अचलपूर (जि. अमरावती) : अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या मनभंग येथील आदिवासी महिलेला पुढील उपचारासाठी अमरावतीत रेफर केले होते. मात्र, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना चुकवून ती आदिवासी महिला पळून गेल्याची घटना घडली. यामुळे मेळघाटातील आरोग्य कर्मचाऱ्यांना दोन तास घाम फोडला. अखेर मोथा उपकेंद्राच्या डॉक्टरांनी शोध घेऊन बागलिंगा गावातून महिलेला उपचारासाठी डॉ. पिंपळकर यांनी टेम्ब्रूसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
चिखलदरा तालुक्यातील मनभंग गावातील गर्भवती आदिवासी महिलेला अचानक पोट दुखायला लागल्याने डॉक्टरांनी धामणगाव गढी आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, येथे पुरेशी व्यवस्था नसल्याने डॉक्टरांनी उपजिल्हा रुग्णालयात रेफर केले. त्याठिकाणी महिलेची प्रसूती झाली. मात्र, बाळ उपजत मृत जन्माला आले. तर महिलेची प्रकृती चिंताजनक होत गेली. अशातच महिलेला मिरगीचे झटके यायला लागले. त्यामुळे डॉक्टरांनी अमरावती येथे रेफर करण्याचे ठरविले.
याबाबतची माहिती महिलेच्या नातेवाइकांना दिली. त्यानंतर रेफर करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच महिला नातेवाइकाच्या मोटरसायकलवर कर्मचाऱ्यांना चुकवून पळून गेली. त्यानंतर महिलेची शोधाशोध सुरू झाली. मात्र, ती मिळाली नाही. याबाबतची माहिती मोथा उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली. माहिती मिळताच गाव शोधले मात्र काही थांगपत्ता लागला नाही. अखेर आशा सेविकेला महिलेच्या नातेवाईक कोणत्या गावात राहते याची माहिती मिळाली.
त्यानुसार टेम्ब्रूसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या बागलिंगा गावात नातेवाइकांच्या माध्यमातून भगताकडे उपचारासाठी गेल्याची माहिती मिळाली. याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य पाटील यांना दिली. तालुका व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता टेम्ब्रूसोंडा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठविले.
डॉक्टरांनी सुद्धा वेळेचे गांभीर्य ओळखून टीमसह बागलिंगा गाठले आणि महिलेला नातेवाइकांच्या घरून आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र, या दरम्यान उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र ढोले यांनी महिला रुग्णालयातून पळून गेल्याची तक्रार नोंदवली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.