यवतमाळ : शेतकर्यांचे वर्षभराचे गणित हे खरीप हंगामावर अवलंबून असते. यंदा हवामान खात्याने दमदार पावसाचा अंदाज वर्तविला होता. उत्साही तज्ज्ञही हवामान अंदाज सांगण्यात आघाडीवर आहे. मात्र, मॉन्सूनने शेतकर्यांची निराशाच केली. जून महिन्यात पेरणीचा कालावधी असताना एकाच महिन्यात 36 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दोन आत्महत्या झाल्या आहेत. खरीप हंगामात शेतकरी मरणाच्या दारात जात असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांना नुकसानीचा फटका सहन करावा लागला. कसेबसे पीक वाचून घरात आले असता, मालाला भाव मिळाला नाही. शेतकर्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत कापूस व सोयाबीन पीक घरात साठवून ठेवले. उन्हाळा संपत आला तरी भाववाढ होण्याची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत.
त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकर्यांनी मिळेल त्या भावात कापूस व सोयाबीनची विक्री केली. हातात आलेल्या पैशांतून काहींनी पेरणीची तजवीज केली. मात्र, खरीप हंगाम तोंडावर आला असताना हातात पैसाच नसल्याने शेतकर्यांसमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरला नाही, असे भयावह चित्र आहे.
2023 या वर्षात सर्वाधिक शेतकरी आत्मत्येची नोंद जून महिन्यातच करण्यात आली आहे. या वर्षांत आतापर्यंत 134 आत्महत्या झाल्या आहेत. त्यात 65 शेतकरी आत्महत्या मदतीस पात्र ठरल्या तर, 28 अपात्र ठरल्या आहेत. मेमधील एक व जूनमधील 27 अशा एकूण 28 आत्महत्यांची प्रकरणे चौकशीत आहेत.
पावसाने हुलकावणी दिल्याने धूळपेरणी संकटात सापडली. सिंचन सुविधा असणार्या शेतकर्यांनी पीक वाचविण्याचा प्रयत्न केला तर, पेरणीयोग्य पाऊस न होताच पेरणी करणार्या शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. आता दुबार पेरणीसाठी बियाणे कुठून विकत आणायचे या विवंचतेतून शेतकर्यांनी जीवनयात्रा संपविली आहे. गळफास, विषप्राशन करून सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहे.
जूननंतर जुलै महिन्याची सुरुवातही शेतकरी आत्महत्यांनी झाली आहे. पहिल्याच आठवड्यात दोन शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. घरातील कर्ताव्यक्ती जीवनयात्रा संपवित असल्याने कुटुंबाची वाताहत होत आहे. शेतकर्यांना पेरणीसाठी पीककर्ज मिळत नाही तर, दुसरीकडे बोगस बियाण्यासह खतही शेतकर्यांच्या माथी मारले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.