सौंदर्यखणी : चांदणे शिंपीत जाणारी... ‘चंद्रकळा’

Chandrakala-Saree
Chandrakala-Saree
Updated on

चंद्रकळा साडी म्हणजे नक्की कोणती, याबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. काळी पैठणी किंवा काळी इरकल म्हणजे चंद्रकळा का? तर नाही! ‘चंद्रकळा’ हे एक डिझाईन आहे. काळ्या किंवा काळ्याच्या जवळ जाणाऱ्या गडद निळ्या रंगाच्या साडीवर ‘चंद्रकळा’ हे डिझाईन असलेली साडी म्हणजे चंद्रकळा साडी! या डिझाईनच्या जरीच्या बुट्ट्यामध्ये चंद्राची बारीक कोर आणि चांदण्या किंवा सुंदर छोटी फुलं विणलेली असते. म्हणजे चंद्राच्या कला आणि टिपूर चांदण्यांचं डिझाईन असलेली ही साडी. 

पूर्वी महाराष्ट्रात नववधूला तिच्या पहिल्या संक्रांतीच्या सणाला ‘चंद्रकळा’ भेट देण्याची प्रथा होती. ती तिच्या पहिल्या संक्रांतीचे हळदीकुंकू, ही साडी नेसून करत असे. संक्रांतीच्या दिवशी नेसल्या जाणाऱ्या पूर्वीच्या चंद्रकळांवर काटेरी हलव्यासारखी दिसणारी फुलंही कधीकधी विणलेली दिसत. पूर्वी या ‘चंद्रकळा’ इरकल साड्यांमध्ये बनायच्या, नंतर चंदेरी, बनारसी आणि पैठण्यांमध्येही चंद्रकळा बनू लागल्या आणि मग असा समज झाला की काळी पैठणी म्हणजेच चंद्रकळा. मग चांदण्यांसारख्या बुट्ट्या असलेल्या काळ्या पैठण्या ‘चंद्रकळा’ झाल्या.

खूप पूर्वी, विणलेल्या चंद्रकळेबरोबरच काही कमी किंमतीच्या, सोनेरी किंवा चंदेरी ‘खडी-काम’ केलेल्या चंद्रकळाही बनत असत; पण काही वर्षांनी ती खडी जात असे. त्यामुळे अशा साड्यांची मागणी कमी झाली आणि त्या साड्या बनणं बंद झालं; पण विणलेल्या चंद्रकळा पिढ्यान्‌पिढ्या टिकत असत. पुण्यात केळकर वस्तुसंग्रहालयात, सुमारे दोनशे वर्षांपूर्वीच्या दोन इरकल चंद्रकळा साड्या आणि चंद्रकळा डिझाईन असलेला एक पैठणी-शेला उपलब्ध आहे. यातील अहिल्याबाई किर्लोस्करांनी म्युझियमला भेट दिलेल्या इरकल चंद्रकळेच्या पदरावर रेशमाच्या धाग्यानं कर्नाटकी कशिद्याने सुंदर गोपुरं आणि चांदण्या विणलेल्या आहेत. शिवाय या पदरावर कृष्णजीवनावर आधारित देवनागरीत अनेक काव्यपंक्ती विणलेल्या आहेत. त्या काळात बोरू शाईत बुडवून दोन शब्दात अंतर न ठेवता अखंड लिहीत जायचे. या संपूर्ण साडीवर पांढऱ्या, पिवळ्या रंगाच्या रेशमानं बारीक चांदण्या आणि छोट्या आरशांच्या भोवती विणकाम केलेली फुलं आहेत. या साडीला चंद्रकळेचा, अतिशय अप्रतिम आणि दुर्मीळ नमुना म्हणावा लागेल. दुसऱ्या चंद्रकळेवरही छोटी गोपुरं आणि नक्षीदार चौक कशिद्यात भरलेली असून संपूर्ण साडीवर छोट्या चांदण्यांसारखी फुलं भरलेली आहेत. या चंद्रकळा नेसणाऱ्या स्त्रियांनी त्या किती अभिमानानं मिरवल्या असतील! 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशी ही, सुंदर काळ्या रंगाची नजाकत असलेली साडी, जी नेसल्यावर रात्रीचे टिपूर चांदण्यांचं आकाश अंगावर पांघरल्याचा भास होतो आणि आता, अशी एक तरी चंद्रकळा आपल्याकडे हवी अशी स्वप्नं चोखंदळ स्त्रियांना पडू लागतील हे नक्की. 
  
चंद्रकळेशी ‘ऐतिहासिक’ नातं!
मृणाल कुलकर्णी हे नाव नुसतं ऐकलं, तरी १९८८ मध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या ‘स्वामी’ मालिकेतल्या भावुक डोळ्यांच्या, लाघवी रमाबाई पेशवे आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट उभ्या राहतात. या मालिकेतल्या तिच्या कसदार अभिनयाबरोबरच तिचा पेशवाई पेहरावही आपल्या लक्षात राहिला. तिनं घातलेले दागिने, तिनं नेसलेल्या नऊवार साड्या आणि बरंच काही. तिच्या त्या साड्यांमधली एक साडी मृणालसाठी खूप खास होती- सरदार घराण्यातली नऊवार पैठणी-चंद्रकळा.  

जेव्हा ‘स्वामी’ या मालिकेत, रमाबाईंच्या भूमिकेसाठी मृणालची निवड झाली, तेव्हा तिच्या दोन्ही आजोबांना प्रचंड आनंद झाला. दोन्ही आजोबा म्हणजे- एक तिच्या आईचे वडील, साहित्यिक गो. नि. दांडेकर आणि दुसरे आजोबा म्हणजे तिच्या आजोबांचे खास मित्र- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. बाबासाहेबांना जेव्हा हे कळालं, की मृणाल, रमाबाईंची भूमिका करणार आहे, तेव्हा त्यांनी खास तिच्या त्या भूमिकेसाठी सरदार नातू घराण्यातला अनमोल ठेवा असलेली चंद्रकळा आणि खऱ्या सोन्याचे पेशवाई दागिने मृणालसाठी पाठवून दिले. मृणालसाठी ते सगळं खूप अद्‍भुत होतं. ती म्हणाली, ‘‘तेव्हा मी फक्त सतरा वर्षांची होते. रमाबाईंसारख्या ऐतिहासिक जबाबदार भूमिकेसाठी, ऐतिहासिक ठेवाअसलेली ती नऊवार चंद्रकळा नेसल्यानंतर मनावर आलेलं गोड ओझं, कोणत्याच अर्थानं मला पेलवण्यासारखं नव्हतं... पण मी प्रयत्नपूर्वक ते पेललं!’’ शूटिंग संपल्यानंतरही मृणाल कितीतरी वेळ ती साडी अंगावर मिरवत राहायची. आजही मृणालच्या, मौल्यवान आठवणीच्या कप्प्यात त्या साडीला अढळ स्थान आहे. 

पुढे २००८ मध्ये मृणालच्या आयुष्यात अजून एक चंद्रकळा आली. नितीन देसाईंच्या, ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेत राजमाता जिजाऊसाहेबांच्या भूमिकेतल्या मृणालसाठी, कॉस्च्युम डिझायनर पौर्णिमा ओक हिनं चंद्रकळा बनवायचीच असं ठरवलं. मग मृणालचा जुना फोटो बघून जिजाऊसाहेबांच्या भूमिकेला शोभेल अशी चांदणी-फुलांच्या बुट्ट्याची सुंदर अशी पैठणी-चंद्रकळा तिनं बनवून घेतली आणि मृणालनं परत एकदा नऊवार चंद्रकळा ल्यायली! तेव्हा परत एकदा मृणालचे चंद्रकळेशी रेशमीधागे जुळले ते पुढे कायम राहिले- कारण मग मृणालनं स्वतःची अशी खास चंद्रकळा पैठणी बनवून घेतली. 

मृणालकडे पैठण्यांचा खूप मोठा संग्रह आहे. तिचे यजमान ॲड. रुचिर कुलकर्णी, तिच्या या संग्रहाला ‘पैठणी म्युझियम’च म्हणतात. अनेक रंगां-ढंगाच्या पैठण्यांबरोबरच खेळ जिंकून आदेश भाऊजींकडून मिळालेली पैठणीही तिच्या या संग्रहांत आहे; पण या ‘म्युझियम’मध्ये, मृणालच्या करीअरमधल्या दोन्ही महत्त्वाच्या भूमिकेची साक्षीदार असलेल्या चंद्रकळेचं स्थान मात्र कायमच अबाधित राहील.

सोळाव्या शतकापासून प्रचलित 

  • मराठी साहित्यातील सोळाव्या शतकातल्या ओवी, गवळणी आणि भारुडांमध्ये आलेल्या चंद्रकळेच्या उल्लेखावरून, चंद्रकळा त्या शतकात अस्तित्वात होती याचे दाखले मिळतात.  
  • पेशवेकालीन संस्कृतीत, सासूचा वापरात असलेला चंद्रकळा डिझाईनचा शेला, योग्य वेळ आल्यावर सासू, आपल्या सुनेला भेट म्हणून देत असे. घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या आता सुनेवर सुपूर्त करण्याचे ते प्रतीक असे.    

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.