आरोग्यमंत्र : सीपीआर हेच जीवनदान!

कालच जागतिक हृदय दिवस झाला. या निमित्ताने आपण एक अत्यंत उपयुक्त अशा कौशल्यांची माहिती घेऊयात. त्याआधी दोन प्रसंग सांगतो.
आरोग्यमंत्र : सीपीआर हेच जीवनदान!
Updated on
Summary

कालच जागतिक हृदय दिवस झाला. या निमित्ताने आपण एक अत्यंत उपयुक्त अशा कौशल्यांची माहिती घेऊयात. त्याआधी दोन प्रसंग सांगतो.

कालच जागतिक हृदय दिवस झाला. या निमित्ताने आपण एक अत्यंत उपयुक्त अशा कौशल्यांची माहिती घेऊयात. त्याआधी दोन प्रसंग सांगतो.

काही वर्षांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीला पुण्यामध्ये अपघात झाला व ती चक्कर येऊन पडली. तिला सुमारे एक तास कुठलीही मदत मिळाली नाही, उभ्या असलेल्या लोकांनी केवळ बघ्याची भूमिका घेऊन मदत ना करता मौल्यवान वेळ गमावला. नंतर थोड्या वेळाने अँब्युलन्स आली; पण वेळ गेल्यामुळे, मेंदूला रक्तपुरवठा कमी होऊन ती कोमामध्ये गेली आणि दगावली... हेच जर वेळीच प्रथमोपचार आणि सीपीआर मिळाले असते, तर तिच्या दोन मुली पोरक्या झाल्या नसत्या.

दुसरा प्रसंग कालचाच. काही कारणास्तव शॉपिंग मॉलला जाण्याचा योग आला. तिथे उभा असताना एक गृहस्थ बिलच्या रांगेमध्ये उभे होते. ते एकदम खाली पडले आणि त्यांनी डोळे फिरवले. आजूबाजूचे लोक स्तब्धपणे त्यांच्याकडे बघत होते. तेवढ्यात एका युवकाने आरडाओरडा करून मदत मागवली आणि त्यांना झोपवून सीपीआर (Cardiopulmonary resuscitation) चालू केला. दोन ते तीन मिनिटांमध्ये त्या गृहस्थांना शुद्ध आली आणि त्यांनी हालचाल चालू केली. थोड्याच वेळात अँब्युलन्स आली आणि त्यांना घेऊन गेली; पण तोपर्यंत धोका टळला होता. या ४-५ मिनिटांमध्ये त्यांना जीवन संजीवनी मिळाली.

या दोन्ही प्रसंगातून आपल्याला या अत्यंत सोप्या; पण अत्युपयोगी अशा कौशल्याची किती गरज आहे याची जाणीव होईल. किंबहुना रामायणामध्ये जी संजीवनी होती ती हीच का असं कधीतरी वाटतं. या कौशल्यासाठी दोनच गोष्टींची आवश्यकता आहे ते म्हणजे दोन हात आणि इच्छाशक्ती. याव्यतिरीक्त हे सीपीआर कौशल्य शिकण्यासाठी फक्त १५-२० मिनिटे पुरतात.

सीपीआर कसे करावे?

1) रुग्णाला कडक जमिनीवर झोपवावे आणि धोक्याचे निरीक्षण करावे. कुणाला तरी अँब्युलन्स अथवा मदत बोलावण्यास सांगून आपण सीपीआरच्या प्राथमिकता चालू कराव्यात. रुग्णाचे श्वसन चालू आहे का त्याचे निरीक्षण करावे. त्याची छाती हालत आहे का, नाकापुढे रुमाल अथवा छोटा धागा धरून तो हालत आहे का ते पाहावे. याद्वारे आपल्याला श्वास चालू आहे का बंद याचे निदान होईल. रुग्णाची हनुवटी वर करून ठेवल्यास श्वासास मदत होण्यास सुलभता होते. रुग्ण श्वास घेत नसेल, तर याचा अर्थ रेस्पिरेटरी अरेस्ट किंवा श्वसन बंद आहे असे समजा.

2) नाडी अथवा पल्स बघण्याचा प्रयत्न करावा. जबड्याच्या कोपऱ्याखाली मानेमध्ये अंगठा दाबून कॅरोटिड पल्स बघावी. हाताला नाडीचे ठोके ना लागल्यास, कार्डियाक अरेस्ट अथवा हृदय बंद पडले आहे असे समजावे. या सर्व प्रक्रियेला साधारणपणे १०-२० सेकंद लागू शकतात.

3) छातीच्या मध्यभागी जे स्टर्नम नावाचे हाड असते, त्याच्या मध्यभागी आपले दोन्ही हाताचे पंजे एकमेकांत गुंतवून दाब द्यावा. हाताची ‘टाच’ही त्यावर टेकवून कोपरा ना दुमडता साधारणपणे २-२ इंच छाती दाबली जाईल, अशा पद्धतीने छातीवर दबाव द्यावा. हे दाब मिनिटाला १०-१२० या प्रमाणे दिले जावेत. १००१, १००२ असे आकडे म्हणत हा दबाव द्यावा- जेणेकरून खूप जास्त गतीने हे दबाव पडणार नाहीत. जास्त गतीनं ते दिले गेल्यास, सीपीआर नीट होत नाही हे लक्षात घ्यावे. दार ३-५ मिनिटांनी रुग्ण शुद्धीवर येत आहे का, नाडी लागत आहे का हे पडताळून पाहावे.

जोपर्यंत रुग्ण शुद्धीवर येत नाही अथवा मदत/ रुग्णवाहिका येत नाही तोपर्यंत सीपीआर चालू ठेवावे. जर तुम्ही दमला, तर दुसऱ्या कोणाला तरी बोलावून हे चालू ठेवावे. आपल्याला आश्चर्य वाटेल; पण सुमारे ७५-८० टक्के लोकांना कार्डियाक अरेस्टनंतर वेळीच सीपीआर मिळाल्यास जीवन संजीवनी मिळू शकते. लक्षात ठेवा, की एक जरी व्यक्ती कार्डियाक अरेस्टने दगावली, तर याचा अर्थ, तिला वेळेत सीपीआर देण्यात आपण अपयशी ठरलो.

हे जीवनावश्यक कौशल्य आत्मसात करण्यासाठी कुठलीही परीक्षा देण्याची अथवा शैक्षणिक पातळी असण्याची गरज नाही. आज समाजात या सीपीआरविषयी जनजागृती होणे अत्यावश्यक आहे- कारण उद्या कार्डियाक अरेस्ट होण्याऱ्या व्यक्तींमध्ये आपली जवळची व्यक्तीही असू शकते. आपण हे कौशल्य आत्मसात केले, तर तिथे ना थांबता पुढे ५ लोकांना अजून शिकवा म्हणजे याचा प्रसार होईल. ‘सकाळ माध्यमसमूह’ आणि आमचे आलोहा क्लिनिक यांनी यामुळे एक संकल्प केला आहे, की पुढील एक वर्षांमध्ये एक लाख लोकांना आम्ही मोफत सीपीआरचे प्रशिक्षण देणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.