अमरावती : बालपणापासूनच काही तरी वेगळे करून दाखविण्याची जिद्द... जिद्दीला परिश्रमाची जोड आणि येणारे संकट... अडथळे पार करून यशोशिखरापर्यंत जाऊन पोहोचणे हा अतिशय खडतर प्रवास केवळ काही वर्षांतच पूर्ण करणाऱ्या रंजना अनिल बिडकर या इतर महिलांसाठी आयकॉन ठरल्या आहेत. आज रंजना या यशस्वी उद्योजिका म्हणून परिचित आहेत. विशेष म्हणजे पुरुषप्रधान उद्योगक्षेत्रातसुद्धा एका महिलेने कार्यकर्तृत्वाने सीमोल्लंघनच केले आहे.
वाठोडा शुक्लेश्वर येथे आईसोबत शिवणकामाचे धडे घेतलेल्या रंजना बिडकर यांनी विवाहानंतरदेखील आपले काम सुरूच ठेवले. घरी पती आणि मुलगी असे संपन्न कुटुंब. मात्र, काही तरी करून दाखविण्याची जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. मुलीला नृत्याची आवड असल्याने तिचे ड्रेस घरीच शिवणे सुरू केले. ते आवडल्याने मग शाळेतील अन्य पालकांकडून त्यांना ड्रेसेसच्या ऑर्डर येऊ लागले. हा प्रवास सुरू असतानाच रंजना बिडकर यांच्यातील उद्योजिका घडत गेली.
सुरुवातीला चार महिलांना सोबत घेऊन त्यांनी ड्रेसेस व नंतर शाळांचे गणवेश तयार करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे सुरुवातीला अतिशय कमी भांडवलात त्यांनी स्वतःचा मार्ग निवडला. मध्यंतरी एका संस्थेत प्रशिक्षक म्हणून नोकरीला लागल्या. मात्र, त्यांच्यातील उद्योजिका स्वस्थ बसू देत नव्हती.
आपण दुसऱ्यांना प्रशिक्षण देऊ शकतो तर आपला स्वतःचा उद्योग का सुरू करू शकत नाही, असा विचार वारंवार त्यांच्या डोक्यात येत होता. विशेष म्हणजे, लग्नानंतर त्यांनी सुरुवातीच्या काळात बिछायत केंद्र, ब्युटीपार्लर, बुटीकसुद्धा चालविले. मात्र, त्यात त्यांचे मन रमेना.
घरची परिस्थिती संपन्न असली तरी पत्नीच्या जिद्दीला त्यांच्या पतीनेसुद्धा साथ दिली. अशातच मोठा उद्योग सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. सुरू असलेल्या व्यवसायातील साठविलेले पैसे गुंतवून नांदगावपेठ एमआडीसीमधील टेक्सटाईल झोनमध्ये त्यांनी भूखंड मिळविला आणि त्यांची स्वप्नपूर्तीकडे वाटचाल सुरू झाली.
शाळेच्या गणवेशासोबतच रेडिमेड शर्टस्, गारमेंट्सचे उत्पादनसुद्धा त्यांनी सुरू केले. आज त्यांच्या कारखान्यात १० ते १२ कर्मचारी असून त्यांची उपजीविका चालावी म्हणून कोरोनाच्या काळात औद्योगिक मंदीतही रंजना बिडकर यांनी त्यांचे काम सुरूच ठेवले.
कोरोनामुळे आलेल्या लॉकडाऊनच्या संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मात्र, रंजना बिडकर यांच्याकडे नोकरीवर असलेल्या कर्मचाऱ्यांवर ही वेळ येऊ नये यासाठी त्या सतत धडपडत होत्या. कोरोनाकाळात कापडी मास्क, डॉक्टरांना लागणारे ओटी गाउन्स, पीपीई किट तयार करण्याचे काम त्यांनी सुरू केले आणि अनेकांचा रोजगार वाचविला. ही बाब मनाला खूप समाधान देऊन जाते, असे रंजना बिडकर सांगतात.
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.