अमरावती : कोणत्याही कलेला अंत नाही, असे म्हटले जाते. कुंचल्याच्या मदतीने विविध कलाकृती साकारणारे ही कला जिवंत ठेवण्याचे कार्य करीत असतानाच आधुनिकतेची कास धरीत स्प्रे पेंटिंगच्या माध्यमाने अनेक भिंती सुशोभित करण्याचे कार्य परतवाडा येथील राजेश शिंपी या कलावंताने केले आहे.
स्प्रे पेंटिंगच्या माध्यमाने चित्र काढून त्यात रंग भरणे हे सोपे काम नाही. त्यासाठी कष्टासोबतच एकाग्रता, मेहनत व चिकाटीची नितांत गरज असते. यासोबतच भिंतींवर अशी कला साकारणे अतिशय कठीण असतानाही परतवाडा येथील राजेश शिंपी यांनी हे अवघड काम करून त्यातून आनंद घेण्याची कलासुद्धा आत्मसात केली आहे. अतिशय हसतमुख असलेल्या तसेच आपल्या कलेप्रती प्रचंड प्रेम असलेल्या राजेश शिंपी यांनी लहानपणापासूनच वडिलांकडून चित्रकला अवगत केली. याच क्षेत्रात करिअर करण्याचे त्यांनी निश्चित केले व स्प्रे पेंटिंगचे नवे क्षेत्र निवडले. अमरावतीच नव्हे तर बुलडाणा, वाशीम, नागपूर, पुणे तसेच अनेक महानगरांमध्ये त्यांनी स्प्रे पेंटिंगच्या माध्यमाने अनेकांचे चित्र रेखाटले आहे. त्यामुळे चांगले आर्थिक उत्पन्नसुद्धा मिळते व आपले कुटुंब या व्यवसायाच्या जोरावरच चालते, असे राजेश यांनी सांगितले.
विशेष म्हणजे ही कला आपल्यापुरती मर्यादित राहू नये यासाठीसुद्धा ते प्रयत्न करीत आहेत. एटीडी तसेच चित्रकलेची आवड असलेले अनेक युवक-युवती त्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, योग्य दिशा दाखविणे तसेच मदत करण्याचे काम त्यांनी केले आहे.
बडनेरा आणि अकोला रेल्वेस्थानकावरील सुशोभिकरण, गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील चित्रे, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालयात करण्यात आलेले सुशोभिकरण ही राजेश शिंपी यांचीच कमाल आहे. पशु-पक्षी, प्राणी, सजीव सृष्टी, राष्ट्रीय नेते तसेच आपण सांगाल ते चित्र स्प्रे पेंटिंगच्या माध्यमाने साकारण्याची क्षमता या युवकाने विकसित केली आहे.
प्रत्येक चित्र जिवंत वाटावे यासाठी प्रचंड मेहनत घेतली जाते. त्यामुळे एक चित्र एकाच दिवसात पूर्ण होईलच हे सुद्धा सांगता येत नाही. कधी-कधी दोन-चार दिवस सुद्धा लागू शकतात. त्यासाठी एकाग्रता व जीव ओतून काम करावे लागते.
- राजेश शिंपी, परतवाडा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.