‘पॉवर’ पॉइंट : बदल... बाहेरचे आणि ‘आतले!’

‘तिच्यामुळे तो शहाणा होईल. त्याच्यामुळे ती समजूतदार होईल,’’ अशी हजार वाक्यं आपण ऐकतच असतो ना? ओळखीचे तावातावानं बोलत होते, ‘‘आमच्या मुलामुळे केवळ ती आवाज चढवत नाही.'
Changes
ChangesSakal
Updated on

‘तिच्यामुळे तो शहाणा होईल. त्याच्यामुळे ती समजूतदार होईल,’’ अशी हजार वाक्यं आपण ऐकतच असतो ना? ओळखीचे तावातावानं बोलत होते, ‘आमच्या मुलामुळे केवळ ती आवाज चढवत नाही.’ दुसऱ्या ओळखीच्या आशेने म्हणत होत्या, ‘‘मुलगा आता तरी सुधारेल तिच्यामुळे.’’ असं खरंच कुणा‘मुळे’ काही होतं का? माझा तरी अमुक अमुक‘मुळे’ तमुक तमुकवर मुळीच विश्वास नाही.

आता एखाद्यामुळे दुसरी व्यक्ती चांगली घडत असेल, तर थोपटा ना त्याची पाठ, हे म्हणणं बरोबर आहे; पण असं कुणाच्या सांगण्यामुळे काही होतं? की एखाद्याच्या सांगण्यामुळे काही बदलावं हा निर्णय कायम फक्त त्या व्यक्तीचा असतो? म्हणजे काही बायकांना वाटतं, लग्नानंतर बायकोमुळे मुलगा सुधारेल. स्वतःला फसवण्याची ही सर्वोत्तम पळवाट नाही का? सुधारायचं की नाही हा निर्णय कायम ती व्यक्ती स्वत:च घेत असते. कुणासाठी म्हणून घेईल एकवेळ; पण त्या व्यक्तीनं उद्या ठरवलंच की नाहीच बदलायचं, तर वरून ब्रह्मदेव जरी आला, तरी बदल घडेलच याची शाश्वती नाही.

‘‘तुझ्यामुळे कदाचित तो निर्णय बदलेल, तुझ्यामुळे तो बिघडेल, मित्रांमुळे त्याचं लक्ष भरकटलं,’’ अशी वाक्यं फक्त तात्पुरतं समाधान करणारी असतात. आपण समोरच्याला हवं तसं बदलायचं की नाही हा निर्णय प्रत्येक व्यक्ती तीच्या तीच्या पातळीवर घेत असते.

माझ्या काही मैत्रिणी अभिमानानं सांगत असतात मला, की ‘‘माझ्यामुळे नवरा बराच बदलला. आधी कुटुंबीयांना प्राधान्य द्यायचा नाही. माझ्यामुळे द्यायला लागला.’’ आता घडलेल्या बदलाबद्दल कौतुकाची थाप आपल्या पाठीवर पडावी, असं त्या मैत्रिणींना वाटणं यात गैर नाही; पण जरा खोलवर जाऊन पाहिलं, तर कधी प्रेमापोटी, कधी स्वार्थापोटी, कधी तडजोडीतून तर कधी पर्याय नाही म्हणून हा निर्णय समोरच्या व्यक्तीनं घेतलाय हे कळतं.

उलटं बघू. ‘‘माझ्यामुळे घरातल्या चार गोष्टी ती करते,’’ हे वाक्य माझ्या मित्रानं मला ऐकवल्यावर मला तोंडावरच हसू आलं. ‘‘अरे, फार फार तर तुमच्या नात्यासाठी ती ते करत असेल; पण तुझ्यामुळे तिच्यात आमूलाग्र बदल वगैरे झालाय या भ्रमात राहू नकोस रे,’’ हे मला खूप मनापासून सांगावंसं वाटलं.

सध्या सोशल मीडियाच्या काळात ‘इन्फ्लुएन्सर’ हा शब्द बराच वापरला जातो. म्हणजे प्रभाव पाडणारी व्यक्ती. मात्र, या शब्दातच मर्यादा आहेत. एखाद्या व्यक्तीचा फार फार तर आपल्यावर ‘प्रभाव’ पडू शकतो; पण त्या व्यक्तीच्या सांगण्यामुळेच फक्त मी बदललो असं वाटत असेल, तर खरंतर तुम्ही स्वत:ची पाठ थोपटा. कारण बदलण्याचा निर्णय तुम्ही स्वत: घेतलात आणि प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तीनंही आकाश पाताळ एक करण्याची गरज नसते. कारण समोरच्याला तुम्ही बदलवू शकत नाही. बदलण्याचा फार फार तर सल्ला देऊ शकता, ही रेषा समजणं गरजेचं.

कधी समोरच्याची ‘कृती’ बघून, तर कधी समोरच्याची ‘अवस्था’ बघून आपण बदलावं ही जाणीव होऊ शकते. मात्र, ही सगळी प्रोसेस स्वत:ची स्वत:च करावी लागते. त्यामुळे आपल्या घरातल्या मुली/मुलामुळे कुणाच्या घरात काहीतरी बदलेल, ही अवाजवी अपेक्षा पालकांनीही ठेवू नये. कारण त्यानं फक्त नैतिक दबाव तयार होईल आणि नात्यात दबावातून काही बदलणं कायमस्वरूपी राहत नाही हे नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.