‘पॉवर’ पॉइंट : अडकलेपणा आणि स्वातंत्र्य

‘मला फार अडकल्यासारखं झालंय. पुढे काय माहीत नाही; पण आत्ता हे करतेय ते करायचं नाहीये,’ आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी अतिशय कॉमन फेज.
Problem
ProblemSakal
Updated on

‘मला फार अडकल्यासारखं झालंय. पुढे काय माहीत नाही; पण आत्ता हे करतेय ते करायचं नाहीये,’ आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी अतिशय कॉमन फेज. जे त्या फेजमध्ये असतात त्यांनाच फक्त माहीत असते या अडकण्यामागची घुसमट, अस्वस्थता.. ही फेज नोकरीत येऊ शकते, नात्यात येऊ शकते, जगण्याच्या कुठल्याही टप्प्यात येऊ शकते. बरं, अडकल्यासारखं वाटलं म्हणून हातचं सगळं सोडून देण्याची उमेद किंवा परिस्थिती प्रत्येकाचीच असेल असंही नाही.

जेव्हा जेव्हा मी अशा ‘अडकण्याच्या’ फेजमध्ये आहे असं स्वत:ला जाणवलंय, त्यावेळेस पहिली गोष्ट मी केली ती म्हणजे, आहे त्या परिस्थितीची सवय करून घ्यायची नाही. एक काकू परवा मला म्हटल्या, ‘अगं, आता काय यांच्या अशा वागण्याची सवय झालीये मला. आता अंगवळणी पडलाय मला तो स्वभाव.’ एक मित्र सांगत होता, ‘नोकरीत ना, आहे हे असं आहे, मी फार काही बदलवायला जात नाही, सवय करून घेतलीये.’ वर उल्लेखलेले परिस्थिती आणि उमेद हे दोन शब्द, मी या अर्थानं म्हटले.

आपल्याला पुढे पाऊल टाकायचं असतं; पण समोर काहीच दिसत नसलं, की थबकायला होतं. म्हणून आहे त्या पावलाखालच्या परिस्थितीची ‘सवय’ करून घेणं हा उपाय असू शकतो का? सतत एकच गोष्ट परत परत करत राहिल्यानं ती करण्यात आपण पारंगत होतो, चार लोक ‘बेस्ट’ वगैरे म्हणतातही; पण ही खरंच ‘ग्रोथ’ असू शकते का? हा प्रश्न एकदा तरी स्वत:ला विचारायला हवा.

‘तू होतीस म्हणून निभावलंय बाई,’ किंवा ‘‘हे काम फक्त तूच करू शकतोस,’ फक्त या वाक्यांकरता, कुणासाठी, कुणावर आयुष्य उधळून द्यावं का? आणि ही वाक्यं ऐकण्यासाठी आयुष्य उधळलेल्यांना दिवसाच्या शेवटी ‘कुठेतरी अडकलो आहोत’ हे फीलिंग खात असेल, तर त्या कौतुकाला काय अर्थ राहिला? अनेकदा अडकलेली भावना असली, तरी त्यातून काही फायदेही दिसत असतात. मग ते कधी आर्थिक असतात, कधी मानसिक. म्हणजे सोप्या भाषेत केक संपूही नये, खायचाही असतो; पण या खाण्यानं अपचन होतंय हेही कळत असतं. मात्र, या सगळ्यातून आपण यंत्रवत होण्याचीच शक्यता मला जास्त वाटते.

आपण आता स्वातंत्र्य दिन साजरा करू. यानिमित्तानं आपल्या निर्णयांत, कामात, नात्यात, जगण्यात आपण खरंच स्वतंत्र राहिलो आहोत का, याचा पुन्हा एकदा विचार करूया. ज्या क्षणी आपल्याला अडकल्याची भावना येईल त्याक्षणी पाऊल बदलणं ही गरजेची गोष्ट आहे. हा बदल त्रासदायक असतो; पण अडकल्याची भावना त्याहून जास्त त्रासदायक असते- कारण त्यात बदल घडण्याची काही आशाच नसते. जादूची कांडी फिरवल्यासारखं लगेच काही बदलणार नाही; पण अडकलो आहोत अशा वाटणाऱ्या नात्याची, नोकरीची, कामाची, जगण्याची किमान सवय तर करून घ्यायला नको. काहीतरी वेगळं करायला जायला नको, आहे त्या गोष्टीकडेच थोड्या वेगळ्या अप्रोचनी बघितलं की आणखी मोकळं आकाश दिसेल. अडकलेपण्याच्या भावनेतून कोणत्याही नात्याला न्याय मिळत नाही. अडकलेपणाच्या भावनेतून फक्त साचेबद्ध काम होऊ शकतं. आणि ‘सवयीच्या’ नावाखील ‘अडकलेपणा’ मिरवण्यापेक्षा त्यातून बाहेर पडल्यानंतरचं ‘स्वातंत्र्य’ मिरवण्यात खरा आनंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.