मरताना 'प्रद्युम्न'ने जोडली तीन राज्यांची नाळ, दिले सहा जणांना जीवदान

youth give life to six people by donating organs in nagpur
youth give life to six people by donating organs in nagpur
Updated on

नागपूर : लॉकडाउनच्या काळात राज्याच्या सर्व सीमा बंद होत्या. यामुळे अवयवदानही थांबले होते. तब्बल नऊ महिन्यानंतर ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून तीन राज्यांमध्ये एकमेकांच्या सहकार्यातून झालेल्या युवकाच्या अवयदानातून सहा जणांना जीवनदान देण्यात आले. दुर्ग जिल्ह्यातील तरुणाच्या अवयवदानातून छत्तीसगड, गोवा आणि महाराष्ट्र अशा तीन राज्यांची नाळ जोडण्याचा नागपुरातील पहिलाच प्रयत्न यशस्वी ठरला आहे. 

२१ वर्षीय प्रद्युम्न मेंदूमृत्यू झाला. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, दुःख बाजुला ठेवून अवयवदानाचा निर्णय घेत इतरांच्या आयुष्यात उजेड पेरण्याचा समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला. प्रद्युम्नचे हृदय मुंबईच्या दिशेने झेपावले, तर तेलंगणात राज्यात फुप्फुस तर उपराजधानीत यकृताचे प्रत्यारोपण करण्यात आले. विशेष असे की, नागपूर विमानतळावर यकृत पोहोचल्यानंतर न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये अवघ्या चार मिनिटांत पोहोचले. छत्तीसगड येथील दुर्ग जिल्ह्यातील प्रद्युम्नचा १ डिसेंबर रोजी गोवा राज्यात अपघात झाला. प्रद्युम्नच्या मेंदूला दुखापत झाली. तत्काळ गोवा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याच्यावर उपचार करणारे गोवा येथील डॉ. प्रिती वर्गिस यांनी प्रद्युम्नच्या मेंदूपेशींचा मृत्यू (ब्रेन डेड) होत असल्याचे सांगितले.

डॉ. वर्गिस यांनी कुटुंबीयांना अवयवदानासंदर्भात नातेवाइकांचे समुपदेशन केले. नातेवाइकांनी दिलेल्या संमतीनंतर लेखी परवानगी घेत डॉक्टरांनी पुढील कायदेशीर प्रक्रिया केली. अवयव रिट्रायव्हल मोहिमेतून छत्तीसगड, गोवा आणि महाराष्ट्र या तीन राज्यात एकत्र काम करण्याचे मोलाचे प्रयत्न नागपूरच्या विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, डॉ. संजय कोलते तसेच समन्वयक विणा वाठोरे यांनी केले. तीन राज्यांमध्ये एकाच वेळी संयुक्तपणे राबविण्यात आलेली अवयवदानाची ही पहिलीच मोहीम आहे. 

देश बंद मात्र यकृतासाठी उभारला ग्रिन कॉरिडॉर -
गोवा विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीने केंद्र आणि राज्यांच्या समन्वय समित्यांना हाय अलर्ट जारी केला. पहिल्यांदाच अवयवांची राष्ट्रीय प्रतीक्षा यादी तपासण्यात आली. मुंबई राजधानीतील एक रुग्ण हृदयाच्या तर, उपराजधानीतील एक जण यकृताच्या प्रतीक्षेत होता. याशिवाय तेलंगणा येथे एक जण फुफ्फुसच्या प्रतीक्षा यादीत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर उपराजधानीतील यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना, बधिरीकरण तज्ज्ञ. डॉ. साहिल बंसल, डॉ. स्नेहा खाडे यांच्या वैद्यकीय पथकाने सोमवारी गोवा गाठला. दरम्यान विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते, सचिव डॉ. विभावरी दाणी यांनी तत्काळ ग्रीन कॉरिडॉर उभारण्यासाठी नागपूर पोलिसांशी संपर्क साधला. मंगळवारी देशभरात बंद असतानाही दुपारी १२ वाजून ४४ मिनिटाला खास विमानाने यकृत उपराजधानीत दाखल झाले. पोलिस उपायुक्त सारंग आव्हाड, सुनील जाधव, राहुल सदाशिवन, सुजाता यादव यांच्या टीमने विमानतळ ते लकडगंज येथील न्यू इरा रुग्णालयापर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार केला. अवघ्या ४ मिनिटांत यकृत विमानतळावरून रुग्णालयात पोहोचले. रात्री उशिरापर्यंत यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.