Kolhapur : कोल्हापुरातील धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणं पाहायची आहेत? मग, 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या..

सकाळ डिजिटल टीम

दुर्ग, थंड हवेची ठिकाणं, अभयारण्ये, हेरिटेज वास्तू, धरणं, जंगल सफारीची ठिकाणं असे वैविध्य कोल्हापूरच्या दीडशे किलोमीटरच्या परिसरात आहे. त्यामुळं कोल्हापुरातील धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणं पाहायची असतील तर या ठिकाणांना नक्की भेट द्या..

श्री अंबाबाई मंदिर (Shri Ambabai Temple) - कोल्हापुरात आलेला प्रत्येक पर्यटक अंबाबाई चरणी नतमस्तक झाल्याशिवाय पुढं मार्गस्थ होत नाही. अंबाबाई मंदिर ज्याला दक्षिण काशी असंही म्हटलं जातं. अंबाबाई देवीला समर्पित असलेले हे मंदिर 52 शक्तीपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी मंदिर आहे.

जोतिबा मंदिर (Jyotiba Temple) - कोल्हापूर शहराच्या वायव्ये दिशेस जेमतेम 15 किलोमीटर अंतरावर एका डोंगरावर ज्योतिबाचं मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर-केदारलिंग या नावानं देखील ओळखतात. पसरट भूभागावर एक हजार फूट उंचीवर, शंखाकृती, हत्तीच्या सोंडे सारख्या दिसणाऱ्या या डोंगराला वाडी रत्नागिरी म्हणतात. वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) इथं हे हेमाडपंथी मंदिर काळ्या दगडात असून इथं केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंग या तीन मंदिरांचा समूह आहे.

खिद्रापूरचे कोपेश्वर (Khidrapur Kopeshwar) - शिरोळ तालुक्यात कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कृष्णा नदीच्या काठी खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर आहे. प्राचीन शिलाहार शिल्प स्थापत्य शैलीचं हे मंदिर आहे. कोल्हापूरपासून ६० ते ७० किमी. अंतरावर हे मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर बारा राशींचे बारा खांब आहेत.

रामलिंग-धुळोबा (Ramalinga-Dhuloba) - कोल्हापूरपासून १५ किलोमीटरच्या अंतरावर हातकणंगले जवळ रामलिंग, धुळोबी ही देवस्थानं आहेत. रामलिंग मंदिर ही एक कोरीव गुंफा असून पुरातन देवस्थान आहे. आतील बाजूस शिवलिंग व गणपती मूर्ती आहे. देवालयाच्या बाहेरील बाजूस हेमाडपंथी शिल्प आहे. कन्नड भाषेतील शिलालेख असून थोड्या अंतरावर धुळोबा देवस्थान आहे.

टेंबलाई मंदिर (Temblai Temple) - टेंबलाई टेकडी हे कोल्हापुरातील भेटीसाठीचं एक प्रसिद्ध ठिकाण आहे. या टेकडीवर “टेंबलाबाई” देवीचं मंदिर आणि आणखी एक लहान मंदिर आहे. प्रत्येक आषाढीमध्ये मंदिराच्या पायऱ्यांवर पाणी ओतण्याचा धार्मिक सोहळा भव्य प्रमाणात साजरा केला जातो. या टेकडीवर यमाई देवीचं पण एक मंदिर आहे.

सिद्धगिरी मठ, संग्रहालय (Siddhagiri Math) - याला कणेरी मठ म्हणूनही ओळखले जाते. कोल्हापूरच्या कणेरी इथं सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय आहे. श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ आणि शिव मंदिरात हे संग्रहालय आहे. मेण व सिमेंट शिल्पांच्या मदतीनं ग्रामीण जीवनाचं संग्रहालयात चित्रण आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Historical Temples Of Kolhapur