कोलेस्टेरॉल म्हणजे काय, ते काय करते, त्याचे प्रकार काय इत्यादी गोष्टींविषयी; तसेच कोलेस्टेरॉलविषयी असलेले गैरसमज आणि त्यांच्याबाबत वस्तुस्थिती यांबाबत गेल्या दोन आठवड्यांत माहिती घेतली.
कोलेस्टेरॉल म्हणजे काय, ते काय करते, त्याचे प्रकार काय इत्यादी गोष्टींविषयी; तसेच कोलेस्टेरॉलविषयी असलेले गैरसमज आणि त्यांच्याबाबत वस्तुस्थिती यांबाबत गेल्या दोन आठवड्यांत माहिती घेतली. आता कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करायचे, औषधे कोणती, स्टॅटिन्स औषधे म्हणजे वरदान आहे की शाप आहे, आदींबाबत माहिती घेऊ.
जीवनशैलीतील बदल
हृदयासाठी सुरक्षित असलेले पदार्थ खाणे, नियमित व्यायाम करणे, धूम्रपान सोडणे, वजन कमी करणे आणि मद्यपान टाळणे किंवा नियंत्रण आणणे या जीवनशैलीतील बदलांमुळे कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.
औषधे
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी विविध प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. स्टॅटिन्स, फेनोफायब्रेट, pcsk9 इन्हिबिटर्स, नियासिन, इझेटीमिब इत्यादी औषधे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी वापरली जातात.
स्टॅटिन्स वरदान का शाप?
गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडिया आणि इंटरनेटवर काही विपर्यस्त लेखांमध्ये ‘स्टॅटिन्स ही औषधे शरीरास अतिशय अपायकारक आहेत; त्यांनी स्मरणशक्ती कमी होणे, स्नायूंना सूज येणे, कॅन्सर होणे इत्यादी साईड इफेक्ट्स होतात,’ वगैरे चुकीची माहिती प्रसारित होत आहे. याचे वास्तव काय आहे ते समजून घेऊयात.
गेल्या २५ वर्षांपासून स्टॅटिन्स ही औषधे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी दिली जात आहेत. शास्त्रीय प्रबंधांमध्ये साधारणपणे २४ वर्षांपासून स्टॅटिन्सविषयी माहिती आहे. आपल्या शरीरातील बहुतेक कोलेस्टेरॉल यकृतामध्ये बनले जाते. आहारातून थोड्या कमी प्रमाणात कोलेस्टेरॉल रक्तात येते. यकृतातील कोलेस्टेरॉल बनविण्याच्या प्रकियेला (डिनोवो सिन्थेसिस) स्टॅटिन्स प्रतिबंध करतात. आपल्या शरीरातील पेशींना कोलेस्टेरॉलची आवश्यकता असल्यास आणि पुरेशा प्रमाणात कोलेस्टेरॉल बनवलेले नसल्यास, रक्तप्रवाह किंवा धमन्यांमध्ये असलेल्या अतिरिक्त कोलेस्टेरॉलचा वापर केल्यामुळे पर्यायाने रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते.
आपल्याला हे लक्षात घेतले पाहिजे, की सर्व औषधांना साइड इफेक्ट्स असतात. अगदी हर्बल औषधांनादेखील. त्या साईड इफेक्ट्सना टाळून आपण सुरक्षितपणे कशी औषधे घ्यावीत हे महत्त्वाचे आहे. साइड इफेक्ट्सच्या भीतीने औषधे न घेणेही अयोग्य आहे. आपल्याला काही शंका असल्यास औषधे थांबवण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी त्याची सखोल चर्चा करावी.
स्टॅटिन्स ही बहुतांश सुरक्षित औषधे आहेत. सर्वांत वारंवार आढळणारा साइड इफेट म्हणजे स्नायू दुखणे आणि स्नायूंना सूज येणे. मात्र, याचे प्रमाण जेव्हा स्टॅटिन्स मोठ्या डोसमध्ये दिली जातात, तेव्हाच असते. तथापि जर आपण स्टॅटिन्सवर असाल आणि आपले स्नायू दुखत असतील, तर आपल्या हृदयरोगतज्ज्ञास त्याची त्वरित माहिती द्यावी. बऱ्याच वेळेस डोस कमी केल्यास ही लक्षणे कमी होतात. बाकी साइड इफेक्ट्सही अतिशय कमी प्रमाणात होतात आणि त्यांची वारंवारिताही खूप कमी आहे. स्मरणशक्ती कमी होणे, रक्तशर्करा वाढणे इत्यादी साइड इफेक्ट्सही अत्यंत कमी प्रमाणात आढळून आले आहेत. तथापि या साइड इफेक्ट्सना घाबरून स्टॅटिन्सना विरोध करणे म्हणजे बुडण्याला घाबरून पोहायला शिकणे टाळण्यासारखे आहे. स्टॅटिन्सने होणारा फायदा म्हणजे हार्ट ॲटॅकचे आणि पक्षाघाताचा प्रमाण कमी करणे आहे. याव्यतिरिक्त साईड इफेक्ट्सही फारच कमी प्रमाणात होतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.