ती दुरून पाहत होती. मुलगा मोठा होऊन दूर जाताना, मुलानं त्याचा सोबती निवडताना, स्वत:चा जोडीदारच स्पर्शाचं महत्त्व संपवताना आणि असं बरंच काही. ती थकलेली दिसायची नाही; पण हसल्यावर डोळ्याकडेच्या सुरकुत्या दिसायच्या. उठता बसताना हात धरायला गेलो, तर हात हातात द्यायची नाही. निघताना प्रेमानं जवळ घेऊन निरोप द्यावा म्हटलं, तर अंग चोरून घ्यायची. आम्ही आजूबाजूच्या स्त्रिया चुकचुकायचो तिच्याकडे बघून. वाटायचं या वयात इतकी एकटी पडायला नको होती ती. तिन्हीसांजेला एकदा निवांत तिच्याबरोबर बसण्याचा योग आला..
तिन्हीसांजेच्या वेळेचं कितीही रोमँटिक वर्णन केलं, तरी मला वैयक्तिक ही वेळ अजिबात आवडत नाही. का कोण जाणे मेंदूतला वेग जाऊन जगण्याची हरवलेली पानं नेमकी त्याच वेळी सापडतात असं वाटतं. म्हणजे दिवसा या पानांना वेगात बघताना त्याचं सुंदर चित्र दिसतं. तिन्हीसांजेला हा वेग कमी होतो. मग प्रत्येक पानावर खरंतर ओबडधोबड आकृत्याच होत्या, फक्त वेग वाढलेला होता म्हणून त्यात सुबकता दिसत होती, याची जाणीव होते.
तर तिच्यासोबत अशा अस्वस्थ वेळेला बसल्यावर वाटलं आता जोडीदारापासून मुलापर्यंत सगळ्याचा पाढा वाचला जाणार तिच्याकडून. पण ती सांगायला लागली एका वेगळ्याच ‘त्याच्या’बद्दल. कॉलेजात असताना म्हटला होता तिला, ‘‘चल, लग्न करू. निघून जाऊ दुसऱ्या शहरात, दुसऱ्या देशात.. तू आणि मी. आवडतेस मला तू.’’ वाऱ्यानं तिचा पदर उडत होता. त्यानं तिचा हात धरला. ती अंगही चोरत नव्हती; पण म्हटली, ‘‘नाही येऊ शकत. माझा दुसऱ्यावर जीव आहे.’’ तो म्हटला, ‘‘ठीके. मग मी निघतो या शहरातून.’’ ती सांगत असताना सूर्यही अस्ताला जात होता; पण पुढे तिनं जे सांगितलं ते फार महत्त्वाचं होतं.
ती मला म्हटली, ‘‘तेव्हा ज्याच्यावर जीव लावला त्याच्याशी लग्न झालं; पण ते प्रेम नव्हतं, फक्त जिव्हाळा होता, हे समजायला पूर्ण हयात गेली. म्हणजे आता ‘तो’ कुठे असेल असे काही विचार मनात येत नाहीत. ज्याच्याबरोबर आहे त्याला दिलेला शब्द तितक्याच मनापासून पाळलाही. तक्रार नाही. पण स्पर्शाची गरज ज्याला कळली नाही अशा व्यक्तीसाठी एकेकाळी कुणाला तरी नाही म्हटले, हे काही मनातून पुसता येत नाही. काही नाती, निर्णय चूक-बरोबरच्या पलीकडचे असतात. कारण नजरांमधले भाव सारखेच असतील तर काय चूक-काय बरोबर. म्हणून आयुष्यभर जेवढ्यास तेवढंच महत्त्व मला ज्या पतीनं दिलं त्याला खड्यासारखं वेगळं केलं नाही; पण त्याच्याकडून असलेल्या अपेक्षांना आता माझी मीच चाळणी लावली. कुणा दुसऱ्यासोबत जगावं अशी आता अपेक्षाच नाही; पण ज्याच्यासोबत जगतीये त्याच्यात किती गुंतावं हे माझं मी ठरवलं. कशातून आनंद मिळेल हे माझं मी ठरवलं.’’
किती खरं बोलली ती. अपुऱ्या, अधुऱ्या स्पर्शांचे हिशेब न मांडता अपेक्षांना अशी गाळणी लावायला लागणं हे बरोबर की चूक? माहीत नाही; पण असं केल्यानं ती आनंदानं जगू शकली हे नक्की. आत्ताच्या आपण मुली याला तडजोड म्हणू, अन्याय म्हणू. आपण इतकं मन मारून जगणारंही नाही कुणासाठी, जगूही नये; पण गोष्ट आपली नव्हतीच ना. ती ‘ती’ची होती. ती याला आयुष्य म्हणत होती. तिच्या समोर असलेल्या पर्यांयामधून तिनं तिच्यासाठी निवडलेला हा पर्याय होता.
आपण आपल्यापुरता काय अर्थ घेऊ शकतो? ज्या लोकांना आपलं असणं, दिसणं, म्हणणं याची किंमत कमी, अशांवर वेळीच चाळणी फिरवून बघायला काय हरकत आहे? वगळून वगळून खाली जे राहिलं ते आपलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.