यवतमाळ : एसटी संपाचा रोजीरोटीवर परिणाम; ऑटोचालकांची आर्थिक कोंडी

एसटीच्या प्रवाशांवर अवलंबून असलेल्या ऑटोचालकांच्या रोजीरोटीवरही या संपाचा परिणाम झाला आहे.
यवतमाळ : एसटी संपाचा रोजीरोटीवर परिणाम; ऑटोचालकांची आर्थिक कोंडी
यवतमाळ : एसटी संपाचा रोजीरोटीवर परिणाम; ऑटोचालकांची आर्थिक कोंडीsakal
Updated on

यवतमाळ : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनिकरणासाठी एसटीचे कर्मचारी 25 दिवसांपासून संपावर आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून, सर्वच क्षेत्रांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. एसटीच्या प्रवाशांवर अवलंबून असलेल्या ऑटोचालकांच्या रोजीरोटीवरही या संपाचा परिणाम झाला आहे. त्यामुळे आर्थिक कोंडी झाल्याने पेट्रोल खर्चासह कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालविणे कठीण झाल्याची खंत ऑटोचालकांची आहे.

एसटीचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे भाऊबीजेपासून एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हटल्या जाणार्‍या ‘लालपरी’ची चाके जागेवरच असल्याने तिच्यातून प्रवास करणार्‍या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. शिवाय शाळा-महाविद्यालयांत जाणार्‍या विद्यार्थी-विद्यार्थिनींनाही ये-जा करताना अडचणी येत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

यवतमाळसह जिल्ह्यातील पुसद, दारव्हा, उमरखेड, दिग्रस, नेर, राळेगाव, पांढरकवडा व वणी या नऊ आगारांमधून दररोज चारशे ते साडेचारशे बसगाड्यांच्या दोन हजारांवर फेर्‍या व्हायच्या. त्यातून प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्याही 50 हजारांवर होती.

यवतमाळ : एसटी संपाचा रोजीरोटीवर परिणाम; ऑटोचालकांची आर्थिक कोंडी
सायकलपट्टूने पुनित राजकुमार यांना अनोख्या पद्धतीने वाहिली श्रध्दांजली

मात्र, 25 ते 26 दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे बससेवाच बंद आहे. त्यामुळे शहरात प्रवासीच येत नसल्याने ऑटोचालकांच्या रोजीरोटीवर त्याचा थेट विपरीत परिणाम झाला आहे. बससेवा सुरू असताना दिवसाला पेट्रोल खर्चवगळता चारशे ते पाचशे रुपये मिळायचे. परंतु, जवळजवळ महिनाभरापासून प्रवाशांची ये-जाच थांबल्याने दिवसाला 100 रुपये मिळणेही मुश्किल झाले आहे. शिवाय त्यामधून ऑटोरिक्षेच्या पेट्रोलखर्चासह कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालविणेही कठीण जात आहे, अशी खंत ऑटोरिक्षाचालकांनी ‘सकाळ’जवळ व्यक्त केली.

"खरं तर शासनाने एसटी कर्मचारी यांची वेतनवाढ केली आहे. त्यामुळे संप आता मिटला पाहिजे. कारण एसटी प्रवाशांची ये-जाच थांबल्याने आमच्या व्यवसायावर त्याचा थेट परिणाम झाला. गेल्या महिनाभरापासून कुटुंबीयांचा दैनंदिन खर्चासह उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले आहे."

- सुनील यादवराव नेरकर, ऑटोचालक, नवीन बसस्थानक थांबा, यवतमाळ

"यवतमाळ बसस्थानकावर काल सोमवारी धामणगाव, आर्णी, घाटंजी व राळेगाव येथूनच बस आल्या. आंध्र प्रदेशातील आदिलाबाद आगारातून आदिलाबाद-यवतमाळ या बसच्या सकाळी नऊ वाजता, अकरा, दुपारी चार व सायंकाळी साडेपाच वाजता एवढ्याच फेर्‍या झाल्या. मात्र, आपल्या राज्यातील व परजिल्ह्यांतील बसफेर्‍या बंद असल्याने पेट्रोलचा खर्च निघणेही आता कठीण झाले आहे."

- सय्यद शौकत सय्यद बुरान, ऑटोचालक, नवीन बसस्थानक थांबा, यवतमाळ

"एसटी कर्मचारी संपाचा आमच्या दैनंदिन रोजीरोटीवर 50 टक्के विपरीत परिणाम झाला आहे. कारण आम्ही शहरांतर्गत प्रवाशांची ने-आण करतो. म्हणून बाहेरगावांहून बसगाड्याच येत नसल्याने आमची आर्थिक कोंडी झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून आमचा घरसंसार चालविणे आता मुश्किल झाले आहे."

- चंद्रमणी गजरे, ऑटोचालक, संविधान चौक, यवतमाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.