Hingna : तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या मोहगाव (झिल्पी) तलावावर वीक एंडच्या दिवशी रविवारी दिवसभर प्रेमीयुगलांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून आली. चार चाकी वाहनांची तलावात रीघ लागली होती. मागील आठवड्यात पाच जणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्यानंतर प्रेमीयुगलांची वाढणारी गर्दी चिंतेचा विषय ठरली आहे.
हिंगणा तालुक्यातील मोहगाव (झिल्पी) हा तलाव प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात आला. नागपूर शहरापासून अवघ्या वीस किलोमीटरच्या अंतरावर तलाव असल्याने शहरातील महाविद्यालयीन तरुण व तरुणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फिरण्यासाठी येतात. तलावाच्या बाजूला नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांनी सिद्धिविनायक मंदिर तयार केले आहे.
सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी तलावाच्या बाजूने रस्ता करण्यात आला आहे. या मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविकही मोठ्या प्रमाणात चार चाकी वाहने तलावात पार्किंग करतात. वीक एंडच्या दिवशी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी उसळते. सिद्धिविनायक मंदिर झाल्यापासून अनेक भाविक कुटुंबासह या ठिकाणी दर्शनासाठी येतात.
मोहगाव झिल्पी हा तलाव प्रेमी युगूलांसाठी जणू पर्वणीच ठरला आहे. तलावाच्या मागील परिसरात झुडपी जंगल आहे. या ठिकाणी निवांतपणे प्रेमीयुगूल तासंतास बसून असतात. वाढदिवस साजरा करण्यासाठी ही अनेक तरुण-तरुणी या ठिकाणी येतात. वाढदिवस साजरा केल्यानंतर तलावातील पाण्यात उतरण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. यामुळे तलावातील पाण्यात बुडून आजपर्यंत जवळपास १२५ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
यानंतरही लघुपाटबंधारे विभाग व पाटबंधारे विभाग (राज्य) यांना मृत्यूचा आकडा वाढत असतानाही काहीही देणे घेणे नाही. तलाव त्यांच्या अखत्यारीत असला तरीही त्यांना कोणीही जाब विचारत नाही, हे विशेष. मृत्यूच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना तलावाला काटेरी कुंपणाचे फेंसिंग लावण्यात यावे, अशी मागणी मोहगाव (झिल्पी) वासियांनी केली आहे. तसेच या तलावावर सुरक्षा रक्षक तैनात करण्याची गरज आहे. मात्र यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही.
पोलिस बंदोबस्त सण-उत्सवालाच
मागील आठवड्यात नागपूर शहरातील पाच तरुणांचा तलावातील गाळात मृत्यू झाला. मृत्यूचे हे तांडव सुरूच राहणार आहे. पोलिस प्रशासनाकडून सण- उत्सव व शनिवारी व रविवारी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येतो. इतर दिवशी कोणताही बंदोबस्त या ठिकाणी नसतो. यामुळे प्रेमी युगुल सहज तलावातील पाण्यात मौजमस्ती करण्यासाठी उतरतात आणि जीव गमावून बसतात. मृत्यूचे हे चक्र थांबविण्यासाठी प्रशासनातील झोपलेल्या अधिकाऱ्यांना जाग येणे गरजेचे आहे.
दारूच्या बाटल्या आणि परिसर अस्वच्छ
रविवारी मोहगाव झिल्पी तलाव परिसरात तोबा गर्दी दिसून आली. तलावाशेजारी तरुणाईचा उत्साह पाहण्यासारखा होता. तलावाच्या परिसरात पार्ट्या ही मोठ्या प्रमाणात करण्यात येतात. यामुळे तलाव परिसरात शेकडो दारूच्या बाटल्या ही पडून आहेत. या तलावाचे सौंदर्य व परिसर स्वच्छ करण्यासाठी आजपर्यंत कुणीही पुढाकार घेतला नाही. यामुळे प्रसिद्ध असलेले या पर्यटन स्थळाचा दर्जा उंचावण्यासाठी एखादी स्वयंसेवी संस्था पुढाकार घेणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.