माझिया माहेरा : संस्कारांची शिदोरी
माझं माहेर लोणी धामणी. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील छोटंसं खेडेगाव.
- अर्चना चौधरी, पुणे
माझं माहेर लोणी धामणी. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील छोटंसं खेडेगाव. माझ्या माहेरातील प्रेमळ माणसं, गावातल्या वाड्यावस्त्या, शाळा, मंदिरं, ओढे-नाले, गावातले सण-उत्सव, परंपरा व यात्रा या सगळ्या गोष्टींनी माझं आयुष्य समृद्ध केलं आहे.
तसं पाहिलं, तर माझं माहेर पाबळ गाव; परंतु माझे वडील भैरवनाथ विद्याधाम लोणी शाळेत शिक्षक असल्यामुळे त्यांची पूर्ण सेवा लोणी गावात झाली आणि आम्ही सर्व भावंडं याच गावात लहानाची मोठी झालो. याच गावानं आम्हाला घडवलं. यामुळे हेच माझे माहेर.
माझी आई याच गावात संसाराला हातभार लागावा म्हणून शिवणकाम करत असे. मी, माझे वडील, माझा लहान भाऊ; तसंच माझी मोठी बहीण असं आमचं पाच जणांचं छोटेखानी सुखी कुंटुंब.
माझ्या माहेरी बहुतांशी लोकांचा व्यवसाय हा शेती हाच आहे. सर्व माणसं अगदी साधी सरळ व प्रेमळ. गावचं भूषण म्हणजे येथील भैरवनाथ विद्याधाम शाळा. गुलमोहर व जाई-जुईच्या वेलींनी शाळेचा परिसर अत्यंत शोभिवंत दिसायचा. या शाळेनं आमच्या संपूर्ण पिढीमध्ये संस्कार व मूल्यं रुजविली. माझे वडील खेळाचेही शिक्षक असल्यामुळे या मुलांमधील कलागुण हेरून कोणाला सैन्यदलात, तर कोणामधील कलाकौशल्य बघून त्यांना आयटीआयमधील प्रशिक्षणासाठी प्रेरणा दिली. गावाकडे कमी वयात मुलींची लग्नं करायचे, तेव्हा माझ्या वडिलांनी मुलींना शिकवून स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी पालकांना प्रेरणा दिली. याचाच भाग म्हणून मी व माझी बहीण अत्यंत खेडेगावातून येऊन पुण्यासारख्या शहरात आत्मविश्वासानं नोकरी करत आहोत. आजही परगावी नोकरी करणारी मुलं यात्रा किंवा सणावाराला गावाला आल्यानंतर माझ्या वडिलांना नमस्कार केल्याशिवाय कधी जात नाही.
आज चकचकीत मॉलमध्ये सगळ्या वस्तू एकाच छताखाली मिळतात; पण आमच्या काळी आमचा मॉल म्हणजेच गावात बुधवारी भरणारा आठवडी बाजार. गावातील शेतकरी शेतातील ताज्या भाज्या, फळं-फुलं आणि धान्य विकण्यासाठी आणत. गावातील प्रसिद्ध दिवटे हॉटेलमधील गरमागरम भजी आठवली, तरी आजही तोंडाला पाणी सुटतं. तेथील कुरकुरीत भेळ, शेव- रेवडी हे बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्या लोकांचे खाण्याचे आवडते पदार्थ. बाजारात जादूचे व गारुड्यांचे खेळ चालत. आम्ही लहान मुलं हे खेळ पाहण्यात तासन्तास दंग व्हायचो. बाजारच्या दिवशी अनेक सासुरवाशिणी आईकडे कपडे शिवायला यायच्या. त्या तासन्तास आईकडे गप्पा मारून सुख-दु:खं सांगून मन मोकळं करायच्या. जाताना कपड्यांबरोबरच त्या त्यावरील आईच्या मायेची ऊबही घेऊन जायच्या. माझ्या आई-वडिलांनी प्रेमळ स्वभावामुळे खूप माणसे जोडली. त्यांचे तेच संस्कार आजही आमच्यावर आहेत.
गावात सण, उत्सव आणि यात्रा उत्साहानं साजरे होत. गावची यात्रा महाशिवरात्रीला भरायची. या निमित्तानं गावात अखंड हरीनाम सप्ताह चालायचा व शेवटच्या दिवशी गावातील आणि शाळेतील मुलांना काल्याचं जेवण असायचं. माझ्या मैत्रिणी आप्पी, पुष्पी, शोभी, संगी व मी गावाशेजारच्या धामणी, वडगावपीर, खडकवाडी व रानमाळा या गावांच्या यात्रांना तीन-चार किलोमीटर अंतर चालत जायचो. यात्रेकरता मला वीस-तीस रुपये माझी आई द्यायची. यात्रेला दर्शन झाल्यानंतर आम्ही मैत्रिणी भटकत असायचो. झुमके, बांगड्या व माळांची खरेदी व्हायची. हॉटेलात जिलेबी, भजीवर ताव मारायचो. पाळण्यात बसून आकाशाला गवसणी घालायचो. गारेगार-कुल्फीनं तोंड लाल-लाल व्हायचं.
माझ्या सर्व मैत्रिणीसोबत मी आट्यापाट्या, सूरपारंब्या, विटी-दांडू असे खेळ खेळत असू. माझे मित्र सुहास, बाबज्या, अज्या, पिंट्या व बाळ्या यांच्यासोबतही खेळायचे. पन्नास पैसे भाडं देऊन सायकल खेळायचा आनंद भारीच. बालपणीचा माझा मित्र सुहास पुढे माझा जोडीदार झाला. अशा माहेरच्या आठवणी किती सांगू... त्या कधीही संपायच्याच नाहीत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.