मेमॉयर्स : आईनेच लढायला शिकवले...

Radha-Sagar
Radha-Sagar
Updated on

आई माझा देव, आई माझा गुरू 
आई माझी कल्पतरू 

आई या शब्दांत खरंतर संपूर्ण जगच सामावलेलं आहे. आईबद्दल लिहावं तितकं कमीच आहे. पण, लहानपणापासून आईनं माझं खूप कौतुक केलं आहे. माझी आई स्वाती कुलकर्णी ही माझी ‘बेस्ट फ्रेंड’ आहे. मी चौथीत असताना आम्ही पुण्यात आलो. त्यानंतर मला नृत्याची खूप आवड असल्यानं मला कथकच्या क्‍लासला घातलं. तेथूनच माझा नृत्याचा प्रवास सुरू झाला. पण, शाळेत असताना मला आठवतंय, आई मला नववीपर्यंत शाळेत सोडायला अन्‌ आणायला यायची. त्यामागं तिला माझी किती काळजी आहे, हे मला कळत गेलं. शिवाय शाळेपासूनच गाण्याच्या, नाटकाच्या स्पर्धांमध्येही सहभागी होण्याची सवय लागली. त्यानंतर आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्येही मी सहभागी होऊ लागले. हळूहळू डान्स कोरिओग्राफी करू लागले. तेथूनच माझा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. पण, प्रत्येक वेळी आईनं केलेलं मार्गदर्शन उपयोगी पडत होतं. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मी मुंबईत ऑडिशन द्यायला सुरवात केली, तेव्हा आई आणि कुटुंबीय माझ्यासोबत येत असे. आई सोबत असल्यामुळं एक वेगळीच ताकद मिळायची. हळूहळू या क्षेत्रात रुळायला लागले. मग नाटक, मालिका आणि चित्रपट असा प्रवास सुरू झाला. प्रत्येक वेळी आईची शिकवण मोलाची ठरली. स्वतःला करायचं होतं, ते आई माझ्यात बघत होती. उत्तम अभिनेत्री होऊन तिची ती इच्छा मला पूर्ण करायची आहे. सगळ्यात अविस्मरणीय असे दोन क्षण मला आठवतात. पहिला जेव्हा मला ‘नातीखेळ’ या चित्रपटासाठी ‘बेस्ट फिमेल इंटरनॅशनल ॲवॉर्ड’ मिळाले होते. आणि दुसरा माझा पहिला चित्रपट ‘विकून टाक’ प्रदर्शित झाल्यानंतर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. 

मला वाटतं तिच माझ्या पहिल्या टप्प्यातील यशाची पावती होती. मला आई नेहमीच म्हणते, ‘हे क्षेत्र खूप स्ट्रगल, स्पर्धेचं अन् ग्लॅमरचं आहे. पण, जे काम करशील ते जीव ओतून, मेहनत घेऊन चांगल्या मनानं कर. म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. मी कितीही खचले तरी ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. कामाच्या निमित्तानं मी मुंबईत असते. पण, माझा मूड नाहीये, हे तिला न सांगता कळतं. आणि त्यातून हरून न जाता कसं लढायचं, हे तिनं मला शिकवलं आहे. पूर्ण जग विरोधात गेलं, तरी मी तुझ्यासोबत आहे, हा ठाम विश्‍वास आई मला देत असते. माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. मी या बाबतीत स्वतःला खूप भाग्यवान समजते. माझी सासू सुमती कुलकर्णीसुद्धा माझी दुसरी आईच आहेत. मला दोघीही खूप जीव लावतात अन् सपोर्ट करतात. म्हणून माझ्या आईची अन् घरच्यांची स्वप्नं मला पूर्ण करायची आहेत. त्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्नशील राहील. 

शब्दांकन - अरुण सुर्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.