गतवर्षाच्या जखमा आठवत नववर्षाचे साधेपणाने स्वागत; कोरोनाची दहशत मात्र कायम 

welcome 2021 by remembering 2020 do not forget corona
welcome 2021 by remembering 2020 do not forget corona
Updated on

गडचिरोली : मागील वर्षी ज्या 2020 चे जल्लोषात स्वागत केले त्याने कोरोनारूपी भळभळती जखम दिली. ही जखम अद्याप अश्‍वत्थाम्याच्या अमर जखमेसारखी भळभळत आहे. त्यामुळे नवीन वर्ष 2021 चे स्वागत गतवर्षाच्या जखमा आठवत नागरिकांनी काहीशा थंडपणे आणि साधेपणानेच केले.

मागील वर्षी 2020 ची सगळ्यांनाच उत्सुकता होती. एकविसाव्या शतकातील दुसरे दशक पूर्ण होत असल्याने या वर्षाबद्दल अनेकांनी मंगल कामना आणि अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. पण, हे शतकातील काही मोजक्‍या अतिशय वाईट वर्षांपैकी एक ठरले. 2020 चा जानेवारी महिना उलटत नाही तोच चिनमध्ये जन्मलेल्या कोरोना (कोविड -19) या विषाणूने हाहाकार उडवून दिला. मार्चपासून भारतातही त्याचे आगमन झाले. त्यानंतर जंगलात वणवा पेटावा तसा हा विषाणू भयंकर वेगाने पसरत गेला. 

महानगरांत भाकरीचा चंद्र शोधायला गेलेल्या मजुरांना, इतर चाकरमान्यांना आपल्या स्वगावी परतण्यासाठी कित्येक किलोमीटरची पायपीट सहन करावी लागली. आपल्या निरागस लहानग्यांना कवेत घेऊन, डोक्‍यावर सामानाचे ओझे घेऊन अन्नपाण्याविना शेकडो किमी अंतर कापणाऱ्या बेहाल जत्थ्यांची प्रसारमाध्यमातील छायाचित्रे सर्वांचेच हृदय पिळवटणारी ठरली. 

कोरोनाने अनेकांचे आप्तस्वकीय हिरावून नेले. आपल्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीला, सख्या आई, वडिलांना, भाऊ, बहिणीला त्यांच्या मृत्यूनंतर भडाग्नी देण्याचा हक्‍कसुद्धा या कोरोनाने हिरावून घेतला. संसर्गाच्या भीतीने माणसे माणसांपासून दुरावली. पण, याच काळात अनेकांनी माणसूकी जपत इतरांना मदतही केली. आरोग्य विभाग, पोलिस विभाग, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी अशा अनेकांनी कोविडच्या रणक्षेत्रात आपली भूमिका प्रामाणिकपणे बजावत कोरोनायोद्‌ध्याची भूमिका पार पाडली. यातील अनेकजण निष्ठेने कर्तव्य बजावताना कोरोनाचे बळी ठरले. 

या शहीद कोरोनायोद्‌ध्यांच्या हौतात्म्याच्या दु:खाची किनारही नव्या वर्षाच्या स्वागत सोहळ्यात होती. अनेकांना जीवघेणे दु:ख देणाऱ्या 2020 तील कोरोनाने काही चांगली कामेही केली. खूप पैसा, गाडी, बंगला म्हणजे श्रीमंती नव्हे, अगदी कमीतकमी गरजांमध्ये माणूस जगू शकतो हे शिकवले, गरज नसताना उगाच भटकणारी, कट्ट्यावर गप्पा मारत वेळ घालवणारी, विनाकारण देशविदेशात भटकंती करत फिरणाऱ्यांनाही सजगता दिली, सरकारने घोषित केलेल्या लॉकडाउनच्या काळात सर्व सृष्टीवर राज्य करण्याची मनिषा बाळगणारा माणूस घरात कैद झाला आणि पशू, पक्षी मुक्त फिरत होते. त्यातूनही मानवी अहंगंडाला तडे गेले. कैद झालेल्या माणसाला स्वातंत्र्याची किंमत थोडी का होईना कळली. 

पण, 2020 च्या वर्षभराच्या आठवणी विसरण्याजोग्या नाहीतच. त्यामुळे कोरोनाचे संकट टळले नसून पुन्हा त्याचे नवे अवतार येत आहेत. म्हणूनच सरकारने कोणत्याही सार्वजनिक उत्सवावर कडक निर्बंध घातल्याने 31 डिसेंबरची थर्टी फर्स्ट आणि नववर्षाचा पहिला दिवस अनेकांनी साधेपणानेच साजरा केला. व्हॉट्‌सअप, फेसबूक, इन्स्टाग्राम, ट्‌विटर आदी समाजमाध्यमांवर नववर्षाच्या शुभेच्छा, गतवर्षाच्या आठवणी, त्यावरील दु:खाच्या, आनंदाच्या, व्यंगचित्राद्वारे खिल्ली उडवण्याच्या, येत्या काळातील आनंददायी आशांच्या अनेक पोस्टचा महापूर येत होता.

पोलिसांचा पहारा

31 डिसेंबर अर्थात थर्टी फर्स्ट व नववर्षाच्या पहिल्या दिवशी अनेकांना ओली पार्टी करायची सवय असते. त्यासाठी मद्यप्रबंधात अनेकजण मश्‍गुल असतात. त्यांचे मनसूबे उधळून लावण्यासाठी पोलिसांचा कडक पहारा आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागांत नाकेबंदी करण्यात आली असून शहरातील चारही मुख्य मार्गांवर व इतर ठिकाणी पोलिसांची गस्त सुरू आहे. कोरोना महामारीमुळे सरकारने 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली असून 11 वाजतानंतर गटाने घराबाहेर पडण्यास बंदी घातली आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.