‘पॉवर’ पॉइंट : सकारात्मकतेचा ‘केस’ स्टडी

आरशात स्वत:ला न्याहाळताना अचानक काळ्याभोर केसांत एखादा ग्रे केस दिसल्यावर दचकायला झालंय कधी? आणि मग तो ग्रे हेअर लपवण्यासाठी प्रत्येक वेळी केलेली धडपड.
Grey Hair
Grey HairSakal
Updated on

आरशात स्वत:ला न्याहाळताना अचानक काळ्याभोर केसांत एखादा ग्रे केस दिसल्यावर दचकायला झालंय कधी? आणि मग तो ग्रे हेअर लपवण्यासाठी प्रत्येक वेळी केलेली धडपड. पहिले काही दिवस तो केस अर्धा तोडला तरी चालायचा. हळूहळू त्याचे त्याने मित्र केले असावेत. आणि मग दोन-तीन अजून दिसायला लागले. ‘काही फरक पडत नाही’ कॅटेगरी तशी महिला असो वा पुरुष तुलनेनं कमीच असते. आणि ज्यांना फरक पडतो त्यांचं काही चुकतं असं नाही. मी जशी होते तशीच दिसत राहावे ही ओढ असणं हे स्वत:वर केलेल्या प्रेमाचंच लक्षण नाही का. का नसावं ते?

म्हणजे बघा ना, तरुण दिसण्याचा प्रयत्न करणं यात काहीही गैर नाही. जोरात धावणाऱ्या ट्रेनमध्ये बसल्यावर एकटक बाहेर बघत बसा. ट्रेन उलट्या दिशेनं जातीये असा क्षणभर फील येतो. त्यातही आपल्या आवडीच्या ठिकाणाला निरोप देऊन फास्ट ट्रेनमधून जाताना एकटक बाहेरच बघत राहावंसं वाटतं. म्हणजे आपल्याला आवडणारी जागा, आवडणारी आयुष्याची फेज, मागे सुटू नये यासाठी हे माइंड गेम्स असतील बहुदा. आणि हे खेळण्यात काहीही गैर नाही; पण अनेक रंगरंगोटींनंतरही आतून फ्रेश वाटत नसेल, डोळ्यात उदासीनता असेल, समजून घेण्याची ताकद कमी झाली असेल, तर अंगभर लावलेल्या त्या रंगांचीही अखेरीस एकच ग्रे शेड होते ना?

लक्षात घ्या, याचा वाढत्या वयाशी काहीही संबंध नाहीये. १८ वर्षाची मुलंही अनेकदा ‘काय फरक पडतोय’ अशा मानसिकतेत डोळे फोनमध्ये घुसवून तासन्‌तास घरातच बसलेली असतात. ‘उगाच मद्दडसारखं वागू नको’ म्हणत मग पालक त्यांच्या अंगावर धावतात. आणि कधी साठीतला माणूसही सकाळी उठल्यापासून भरभर घरातल्या १० गोष्टीत मदत करतो. मग काही ना काहीतरी काम काढत, कधी नाटकालाच जा, कधी सिनेमालाच जा, काही नाही तर वर्तमानपत्रात ‘वाचकांचा पत्रव्यवहार’साठी एखादा लेख देऊन ये, असं चुणचुणीतपणे करत स्वत:ला चार्ज ठेवत असतो. ‘अहो घरात बसा की, आता तुमचं वय आहे का हे’ म्हणत अशांची बॅटरी डिस्चार्ज करण्याची जबाबदारी काहींच्या घरी त्यांच्या पोरांनीच घेतलेली असते. या उदाहरणांमध्ये कुणाच्या डोळ्यात तुम्हाला ग्रे शेड दिसते?

सांगायचा मुद्दा, स्वत:च्या विचारांमधली लय कुठल्याही वयात स्लो होऊ शकते. एकदा ती स्लो झाली, की तुम्ही कितीही ‘सो कॉल्ड’ सुंदर दिसा, नखशिखांत रंगा, समोरची व्यक्ती तुम्हाला कनेक्टच होऊ शकली नाही तर चेहऱ्यावरच्या, केसांवरच्या रंगाचाही भार वाटू लागतो. समोरचीच व्यक्ती कशाला, एकदा आरशासमोर उभं राहून स्वत:कडे जरा बघा. ठीके, डोळ्याखाली जरा सुरकुत्या दिसतील, गालावर सूक्ष्म खड्डे, नको तिथे आलेली लव खुपेलही कदाचित; पण त्यानंतर डोळ्यात बघा.

एखादा नवा विचार मनात आणा. दुसऱ्याचे डोळे वाचता येवोत न येवोत आपले डोळे आपल्याशी खोटं बोलत नाहीत. नव्या विचारांनी अजूनही ते चमकत असतील, तर जग एका बाजूला; पण तुम्हाला पुढे जाण्यावाचून कुणी रोखू शकणार नाही. ग्रे शेड केसांत झळकणं एकवेळ ठीके; पण त्याची सावली डोळ्यांत पडू देऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.