महागाव (जि. यवतमाळ) : गोकुळवाडी सशस्त्र दरोडा प्रकरणात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जखमी महिलांनी दिलेल्या वर्णनाच्या आधारे स्केच तयार केले आहे. सर्व पोलिस ठाण्यात चित्र पाठविण्यात आले आहे. दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी मंगळवारी (ता.११) अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप दिवसभर तळ ठोकून होते.
महागाव तालुक्यातील गोकुळवाडी येथे शनिवारी (ता.आठ) मध्यरात्री दरोडेखोरांनी शेतातील घरावर सशस्त्र दरोडा टाकत तीस लाखांची रोकड आणि १७ तोळे सोन्याचे दागिने लुटले. यावेळी घरातील महिलांना लोखंडी रॉड आणि लाकडी राफ्टरने मारहाण केली. या खळबळजनक घटनेने जिल्हा पोलिस प्रशासन चांगलेच हादरले आहे. अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप यांनी मंगळवारी (ता.११) उमरखेड येथे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या कक्षात बैठक घेतली. बैठकीला उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड, महागावचे ठाणेदार सोमनाथ जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक मिलिंद सरकटे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी हजर होते. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे.
गुन्हेगारांनी मोबाईलचा वापर केला, त्यामुळे त्यांचे लोकेशन ट्रेस करण्यासाठी सायबर सेलचीही मदत घेतली जात आहे. काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. परंतु फारसे काही निष्पन्न न झाल्याने त्यांना सोडून देण्यात आले. दरोड्यात सहभागी असल्याचा संशय असणाऱ्या चौघा संशयितांचे कॉल डिटेल्स काढण्यात येत आहेत. फुलसावंगी, महागाव, काळी (दौलत) आणि उमरखेड येथील आरोपी असल्याचा पोलिसांना संशय आहे. गुन्हेगारांचा तपास लावण्यासाठी फिंगर प्रिंट एक्स्पर्टची मदत घेतली जात आहे.
गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिसांची पाच पथके गठित करण्यात आली असून, सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात आहेत. दरोडेखोरांनी बंदूक आणि तलवारीसारखे घातक शस्त्रेही वापरली. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे.
सहा पथके घेत आहेत शोध
महागाव तालुक्यातील सर्वांत मोठी सशस्त्र दरोड्याची घटना चिल्ली गोकुळवाडी येथे घडली. यामध्ये आरोपींनी अग्निशस्त्रासह तलवारीचा वापर केल्याने या गुन्ह्याची तीव्रता आणखी वाढली आहे. आरोपींना अटक करून या प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. पोलिस प्रशासनाने सहा पथके तैनात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.