नागपूर : राज्यातील कोणत्या प्राणी संग्रहालयात कोणते वन्यप्राणी, पक्षी आहेत याची माहिती आता एका क्लिक वर मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण लवकरच यासाठी एक ‘ॲप’ तयार करीत आहे. त्यामुळे इतर राज्यांसह राज्यातील प्राणी संग्रहालयाला हवे असलेले वन्यप्राणी कुठे अतिरिक्त आहे हे कळून देवाण घेवाण करणे सोपे होणार आहे.
राज्यातील विविध प्राणी संग्रहालयांच्या व्यवस्थापनात एकवाक्यता यावी आणि केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणशी प्रभावी समन्वय साधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण २०१५ मध्ये स्थापन करण्यात आले. वन्यजीव व्यवस्थापन व संरक्षण ही एक संवेदनशील बाब आहे.
मानव-वन्यजीव संघर्षाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात वनविभागामार्फत तीन व इतर यंत्रणांमार्फत ११ प्राणी संग्रहालये चालविण्यात येतात. राज्यातील सर्व प्राणी संग्रहालयाचे काम व्यवस्थित व सुरळीतपणे चालवण्याकरिता कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा व पश्चिम बंगालच्या धर्तीवर महाराष्ट्रात प्राणी संग्रहालय स्थापन करण्यात आले होते.
शासकीय प्राणी संग्रहालयात विकास आराखड्याप्रमाणे कामे महाराष्ट्र शासनाच्या व केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणच्या निर्देशान्वये कार्यान्वित करणे, राज्यात महापालिका व खासगी संस्थांकडून निर्मिती करण्यात आलेल्या मान्यताप्राप्त प्राणी संग्रहालयाचे नियंत्रण, तसेच नियमन, संकटग्रस्त प्राण्यांचे संवर्धन व प्रजनन, वन्यप्राणी आरोग्य व व्यवहारासंबंधी संशोधन कार्यक्रम इतर संस्था, प्रयोगशाळांच्या समन्वयाने कार्यान्वित करणे, राज्यातील प्राणी संग्रहालयांकरिता इतर राज्य व विदेशातून विक्री, तसेच अदलाबदलीद्वारे प्राणी उपलब्ध करून देणे, वने व वन्यजीव संवर्धन, प्राणी संग्रहालयांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे, जनतेत व वन्यप्राण्यांबाबत आवड निर्माण करण्याकरिता जनजागृती करणे ही या प्राधिकरणच्या स्थापनेमागील प्रमुख उद्दिष्टे आहेत.
कोलकात्यात पहिले प्राणी संग्रहालय
अठराव्या शतकाच्या अखेरीस इंग्रजांचे भारतावर राज्य होते. बडे इंग्रज अधिकारी, कर्मचारी भारतात रहायचे. या सर्वांसाठी आणि त्यांच्या मुलाबाळांसाठी करमणुकीचे काही साधन असावे, वन्यप्राणी, पक्षी हे सारे त्यांना पाहता यावे, या उद्देशाने कोलकाता येथे १८५४ मध्ये द मार्बल पॅलेस प्राणिसंग्रहालय स्थापन करण्यात आले. विविध प्रकारच्या पशु-पक्ष्यांची तेथे रेलचेल होती. त्या काळात हे संग्रहालय आकर्षणाचे मोठे केंद्र होते. अशा प्रकारची प्रथमच संकल्पना असल्याने सहाजिकच त्याविषयी अनेकांना अप्रूप होते.
राज्यातील अनेक प्राणी संग्रहालयात अतिरिक्त वन्यप्राणी आहेत. मात्र, त्याची माहितीच उपलब्ध नाही, तसेच इतर राज्यांकडून प्रधान मुख्यवनसंरक्षक (वन्यजीव) विभागाकडे अतिरिक्त वन्यप्राण्यांची मागणी केली जाते. त्यांच्याकडून प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडे विचारणा होते. परंतु, कोणत्या प्राणी संग्रहालयांमध्ये किती वन्यप्राणी, पक्षी आहेत.
याबाबत कुठलीही माहिती आमच्याकडे नसल्याने सर्वच प्राणी संग्रहालय प्रशासनाकडून तशी विचारणा करावी लागते. त्यानंतरच कोणते वन्यप्राणी अतिरिक्त आहेत, हे कळते. त्याला बराच कालावधी जातो. ही अडचण लक्षात घेऊनच प्राणी संग्रहालयाने ॲप विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर सर्वच प्राणी संग्रहालयात असलेल्या प्राण्यांची संख्या, क्षमता, अतिरिक्त वन्यप्राणी आदीची माहिती एकाच क्लिकवर मिळणार आहे.
- डॉ. प्रभुनाथ शुक्ल
सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.