विद्याधर ताठे -
पंढरीची वारी इतिहास, परंपरा व वैशिष्टये:-
पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक ऐश्वर्य आहे, वैभव आहे. 'वारी' म्हणजेपंढरीचीच! तिरुपती, काशी या तीर्थक्षेत्रांच्या भेटींना वारी म्हटले जात नाही. पंढरीच्या वारीला शेकडो वर्षांचा प्राचीन इतिहास व वैभवशाली परंपरा आहे.
आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या दिंडीसमवेत गात, नाचत, गर्जत पायी पंढरपूरला जाण्याचा सुखानंद, जीवन धन्य करणारा अनुभव आहे. संत साहित्याचे उपासक व अभ्यासक विद्याधर ताठे यांचा विशेष लेख.
आषाढी कार्तिकाचा सोहळा । चला जाऊ,पाहू डोळा ॥
संत तुकाराम महाराजांचा हा अभंग चरण अवघ्या मराठी भाविक मनाचे मनोगत आहे. पंढरीची वारी करावी असे वाटणे हेच मराठीपण आहे, मराठी मनाची हीच नेमकी व यथार्थ ओळख आहे. पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे, तसेच पारमार्थिक ऐश्वर्य आहे.
पंढरीच्या या वारीला प्राचीन इतिहास व परंपरा आहे. पंढरीच्या वारीचा उल्लेख असलेले चौथ्या-पाचव्या शतकातील ताम्रपट उपलब्ध आहेत. वारीचा हा सर्वात प्राचीन पुरावा आहे. त्यानंतर होयसळ सम्राटांच्या काळातील शके 1159 (इ.स.1237)चा श्ािलालेख आपणास वारीची प्राचीनता सांगतो.
ताम्रपट, शिलालेख यानंतर संत ज्ञानदेवकृत अभंगातून कागदोपत्री ठोस आधार मिळतो. संत ज्ञानदेवांच्या घरामध्ये पंढरीची वारी होती. या सर्व ठोस पुराव्यांवरून पंढरीची वारी गेली हजार-बाराशे वर्षे अखंड, अव्याहतपणे सुरू असल्याचे स्पष्ट होते.
'माझी जिवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी ॥'
असा संत ज्ञानदेवांचा एक अभंग प्रसिध्द आहे. पंढरीच्या वारीची आवड ही आपल्या जिवीची आवड आहे असे सांगून, 'भेटेन माहेरा आपुलिया।' म्हणत ज्ञानदेव पंढरीला आपले 'माहेर' संबोधतात. 'माहेर' या विशेषणातच पंढरीचे अवघे माहात्म्य सामावलेले आहे.
पंढरी सोडून देशातील अन्य कोणत्याही तीर्थक्षेत्राला कोणाही संत-महात्म्यांनी 'माहेर' म्हटलेले नाही, हेच पंढरीचे वैशिष्ठ आहे. पंढरी माहेर आणि भक्तवत्सल पंढरीनाथ-विठोबा ही संतांची 'विठूमाउली'!
सामूहिक वारीचे महत्त्व:-
पंढरीची वारी एकटयाने नव्हे, तर सामूहिकपणे करण्याची वारी आहे. इथे वैयक्तिक नव्हे, तर सामूहिक भक्तीला विशेष महत्त्व आहे. आणि हि वारी कशी करायची? तर अभंग गात गात, खेळीमेळीने, आनंदाने नाचत.
सोपे वर्म आम्हां सांगीतले संती ।
टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा ।
हातात टाळ घेऊन मृदंगाच्या तालावर नाचत, गर्जत, विठ्ठलनामाचा जयघोष करीत वारकरी ही पायी वाटचाल करतात. भजन गात, गर्जत, नाचत पंढरीकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या या दिंडया म्हणजे चैतन्याचा प्रवाह. या दिंडयांचेर् दशनही चित्त प्रसन्न करणारे. खुद्द संत ज्ञानदेवांनाही वारकऱ्यांच्या दिंडीचे वर्णन करण्याचा मोह अनावर झालेला दिसतो. ज्ञानदेव म्हणतात,
कुंचे पताकांचे भार । आले वैष्णव डिंगर ।
भेणे पळती यम किंकर । नामे अंबर गर्जतसे ॥
अजि म्या देखिली पंढरी । नाचताती वारकरी ।
भार पताकांचे करी । भीमातीरी आनंद ॥
संत ज्ञानदेवांप्रमाणेच संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखोबा, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज, संत बहिणाबाई यांचे पंढरीच्या वारीचे - वारकरी दिंडीचे वर्णन करणारे अनेक अभंग उपलब्ध आहेत.
नामा म्हणे धन्य झाले ते संसारी ।
न सांडिती वारी पंढरीची ॥
या अभंगात ज्ञानदेवांचे संतसांगाती नामदेव महाराज म्हणतात, ''जे पंढरीची वारी चुकवीत नाहीत, ते संसारी धन्य होतात.'' संसार सोडून वा तुच्छ मानून परमार्थ करणाऱ्यांना संत नामदेव या अभंगातून संसार व परमार्थ दोन्ही सफल सुफल कसा करता येतो, ते सांगतात.
पंढरीची वारी करीत संसार परमार्थरूप कसा करता येतो, याचे प्रापंचिक वारकरी संत उत्तम उदाहरण आहेत. संत नामदेव, संत एकनाथ, संत दामाजी, संत तुकाराम, संत बहिणाबाई, संत निळोबा हे सारे संत संसारी होते. परमार्थ साधनेसाठी संसार सोडून संन्यास घेण्याची गरज नाही, हे या संतांनी सोदाहरण दाखवून दिले.
हरि तॆथॆं संत संत तॆथॆं हरी.. ऐसॆं वॆद चारी बॊलताती .. जय हरी भानुदास एकनाथ .....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.