पुसद (जि. यवतमाळ) : एक दाणा पेरला, तर शंभर दाणे उगवण्याची शक्ती काळ्या मातीत आहे. खरंतर शेती ही राष्ट्राची खरी शक्ती आहे. परंतु, अस्मानी व सुल्तानी संकटामुळे पिके शेतीत कितीही बहरली, तरी घरात शेतीमाल किती पोहोचेल, याचा आता काही नेम राहिला नाही.
पुसद तालुक्यातील धनसळ येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने सिंचनाखाली दोन एकर गहू लावला. ओब्यांची दाटीवाटी झाली. किमान 25 क्विंटल कसदार गहू हाती येईल, अशी अपेक्षा होती. परंतु, अवकाळी पावसाने तडाखा दिला. गहू शेतात झोपला व मळणीनंतर दोन क्विंटल कपाटी लागलेला गहू हाती आला. उमेदीचा शेतकरी संतोष गडदे मोठ्या उपहासाने म्हणाला, "शेतीत पेरला गहू अन् हाती आले जिरे!' या प्रतिक्रियेतून शेतकऱ्यांच्या वास्तव कथा व व्यथा व्यक्त न झाल्या तरच नवल!
पुसद तालुक्यात गेल्या 25 मार्चला अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांची भंबेरी उडाली. खरीप हंगाम बुडाल्यानंतर शेतकऱ्यांची आशा रब्बीवर होती. मूबलक पाण्यामुळे सिंचनाची सुविधा वापरत शेतकऱ्यांनी गहू पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. शेतात मेहनत घेतली. मेहनतीचे फळही दिसून आले. गहू पीक ओंब्यांनी अक्षरश: लदबदले. एकरी किमान दहा क्विंटल गव्हाचे उत्पादन शेतकऱ्यांना अपेक्षित होते. मात्र, अवकाळी पावसाने चांगला तडाखा दिला. वादळी वाऱ्याने गहू जमीनदोस्त झाला. त्यामुळे ओंब्यांमधील गव्हाचे दाणे बारिक राहिले. त्यामुळे उत्पादनात मोठी घट आली. वादळाचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांच्या गव्हाचे उत्पादन एकरी दोन क्विंटलपर्यंत घसरले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
तालुक्यातील धनसळ येथील संतोष गडदे या शेतकऱ्याने दोन एकर गहू पेरला होता. अवकाळी पावसामुळे त्याच्या शेतातील गहू भुईसपाट झाला. कोरोनोच्या याच काळात कृषी यंत्रणा संसर्ग प्रतिबंधक कामात गुंतल्याने त्याच्या शेतीचा पंचनामाही झाला नाही. पडलेल्या गव्हाची राखरांगोळी होऊ नये म्हणून नाईलाजाने त्यांनी मळणी केली. गहू केवळ चार क्विंटल हाती आला. या पिकापासून 50 हजार रुपये उत्पन्नाची अपेक्षा असताना त्याच्या हाती दहा हजार रुपये मिळणे कठीण झाले आहे. या काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे सर्वेक्षण करण्यात आले. परंतु, बरेच शेतकरी वंचित राहिले.
पुसद तालुक्यातील 22 गावांमध्ये 199.6 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकाचे नुकसान झाले. त्यात 435 शेतकऱ्यांचे रब्बी गव्हाचे 162 हेक्टर क्षेत्र आहे. इतर पिकांमध्ये भाजीपाला, हळद, कांदा, संत्रा यांचा समावेश आहे. हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. परंतु, रब्बी पिकांची नुकसान भरपाई मिळू शकेल किंवा नाही, मिळाल्यास केव्हा? यावर आता शेतकऱ्यांचा तर विश्वासच राहिलेला नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.