दर्यापूर (जि. अमरावती) : शेततलावात आंघोळीसाठी गेलेल्या थिलोरी येथील युवकाचा बुधवारी (ता. 30) बुडून मृत्यू झाला. त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन दिवसांपासून शहानूर धरणाच्या पाईपलाइनचे काम सुरू आहे. त्यामुळे दर्यापूर तालुक्यामध्ये पाणीपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. घरी आंघोळीला पाणी नसल्यामुळे थिलोरी येथील युवक दीपक आनंद टापरे (वय २३) हा शेततलावामध्ये आंघोळीसाठी बुधवारी १२ वाजताच्या सुमारास गेला होता. आंघोळ करीत असताना युवक तलावाच्या मध्यभागी जाऊन पाण्यात बुडून मृत्युमुखी पडला.
दीपकने अंगावरील कपडे हे तलावाच्या काठावर बाहेर काढून ठेवले होते. तलावाजवळून काही शेतकरी घरी येत असताना त्यांना मृताचे कपडे एका बाजूला ठेवले असल्याचे दिसून आले. मात्र, तलावामध्ये कोणीच आंघोळ करीत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. सदर घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात शेततलावावर गर्दी केली होती. काही तासांनंतर हा युवक कोण आहे? त्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली.
तहसीलदार योगेश देशमुख यांनी अमरावती येथील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूला पाचारण केले. मात्र, चमू येण्यापूर्वीच दर्यापूर येथील तीन युवक अवधूत नांदणे, रामेश्वर कुरवाडे व उमेश नांदणे यांनी तलावामध्ये उडी घेऊन सदर मृत युवकाचा शोध घेतला.
मृतदेहाला दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले. मृत दीपकच्या मागे आईवडील, भाऊ-बहीण आहे. घटनास्थळी तहसीलदार योगेश देशमुख, ठाणेदार तपन कोल्हे, तलाठी विजय वाघमारे, कृषी सहायक कोरडे, पोलिस पाटील आनंद वर्धे व प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
संपादन - नीलेश डाखोरे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.