‘पॉवर’ पॉइंट : ओढ, ‘स्पार्क’, ‘केमिस्ट्री’ वगैरे वगैरे...

‘आमच्यात आता आधीसारखी केमिस्ट्री राहिली नाहीये, काहीतरी गडबडतंय. क्लिक होत नाहीये, काहीतरी बदललंय.
Partner Relation
Partner RelationSakal
Updated on
Summary

‘आमच्यात आता आधीसारखी केमिस्ट्री राहिली नाहीये, काहीतरी गडबडतंय. क्लिक होत नाहीये, काहीतरी बदललंय.

‘आमच्यात आता आधीसारखी केमिस्ट्री राहिली नाहीये, काहीतरी गडबडतंय. क्लिक होत नाहीये, काहीतरी बदललंय. आधी वाटायचं बस् आता आयुष्यभर एकमेकांच्यात आकंठ तल्लीन होऊन जाऊ; पण ते आधीचं अॅट्रॅक्शन हरवलंय...’’ तो घडाघडा बोलत होता. मला त्याला थांबवताही येत नव्हतं. त्याची पार्टनर त्याच्या शेजारी बसून ‘असंच काहीतरी होतंय’चे भाव डोळ्यांत आणून माझ्याकडे बघत होती.

दोघांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांना ओरडून सांगावंसं वाटलं, की ताबडतोब मॅरेज काउन्सेलरकडे जा, किंवा निवांत दोघं कुठेतरी जाऊन नातं कुठल्या टप्प्यावर आलंय, याकडे जरा वळून बघा. कदाचित चुकलेले रस्ते आपणहून दिसतील. इतकं सगळं डोक्यात सुरू असताना तिनं अजून एक बॉम्ब टाकला. म्हटली, ‘‘आता या सगळ्या विचारांतून जरा लक्ष विचलित होण्यासाठी आम्ही सहा महिने त्याच्या घरच्यांना आणि सहा महिने माझ्या घरच्यांना घरी राहायला बोलवणार आहोत.’’

मग मात्र मला राहवेना. फुकटचा सल्ला टाळावा असं मलाही वाटलं नाही, आणि त्यांनीही माझे डोळे वाचले असावेत. मला असं मनापासून वाटतं की दोन व्यक्तींच्या अधांतरी नात्याला आकार देण्यासाठी ‘घरच्यांनी’ त्यात उडी मारूच नये. त्यानं होतं असं, की फार फार तर त्या दोन व्यक्तींना काही पर्याय मिळतात; पण मूळ रोगावर उपाय मिळत नाहीत.

नात्यात तात्पुरती मलमपट्टी करायला बऱ्याच जणांना फार आवडतं; पण मूळ विचारांपाशी थांबत, त्या विचारांना हाताळत, नात्याची जरा रिव्हिजन घेण्याची मुभा ही व्यवस्था देत नाही. पण ‘घरचे’ ठरवतील हा भरवसा नातं आयुष्यभर टिकवायला तितकासा उपयोगी येत नाही. जगातले कुठलेही नातेवाईक नातं अव्याहत खळाळतं ठेवण्यास मदत करू शकणार नाहीत.

मग जेव्हा कदाचित ते दोघं एकमेकांसमोर बसतील, तेव्हा आत्तापर्यंतच्या प्रवासातले खड्डे, वळणं पुन्हा एकदा चाचपडून पाहायला काय हरकत आहे? कदाचित त्यातून कळू शकेल की, तापलेल्या कपाळावर रात्रभर पट्ट्या ठेवायला उशाशी बसलेल्या पार्टनरला दोघांची ‘केमिस्ट्री’ हैराण करत नाही. खचण्याच्या नीचोत्तम बिंदूला गेलेल्या पार्टनरला हात देऊन वर खेचणं अॅट्रॅक्शनमधून होत नाही. एकमेकांशी बोलताना आवाज टिपेला जातो, आणि दुसऱ्या क्षणी खर्जातल्या आवाजात पार्टनर पाणी देतो, अशा अपेक्षेपेक्षा जास्त निःस्वार्थीपणे वागण्याच्या वेळा येतात, तेव्हा स्पार्क कामी येत नाही. त्यामुळे ओढ, स्पार्क, केमिस्ट्री हे फार वरवरचे शब्द आहेत हे जरा उशिराच कळतं. ओढ कुठल्याही क्षणी तुटू शकते आणि स्पार्क ठिणगीसारखाच क्षणभंगुर..

खूप खोल खोल विचार करत ते एकमेकांसमोर बसतील, नात्यात कमी पडणाऱ्या गोष्टींवरून एकमेकांनाच आधार द्यायला लागतील तेव्हा ते वरच्या तीन गोष्टींपेक्षाही पलीकडचं काहीतरी असेल, नाही का? मार्ग शोधण्यासाठी एकाच वाटेवर थांबून हात घट्ट पकडून ठेवणं ही जबाबदार जवळीक कुठल्या शब्दांत व्यक्त करणार? मला काही वेळा ही प्रेमाच्याही पुढची वाटते. दोघांमध्ये काय कमी पडतंय, काय हरवलंय हे हेरून त्यावर विचार करणं, बोलणं ही प्रेमानंतरची पायरी आहे. सहवासाला आलेलं शहाणपण असावं का?... त्यामुळे मागे वळून नक्की बघा. कदाचित कुठलाच रस्ता चुकलेला नसेल. फक्त जरा सपाट झाला असेल... तुम्हाला काय वाटतं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.