अमरावती ः शासनाने २३ नोव्हेंबरपासून इयत्ता ९ ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याची तयारी सुरू केली असली तरी अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास आवश्यक त्या उपाययोजनांसाठी कुठलीही आर्थिक तरतूद केली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे बहुतांश ग्रामीण भागात अद्यापही एसटी बसच्या फेऱ्या सुरू झालेल्या नाहीत. अशा स्थितीत शाळेत कसे जावे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडणार आहे.
शासनाने २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्या मानाने शासनस्तरावरून कुठलीही मदत दिली जात नसल्याची बाब समोर आली आहे. ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्यांना शाळेत नेण्या-आणण्यास असमर्थ आहेत. अद्यापही एसटीच्या फेऱ्या अनेक ठिकाणी सुरू झालेल्या नाहीत. शाळांना किमान एक लाख रुपये उपलब्ध करून द्यावेत, या माध्यमातून कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शक्य होईल, असे शिक्षण संस्था चालकांचे म्हणणे आहे.
शुक्रवारी (ता. २०) संस्थाचालकांच्या विदर्भस्तरीय बैठकीत या अनुषंगाने अनेक ठराव घेण्यात आले. बैठकीला राज्य उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, राज्य कार्यवाहक रवींद्र फडणवीस, अमरावती जिल्हा अध्यक्ष कांचनमाला गावंडे, राजाभाऊ देशमुख, योगेश करडे, सुशील इखनकर, विजय कौशल, सचिन जोशी, संतोष मानकर, अशोक चोपडे, प्रवीण दिवे, राजकुमार चैनानी, केशव पाटील, ॲड. दीपक देशमुख, आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
शुक्रवारी (ता.२०) अमरावती जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. शासनाच्या माध्यमाने कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आली नसल्याने शाळा सुरू करणे शक्य नसल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
...तर शाळा सुरू करणार नाही
जोवर शासनाचा सानुग्रह निधी प्राप्त होणार नाही, तोवर शाळेमध्ये ९ ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यास शिक्षण संस्था चालकांनी शुक्रवारी (ता.२०) आयोजित संस्थाचालकांच्या विदर्भस्तरीय बैठकीत असमर्थता दर्शविली आहे.
- कांचनमाला गावंडे, जिल्हाध्यक्ष, शिक्षण संस्था संघ.
संपादन ः राजेंद्र मारोटकर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.