गडचिरोली : गडचिरोली जिल्हा विजय वडेट्टीवारांची जन्मभूमी नसली, तरी कर्मभूमी आहे. त्यांची राजकीय जडणघडण याच जिल्ह्यातून झाली. त्यांना जिल्ह्यातील समस्यांची जाण आहे. जिल्ह्याचा विकास घडून यावा, अशी त्यांची तळमळ आहे. जिल्ह्याचा विकास घडवून आणण्याची क्षमता त्यांच्यात आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर विजय वडेट्टीवार यांच्याकडे आधी चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली, तर गडचिरोलीचे पालकत्व राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आले. मात्र कोरोनाच्या संकटात काही काळासाठी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद विजय वडेट्टीवार यांच्याकडे सोपविण्यात आले होते. त्यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याबाबत कोणताही दुजाभाव केला नाही.
मागील तीन-चार महिन्यांच्या कालावधीत त्यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्यांनी अल्पावधीतच गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून घेतले आहे. गोंडवाना विद्यापीठासाठी सेमाना मार्गावर वनजमीन मिळण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. शेतकऱ्यांसाठी खत कमी पडू नये म्हणून आधीच उपाययोजना केली.
जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत 19 टक्के लागू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच शासनाने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमली आहे. अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच ओबीसी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, शैक्षणिक सुविधांचा लाभ मिळावा म्हणून ओबीसी कल्याण मंत्रालयामार्फत महाज्योती नावाने स्वायत्त संस्था कार्यान्वित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अतिदुर्गम भागांत रस्ते, पुलांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करून दिला आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यू असताना अनेक गरीब नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. त्यामुळे पालकमंत्रिपद त्यांच्याकडे असल्यास जिल्हाच्या विकासाला वेग येईल, असे अनेकांचे म्हणणे आहे.
राज्याचे बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे असलेली गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी पुन्हा राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक मान्यवरांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अनेकांकडून एकनाथ शिंदे चांगले नेते असले, तरी विजय वडेट्टीवारांसारखा स्थानिक नेताच पालकमंत्री हवा, अशी भावना व्यक्त होत आहे.
दहा हजार पत्रे पाठवणार
विजय वडेट्टीवार यांना गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाची तळमळ असून त्यांनी चंद्रपूरबरोबरच गडचिरोलीचे जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारण्यास तयार असल्याचे अनेकदा बोलून दाखविले आहे. जिल्ह्याचा विकास साधायचा असेल तर विजय वडेट्टीवार यांच्याकडेच गडचिरोलीचे पालकमंत्रिपद द्यावे, अशी मागणी युवक कॉंग्रेसचे महासचिव कुणाल पेंदोरकर यांनी केली आहे. त्यासाठी युवक कॉंग्रेसच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना दहा हजार पत्रे पाठविण्यात येणार असल्याचे पेंदोरकर यांनी सांगितले आहे.
धडाकेबाज निर्णय
विजय वडेट्टीवार यांनी आपल्या अल्पकालीन पालकमंत्रिपदाच्या काळात विकासकामांचे अनेक धडाकेबाज निर्णय घेतले. त्यांनी अल्पावधीत केलेली वेगवान विकासकामे बघता गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद जर पूर्णवेळ त्यांच्याकडे राहिले, तर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यास फार वेळ लागणार नाही.
दीपक आत्राम, माजी आमदार, अहेरी
विकासचक्र गतिमान होईल
जिल्ह्याचे पालकमंत्रिपद एकनाथ शिंदे यांच्याकडे आले, याबद्दल आम्हाला नाराजी नाही. पण, या पदाची जबाबदारी सांभाळताना त्यांना मुंबई मंत्रालयातूनच अधिक वेळ काम पहावे लागले. विजय वडेट्टीवार जिल्ह्याला नेहमी भेटी देऊन विकासकामांना गती देत होते. म्हणून पालकमंत्रिपद वडेट्टीवार यांच्याकडे असल्यास विकासचक्र सुलभतेने गतिमान होईल.
अजय कंकडालवार, अध्यक्ष, जिल्हा परिषद, गडचिरोली
संपादन - स्वाती हुद्दार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.