Chhagan Bhujbal वेगळी भूमिका घेणार? समता परिषदेच्या बैठकीत काय घडलं?

अजित पवार गटात आणि एकूण महायुतीत छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. यातचं समता परिषदेत भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना वेगळी भुमिका घेण्याचा आग्रह केला आहे.

छगन भुजबळ अजित पवार गटात नाराज? भुजबळ पुन्हा शरद पवार गटात परतणार? छगन भुजबळ वेगळी भूमिका घेणार? या चर्चांना ऊत आलाय. यामागे तशी कारणं सुद्धा आहेत. म्हणजे छगन भुजबळ हे महायुतीत राहून बऱ्याचदा विरोधी विधान करतात. पक्षाच्या निर्णयावर बऱ्याचदा खुलेआम माध्यमांसमोर नाराजी व्यक्त करतात. राजीनाम्याची घोषणा सुद्धा करतात.

त्यामुळे भुजबळ अजित पवार गटात नाराज असल्याचं बोललं जात. यातंच आता छगन भुजबळ यांच्याकडून अजित पवारांच्या विरोधात दबावतंत्र सुरु असल्याचं बोललं जातंय. कारण नाराजीच्या चर्चांदरम्यान छगन भुजबळ यांनी बोलावलेली समता परिषदेची बैठक आणि या बैठकीतून भुजबळांनी वेगळी भूमिका घ्यावी असा उमटलेला सुर. नेमकं या बैठकीत काय घडलं? आणि भुजबळांनी वेगळी भूमिका घेण्यामागे नेमकी काय कारणं आहेत?

राष्ट्रावादीत बंड झालं आणि अजित पवारांनी शरद पवारांच्या विरोधात जात वेगळी भूमिका घेतली. यात शरद पवारांच्या जवळच्या नेत्यांपैकी अनेक नेतेही अजित पवारांसोबत गेले. यातचं छगन भुजबळ देखील होते. भुजबळांनी अजित पवार गटात जात मंत्रीपदाची शपथही घेतली. मात्र मंत्रिमंडळात असूनही छगन भुजबळ बऱ्याचदा पक्षाच्या निर्णयाविरुद्ध महायुतीच्या विरोधात बोलताना पहायला मिळतात. मग तो ओबीसीच्या मुद्द्यावर असो, लोकसभेच्या निकालावर केलेल वादग्रस्त वक्तव्य असो.

छगन भुजबळांच्या नेतृत्वात मराठ्यांचा ओबीसी आरक्षणात समावेश या विरोधात राज्यभर झालेल्या ओबीसी एल्गार सभा आणि आंदोलन तर संपूर्ण महाराष्ट्राला चांगलीच माहितेय. त्यामुळे भुजबळांना पक्षाचे आणि महायुतीच्या भूमिका खटकतायेत, असं दिसून येतं.

यातचं आता ओबीसी आंदोलन चांगलंच पेटलंय या पार्श्वभुमीवर छगन भुजबळ यांनी समता परिषदेची बैठक बोलावली. वांद्रेतल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट येथे ही बैठक बोलावण्यात आली. आता या बैठकीत काय चर्चा झाली.

तर सगळ्यात आधी मराठा आरक्षण, आणि ओबीसी आंदोलनाचा मुद्दा याठिकाणी मांडला गेला. या बैठकीतून भुजबळांनी औबीसी आरक्षण वाचवण्यासाठी उपोषणावर बसलेल्या लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणे यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि आपण या आंदोलनाच्या पाठीशी असल्याचं म्हंटलं. मात्र या बैठकीत अजून एका मुद्द्याला हात घातला गेला तो म्हणजे महायुतीत आणि पक्षात भुजबळांची असलेली नाराजी. आणि त्यामुळे समता परिषदेत कार्यकर्त्यांनी छगन भुजबळांना वेगळी भूमिका घ्या असा आग्रह केल्याचं बोललं जातं.

सामनं दिलेल्या माहितीनूसार, कार्यकर्त्यांनी या बैठकीत म्हंटल्याप्रमाणं, लोकसभा निवडणूकील नाशिक लोकसभेसाठी भुजबळांच्या उमेदवारीला दिल्लीतून पंतप्रधान मोदी आणि शहांचा ग्रीन सिग्नल होता. ओबीसी लढ्यामुळे भुजबळांसाठी पोषक असं वातावरण देखील होतं. मात्र पक्षाकडून म्हणावं तसा पाठिंबा मिळाला नाही किंवा उमेदवारी आपल्याकडे राहावी यासाठी काहीच प्रयत्न केले गेले नाही असं बोललं गेलं. शेवटी ही जागा शिंदेंच्या पारड्यात पडली.

त्यानंतर राज्यसभेला आपण इच्छुक आहोत असंही भुजबळांनी माध्यमांसमोर स्पष्टपणे बोलून दाखवलं. मात्र तरीही भुजबळांना डावलून अजित पवारांच्या पत्नी ज्या बारामती लोकसभेत पराभूत झाल्या त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं. आणि इथेही भुजबळांना डावललं गेलं. यासोबतच पक्षांतर्गत निर्णय प्रक्रियेत डावललं जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. या आणि अशा अनेक कारणामुळे भुजबळ पक्षांतर्गत नाराज आहेत आणि त्यांनी वेगळी भूमिका घ्यावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी या बैठकीत केल्याचं समजतंय.

आता भुजबळांबद्दल सुरु असलेल्या या चर्चांच्या पार्श्वभूमीवर प्रश्न असा उपस्थित होतो की भुजबळांनी वारंवार बदललेल्या राजकीय भूमिकेत आता त्यांनी पुन्हा जर वेगळा काही निर्णय घेतला तर त्यांना पाठबळ नेमकं कोणाचं असेल. कारण शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर जरी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक त्यांच्या सोबत होते मात्र आता शिवसैनिक त्यांच्यापासून दुरावलेले पहायला मिळतायेत. त्यात शरद पवार गटाचा दरवाजे भुजबळांसाठी पु्न्हा उघडले जातील अशी शक्यता फार धूसर आहे. ओबीसी गट मोठ्या प्रमाणावर पाठीशी असला तरी मराठा समाज त्यांच्यापासून दुरावलेला पहायला मिळतो.

आता कार्यकर्त्यांच्या मागणीवर छगन भुजबळ काय भूमिका घेणार आणि येत्या ६ दिवसात समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक बोलावणार असल्याचं बोललं जातं त्यात भुजबळ काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाच बोललं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.