गोंदिया : 1 जूनपासून प्रत्येक जिल्ह्यातील कोरानाची गंभीरता घेता तेथील स्थानिक प्रशासनाने काही नियमावली केली आहे. त्यानुसार 30 जूनपर्यंत नागरिकांना लॉकडाउन 5 चे नियम पाळावयाचे आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही यासंबंधीच्या सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात 30 जूनपर्यंत लॉकडाउन कायम राहणार असून, रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील. तसेच सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू राहतील.
वैद्यकीय व्यावसायिक, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, स्वच्छता विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि रुग्णवाहिका यांना फक्त त्यांच्या अनुज्ञेय कामासाठी जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा वाहतुकीस कोणतीही बंधने राहणार नाहीत. तथापि, नागरिकांच्या आंतरजिल्हा व आंतरराज्य हालचालीचे नियमन केले जाईल. अडकून पडलेले मजूर, स्थलांतरित मजूर, भाविक, पर्यटक यांना यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार त्यांच्या मूळ ठिकाणी जाण्यास परवानगी देण्यात येईल. त्याचप्रमाणे श्रमिक रेल्वेद्वारे आणि समुद्री मार्गाने केल्या जाणाऱ्या प्रवासाचे यापूर्वी निर्गमित केलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार नियम केले जातील. परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिक, परदेश प्रवास करणाऱ्या निर्दिष्ट व्यक्ती यांची प्रवासी वाहतूक, परदेशी नागरिकांचे स्थलांतरण, भारतीय समुद्रमार्गे दाखल होणारे व बाहेर जाणारे प्रवासी यांचे नियमन यापूर्वी निर्गमित केलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार यानंतरदेखील केले जाईल. सर्व प्रकारच्या वस्तूंची वाहतूक, मालवाहतूक व रिकामे ट्रक वाहतुकीस परवानगी राहणार असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
नवीन आदेशानुसार सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण केंद्र, कोचिंग क्लासेस पूर्णत: बंद राहतील. मात्र, ऑनलाइन लर्निंग व दुरस्थ पद्धतीने शिक्षण सुरू राहील. आंतरराष्ट्रीय विमान प्रवास (केंद्रीय गृहमंत्रालयाकडून परवानगी मिळालेल्या व्यक्ती वगळून) बंद राहील. स्वतंत्र आदेश व प्रमाणित कार्यपद्धती निर्गमित करून परवानगी देण्यात आलेल्या प्रकरणांचा अपवाद वगळता रेल्वे व स्थानिक विमानाद्वारे प्रवास बंद राहील. सर्व सिनेमा हॉल, जिम्नॅशियम, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार आणि ऑडिटोरीयम, सभागृह यासारखी ठिकाणे बंद राहतील. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक उत्सव व सामुदायिक सभा, परिषदा यांना मनाई राहील. धार्मिक ठिकाणे, सार्वजनिक प्रार्थनास्थळे बंद राहतील. केशकर्तनालये, सलून, ब्युटीपार्लर व स्पा केंद्र बंद राहतील. शॉपिंग मॉल, हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद राहतील. मात्र, या आस्थापनांमधील खाद्यपदार्थांची घरपोच सुविधा अनुज्ञेय राहील.
दुचाकीवरून फक्त एका व्यक्तीला तर तीनचाकी व चारचाकीमधून आवश्यकतेनुसार चालक आणि जास्तीत जास्त 2 व्यक्तींना परवानगी राहील. 50 टक्के प्रवासी क्षमतेचे तसेच सामाजिक अंतर आणि स्वच्छतेचे निकष पाळून जिल्ह्यांतर्गत बस सेवेस परवानगी देण्यात येत आहे. आंतरजिल्हा बससेवेद्वारे प्रवासी वाहतुकीबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आदेशात नमूद केले आहे.
सविस्तर वाचा - सावधान! स्वच्छतागृह ठरत आहेत धोकादायक
"वर्क फ्रॉम फोम' पद्धतीला प्राधान्य
सर्व खासगी कार्यालय प्रमुखांनी शक्यतोवर "वर्क फ्रॉम होम' पद्धतीला प्राधान्य द्यावे. सर्व कार्यालये, आस्थापना येथे थर्मल स्क्रीनिंग, हात धुण्याबाबतच्या सुविधा आणि सॅनिटायझर यांची प्रत्येक प्रवेश आणि निर्गमन केंद्रावर उपलब्धता ठेवावी. कामाचे संपूर्ण ठिकाण, सामायिक सुविधेची ठिकाणे व इतर ठिकाणे जेथे व्यक्तींचा संपर्क येतो; जसे की, दरवाजे हॅंडल्स इत्यादींचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व व्यक्तींमध्ये सामाजिक अंतर राखले जाईल, दोन पाळ्यांमध्ये पुरेसा अवधी, दुपारच्या जेवणासाठी कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने अनुमती देणे याबाबत खबरदारी घ्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.