गडचिरोली: महाराष्ट्र राज्याचा वर्धापनदिन बुधवार (ता. १) उत्साहात साजरा होत असताना जादुटोण्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी एका महिलेसह दोन जणांना जीवंत जाळले. ही घटना एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथे घडली. याप्रकरणी १५ जणांना पोलिसांनी अटक केली असून पाच दिवसांची पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
जननी देवाजी तेलामी (वय ५२) व देवू कटया आतलामी (वय ६०) अशी मृतांची नावे आहेत. आरोपींमध्ये जमनी तेलामी हिचा पती देवाजी तेलामी (वय ६०) आणि मुलगा दिवाकर तेलामी (वय २८) यांचा समावेश आहे. जननी आणि देवू हे वेगवेगळ्या कुटुंबातील असले, तरी ते पुजारी म्हणून काम करीत होते.
त्यामुळे ते जादुटोणा करतात, असा काही जणांना संशय होता. अशातच जीवनगट्टा-चंदनवेली मार्गावरील बोलेपल्ली येथील एका महिलेचा गर्भपात झाला, त्यानंतर महिनाभरापूर्वी एक महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला. याच कुटुंबातील एका दीड वर्षीय मुलीचा १ मे रोजी मृत्यू झाला. दोघांचाही मृत्यू जननी तेलामी आणि देवू आतलामी यांनी जादुटोणा केल्यामुळे झाला, असा त्या कुटुंबीयांचा संशय होता. त्यामुळे कुटुंबीय काही जणांना सोबत घेऊन १ मे रोजी रात्री जननी आणि देवूच्या घरी गेले. त्यांनी दोघांनाही बेदम मारहाण केली, यानंतर त्यांना गावाजवळच्या नाल्यात नेऊन जाळले.
याप्रकरणी जननीचा वासामुंडी येथे राहणारा भाऊ शाहू मोहनंदा याने पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी १५ जणांना अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक नीळकंठ कुकडे यांनी दिली. सर्व आरोपींना मा. प्रथम वर्ग न्यायालय, अहेरी येथे हजर केले असता सर्व आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली. घटनेनंतर अहेरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम. रमेश, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. (Gadchiroli News in Marathi)
पाच महिन्यापूर्वी अशीच घटना-
जादुटोण्याच्या संशयावरून हत्या केल्याची गडचिरोली जिल्ह्यातील पाच महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. ७ डिसेंबर २०२३ रोजी भामरागड तालुक्यातील गुंडापुरी येथे वृद्ध पती, पत्नी आणि त्यांच्या नातीची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातही मृतांच्या दोन मुलांना अटक करण्यात आली होती. हे गावसुद्धा एटापल्ली तालुक्याच्या सीमेवर आहे. या घटनेनंतर आता बारसेवाडा येथे हत्याकांड झाल्याने खळबळ उडाली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.