मैदानावर अनिर्णीत संपलेल्या उपांत्य लढतीत सकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे शेवटच्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे पहिल्या डावातील 168 धावांची आघाडीवर विदर्भाला विजयी घोषित करण्यात आले. पावसामुळे मैदान ओले झाल्याने एकही चेंडू फेकला गेला नाही. त्यामुळे पंचांनी दोन्ही संघाच्या कर्णधारांच्या सहमतीने चहापानाच्या वेळी सामना थांबविण्याचा निर्णय घेतला.
मुंबईच्या पहिल्या डावातील 258 धावांना विदर्भाने तिसऱ्या दिवसअखेरीस 7 बाद 426 असे चोख प्रत्युत्तर देत एक दिवस आधीच अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला होता. शतक झळकाविणारा सलामीवीर आवेश शेख (101 धावा) व अर्धशतकी खेळी करणारे संदेश द्रुगवार (90 धावा) व अष्टपैलू हर्ष दुबे (62 धावा) विदर्भाच्या विजयाचे शिलेदार ठरलेत. याशिवाय सलामीवीर महंमद फैज (46 धावा) व कर्णधार अमन मोखाडे (45 धावा) यांचेही योगदान निर्णायक ठरले. गोलंदाजीत प्रफुल्ल हिंगे (तीन बळी), मनन दोशी (दोन बळी) व अष्टपैलू मंदार महाले (दोन बळी) यांनी चमकदार कामगिरी बजावली. विजेतेपदासाठी आता विदर्भाची लढत येत्या 12 फेब्रुवारीपासून सिव्हिल लाइन्स मैदानावर बडोदा संघाविरुद्ध होईल. विदर्भाच्या मुलांनी दोन वर्षांपूर्वी (2017-18 मध्ये) घरच्याच मैदानावर मध्य प्रदेशला नमवून कुचबिहार करंडक जिंकला होता तर, गतवर्षी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. विदर्भ रणजी संघाने 2018 व 2019 मध्ये लागोपाठ दोनवेळा अंतिम फेरीत प्रवेश करून विजेतेपद पटकाविले होते.
संक्षिप्त धावफलक
मुंबई पहिला डाव : 258. विदर्भ पहिला डाव : 7 बाद 426 (आवेश शेख 101, संदेश द्रुगवार 90, हर्ष दुबे 62, महंमद फैज 46, अमन मोखाडे 45, प्रेरित अग्रवाल 24, रोहित बिनकर नाबाद 22, मंदार महाले 21, हिमांशू 2-113, राजेश सरदार 2-86, प्रग्नेश कनपल्लीवार 2-9, धनित राऊत 1-64).
लागोपाठ तिसऱ्या वर्षी अंतिम फेरीत
"विदर्भ संघ लागोपाठ तिसऱ्या वर्षी कुचबिहार करंडकाच्या अंतिम फेरीत पोहोचला, याचा मनापासून आनंद आहे. याचे सर्व श्रेय खेळाडूंच्या मेहनतीला आहे. सांघिक कामगिरीमुळेच आम्ही हे यश मिळवू शकलो. फलंदाजांसह गोलंदाजांनीही वेळोवेळी सातत्याने गडी बाद केले. दुसऱ्यांदा विजेतेपदाचे स्वप्न साकार करण्यासाठी आता केवळ एक विजय आवश्यक आहे. खेळाडूंचा शानदार फॉर्म व एकजूटता लक्षात घेता मला "फायनल'मध्येही संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.'
-उस्मान गनी, विदर्भ संघाचे प्रशिक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.