यवतमाळ :- “बाळ दत्तकसाठी उपलब्ध आहे, निसंतान लोकांनी संपर्क साधावा” असा मेसेज राज्यात व्हायरल होत होता. सदर मेसेज अकोला येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांनी वाचल्यावर त्यांनी संदेश गांभीर्याने घेवून व्हायरल मेसेजची खात्री करण्यासाठी डमी पालक म्हणून सदर महिलेला फोन केला. त्या आधारे महिला हि वणी येथील रहिवासी असून आर्थिक लाभाच्या लालसेने बाळ देण्यास तयार झाली. त्यानंतर यवतमाळ व अकोला येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांनी आणि महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांनी स्टिंग ऑपरेशनची कार्यवाही करण्याचे नियोजन केले.
विशेष म्हणजे अकोला बाल कल्याण समिती अध्यक्ष व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी स्वतः डमी पालक बनून बाळ ताब्यात घेवून व्यवहार केल्याचा यावेळी बनाव केला व इशारा मिळताच पोलीस पथकाने धाड टाकून २१ दिवसाच्या नवजात मुलीची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीस ताब्यात घेवून कारवाई केली. यामध्ये अकोला आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांच्या बाल संरक्षण यंत्रणांनी योग्य समन्वय साधत मोठा अनर्थ टाळला. या प्रकरणातील मध्यस्थी महिला हि वणी येथे बेटी फाऊडेशन नावाने संस्था चालवीत असून तिने त्याच परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबात चौथी मुलगी झाली व कुटुंबाची अत्यंत हालाखीची परिस्थिती असल्याने त्याचा फायदा घेत. पालकाना बाळ देण्याकरिता प्रवृत्त केले.
पोलीस पथकाने वेळीच प्रसंगावधान राखून सर्व टोळीस जेरबंद केले व सहा आरोपीस अटक केली. संबधितावर भा.द. सं. ३७० व बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ च्या कलम ८१ व ८७ अन्वये संबधीत सदस्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. बाळाला ताब्यात घेवून बाल कल्याण समिती यांच्या आदेशाने सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले.
या कार्यवाहीस मा. जिल्हाधिकारी- श्री अमोल येडगे आणि मा. पोलीस अधीक्षक श्री. दिलीप भुजबळ पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती ज्योती कडू यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व दोन्ही जिल्ह्यातील बाल संरक्षण यंत्रणा व पोलीस विभाग यांच्यामुळे समन्वयाने हे स्टिंग ऑपरेशन यशस्वी झाले व बेकायदेशीर रीत्या बालकाची विक्री करणा-या टोळीस अटकाव करून मोठा अनर्थ टाळल्या गेला.
सदर कार्यवाही हि अध्यक्ष- बाल कल्याण समिती यवतमाळचे- अॅड सुनील घोडेस्वार, अध्यक्ष- बाल कल्याण समिती अकोलाच्या श्रीमती पल्लवी कुलकर्णी, अकोलाचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी- श्री. राजू लाडुलकर, यवतमाळ चे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी- देवेंद्र राजूरकर, जिल्हा परिविक्षा अधिकारी- श्री गजानन जुमळे, महिला व बाल विकास कर्मचारी- रविंद्र गजभिये, सामाजिक कार्यकर्त्या वनिता शिरफुलें, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष चे पोलीस निरीक्षक- श्री बबन कराळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक- श्री विवेक देशमुख, बाल अत्याचार प्रतिबंधक कक्षच्या सहा. पोलीस निरीक्षक- शुभांगी आगाशे तसेच पोलीस कर्मचारी अरविंद बोबडे, अशोक आंबीलकर, अर्चना मेश्राम, प्रमिला ढेरे, उल्हास कुरकुटे, किशोर झेंडेकर, सलमान शेख, देवेंद्र गोडे याचे कारवाईसाठी सहकार्य लाभले.
“अवैधरीत्या, कोणत्याही कारणाने बालकाची खरेदी व विक्री हा गंभीर गुन्हा आहे त्यामुळे कोणत्याही आमिषास नागरिकाने बळी पडू नये, अश्या प्रकारे कोणत्याही कारणाने बालकाची खरेदी विक्री होत असल्यास अथवा बेकायदेशीर दत्तक प्रक्रिया होत असल्यास महिला व बाल विकास विभाग, २ रा मजला, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे अथवा १०९८ चाईल्ड लाईन या हेल्प लाईन वर माहिती द्यावी.” असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, श्रीमती ज्योती कडू यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.