Yavatmal Crime : महागाव तालुक्यात पुन्हा सिनेस्टाईल ‘रोड रॉबरी’ खडका ते गुंज मार्गावरील थरार

चोरी, घरफोडी आणि दरोड्यांच्या घटनांनी महागाव तालुका आधीच हादरला आहे. चिल्ली (ई.) येथील दरोड्याची शाई वाळत नाही तोच शुक्रवारी (ता. १४) रात्री सिनेस्टाईल वाटमारीची घटना घडली.
Yavatmal Crime
Yavatmal Crimesakal
Updated on

महागाव, (जि. यवतमाळ) : चोरी, घरफोडी आणि दरोड्यांच्या घटनांनी महागाव तालुका आधीच हादरला आहे. चिल्ली (ई.) येथील दरोड्याची शाई वाळत नाही तोच शुक्रवारी (ता. १४) रात्री सिनेस्टाईल वाटमारीची घटना घडली. तेलंगणातील निर्मल येथून मासोळी घेऊन निघालेल्या बोलेरो पीक-अप वाहनाला तालुक्यातील खडका ते गुंज रस्त्यावर लुटण्यात आले. या ’रोड रॉबरी’च्या घटनेने पोलिसांच्या निष्क्रियतेची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहेत.

निर्मल येथून बोलेरो पीक-अप (क्र. टीएस ०१ यूसी ६२६२) वाहनात मासोळी भरून, चालक सय्यद शफीक सय्यद अली (वय ४२) आणि वाहक शेख राहील शेख हयात हे किनवट-माहूर मार्गे पुसदकडे जात होते. बोलेरो पीक-अप वाहन रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास खडका फ्लायओव्हर खालून पुढे निघाले असता, एका पांढऱ्या रंगाच्या एमजी हेक्टर या आलिशान वाहनाने बोलेरोचा पाठलाग सुरू केला. गुंज गावालगत पायरीका मंदिराजवळ बोलेरो गाडी अडवून, हेक्टर कारमधून चार शस्त्रधारी व्यक्ती खाली उतरले. बोलेरो वाहनाचा चालक सय्यद शफीक सय्यद अली याच्या कानशीलावर रिव्हॉल्वर ठेवून आणि वाहक शेख राहील यास चाकूचा धाक दाखवून या दोघांना बोलेरोमधून जबरदस्तीने खाली उतरण्यास भाग पाडले. त्यानंतर या दोघांना रस्त्याच्या बाजूला नेत, चिकट टेपने त्यांचे तोंड बांधण्याचा प्रयत्न झाला. ते टेपने बांधता येत नसल्याने नायलॉन दोरी काढून लुटारुंनी चालक व वाहकाचे हातपाय बांधले व रुमालाने तोंड आवळले.

‘अब यही सो जावो, नही तो गन से उडा देंगे‘अशी धमकी देत चार अनोळखी लुटारुंनी बोलेरो चालकाच्या खिशातील १८ हजार रुपये आणि तेरा हजार रुपये किमतीचा मोबाईल काढून घेतला. तसेच वाहकाच्या खिशातील नऊ हजार रुपयेसुद्धा हिसकावण्यात आले. त्यानंतर बोलेरो वाहन आणि त्यातील १६ क्विंटल मासोळी, असा एकूण दहा लाख ४० हजारांचा मुद्देमाल घेऊन भामटे पसार झाले. वाहक शेख राहील हा महत्प्रयासाने हाताची दोरी सोडून चालकापर्यंत पोहोचला व त्याची सुटका केली.

घटनास्थळी मदतीला कोणीच नसल्यामुळे चालक सय्यद शफीक आणि वाहक शेख राहील हे पायी चालत गुंज बसस्थानकावर पोहोचले. तेथून पोलिस ठाण्याचा फोन नंबर घेऊन त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस लगेच घटनास्थळी पोहोचले. पंचनामा व अन्य सोपस्कार उरकून पोलिसांनी अनोळखी लुटारू विरोधात गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंतराव गायकवाड हे महागाव ठाण्याची पोलिस यंत्रणा घेऊन घटनास्थळी तळ ठोकून आहेत. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी श्‍वानपथक आणि फिंगर प्रिंट एक्स्पर्टस्ना बोलावण्यात आले आहे.

पाळत ठेवून बोलेरो वाहन लुटले

एमजी हेक्टरसारख्या आलिशान कारमधून आलेल्या लुटारूंनी, मासोळी वाहतूक करणारे बोलेरो वाहन पायरीका देवीच्या पायथ्याशी लुटले. निर्मल येथून मासोळी घेऊन बोलेरो केव्हा निघाली, ती गुंज गावाजवळ केव्हा पोहोचेल, नेमका खडका ब्रीज खालून वाहनाचा पाठलाग कसा करायचा, याचा पूर्वनियोजित प्लॅन करून ही रोड रॉबरी करण्यात आल्याचे दिसत आहे. बोलेरो चालक व वाहकास टेप आणि दोरीने बांधून, तसेच रुमालाने तोंड आवळून ही धाडसी वाटमारी करेपर्यंत या मार्गावरून कोणतेच वाहन गेले नाही काय० आणि या गंभीर घटनेचा साधा संशयही एखाद्या वाहनचालकास आला नाही काय० याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.