रेल्वे चुकली अन् तरुणाला सापडला उद्योगाचा मार्ग; आता करतोय हजारोंची उलाढाल

youth gets thousands of turnover through fodder production industry in amravati
youth gets thousands of turnover through fodder production industry in amravati
Updated on

अमरावती : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणाची रेल्वे चुकली. मिळणारी नोकरी गमावण्याची वेळ आली. दुसरी गाडी येण्याची प्रतीक्षा करताना मोबाईलमध्ये असंच सर्चिंग सुरू होतं. त्यावेळी याच रेल्वेस्थानकाजवळ एक उद्योग संस्था असल्याचे समजले आणि नोकरीच्या शोधात निघालेला तरुण उद्योजक बनला. ही प्रेरणादायी कहाणी आहे, अमरावतीच्या अजय किसनराव ढोकणे या तरुणाची.

अजय संगणक शाखेतून पदवीधर झाल्याने जानेवारी महिन्यात नोकरीच्या शोधात दिल्लीला निघाला. मात्र, गाडी चुकली आणि झांशी रेल्वेस्थानकावर दुसऱ्या गाडीची प्रतीक्षा करू लागला. त्यावेळी चारानिर्मिती संस्थेची माहिती मिळाली. उद्योगाबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी त्याने थेट संस्थेला भेट दिली. ही माहिती घेऊन आपल्या शेतकरी मामाला द्यायची, असा विचार त्याने केला. पण, मामासोबत आपणही या उद्योगात सहभागी का होऊ नये, असाही विचार डोक्यात आला. त्याने दिल्लीला जाणे रद्द केले. त्या उद्योगाची सविस्तर माहिती घेतली आणि थेट मामाचे गाव गाठले. नांदगावखंडेश्‍वर तालुक्‍यातील जामठी जामपूर हे त्याच्या मामाचे गाव. परत आल्यावर त्याने ही माहिती मामाला सांगितली. विचार पटलेत आणि एका उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या कामात त्याला धाकटा भाऊ अक्षयचीही साथ मिळाली. 

लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या तरुणांना दिला रोजगार -
गावात सुमारे अडीचशे एकर शेती त्यांनी मक्‍त्याने घेत मका पिकाची पेरणी केली. त्यापासून चारानिर्मितीचा उद्योग उभारण्यासाठी लागणारे यंत्र खरेदी करण्याची आर्थिक क्षमता नव्हती. त्यामुळे त्यांनी यंत्र तेलंगणामधून भाड्याने आणले. गावठाणाच्या जागेवर उद्योगाची पायाभरणी केली. दरम्यान, कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर मार्चमध्ये लॉकडाउन सुरू झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. बेरोजगार तरुण गावाकडे परत येऊ लागले. जामठी गावाच्या परिसरातील या बेरोजगार तरुणांना अजय ढोकणेच्या चारनिर्मिती उद्योगाने आश्रय दिला. सद्यःस्थितीत पन्नासवर तरुण या उद्योगात नोकरी करत आहेत. 

जानेवारी महिन्यापासून सुरू झालेल्या या चारानिर्मिती उद्योगाने आता चांगलीच प्रगती केली आहे. मक्याची शेती घेतल्याने स्थानिक शेतकऱ्यांना महसूल मिळण्यासोबतच बेरोजगारांना रोजगार मिळाला. कॉर्न साइलीज या उद्योगामुळे पशूंच्या चाऱ्याचा प्रश्‍न मिटला. तसेच त्यांना पौष्टिक व सकस आहार उपलब्ध झाला आहे. मका 70 ते 80 दिवसांचे पीक असून चारा वर्षभर टिकत असल्याने व पौष्टिक असल्याने मोठी मागणी आहे. आत्मविश्‍वास, इच्छाशक्तीच्या जोरावर अजय व अक्षय ढोकणे यांनी मक्‍यापासून कॉर्न साइलीज या चारानिर्मिती उद्योगाची उभारणी करून सुशिक्षित बेरोजगारांना आत्मनिर्भर होण्याचा मार्ग दाखवला आहे. 

अशी केली जुळवाजुळव - 
उद्योगाची उभारणी करताना आर्थिक बाबीसह यांत्रिक व तांत्रिक अडचणीही आल्या. आर्थिक पाठबळासाठी जवळ असलेला पैसा, मित्रांकडून उसनवारी व क्रेडिट कार्डचा आधार घेत जुळवाजुळव केली. शेती व यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर घेत या अडचणींवर मात केली. स्थानिक बाजारपेठेसह छत्तीसगड, ओडिसा, गुजरात या प्रांतात चारा निर्यात करून विपणनाचा मार्ग मिळवला, असे अजय ढोकणे यांनी सांगितले. 

संपादन - भाग्यश्री राऊत
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.