सौंदर्यखणी : ‘शिफॉन’चं झुळझुळीत सौंदर्य

जगात सगळीकडे तयार होणारं शिफॉनचं कापड, सर्वांत आधी फक्त फ्रान्समध्ये बनत असे आणि मग औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात शिफॉन बनू लागलं. ‘शिफॉन’ हा मूळचा फ्रेंच शब्द असून त्याचा अर्थ आहे ‘कापड’.
Rutuja Bagwe
Rutuja BagweSakal
Updated on

आज आपण एका अशा साडीवर बोलणार आहोत, जी प्रत्येकीकडे निदान एकतरी असतेच. कोणत्याही ढाच्यात न बसणाऱ्या या साडीला कोणत्याही प्रांताच्या सीमा नाहीत. बर्फाच्या पर्वतराजींवर कडाक्याच्या थंडीत पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर, ‘व्हायब्रन्ट-कलर’च्या साड्यांचा वाऱ्यावर उडणारा लांबलचक पदर सावरत गाणं म्हणणाऱ्या नायिका पाहिल्या, की त्या हिरोबरोबर प्रेक्षकही, त्या नायिकेच्या आणि त्या साडीच्या प्रेमात पडतात. प्रेक्षकांना प्रेमात पाडणारी आणि नायिकांचं अस्मानी सौंदर्य खुलवणारी हीच ती ‘शिफॉन साडी.’

जगात सगळीकडे तयार होणारं शिफॉनचं कापड, सर्वांत आधी फक्त फ्रान्समध्ये बनत असे आणि मग औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात शिफॉन बनू लागलं. ‘शिफॉन’ हा मूळचा फ्रेंच शब्द असून त्याचा अर्थ आहे ‘कापड’, त्यामुळे औद्योगिक क्रांतीनंतर फ्रान्समधून जगभरात लोकप्रिय झालेलं हे कापड ‘शिफॉन’ म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं. पॉवरलूमवर, अगणित रंग-रूपांत आणि डिझाईनमध्ये बनणाऱ्या या साड्या अतिशय टिकाऊ असतात. वजनाला हलक्या-फुलक्या आणि ‘सेमी-ट्रान्स्फरंट’ असणाऱ्या या साड्या ‘प्लेन’ किंवा ‘प्रिंटेड’ असतात. आधी कम्युटरवर या साडीवरचं प्रिंट डिजिटली काढून घेतलं जातं. सिल्क, कॉटन, नायलॉन, पॉलिएस्टर किंवा रेयॉनसारखे घटक विशिष्ट प्रमाणात एकत्र करून शिफॉनचे धागे बनविले जातात. या साडीचा धागा मशीनवर ‘ट्विस्ट’ होत असल्यामुळे खूप ‘सॉफ्ट’ आणि ‘सुळसुळीत’ असतो. औद्योगिक क्रांतीच्या आधी युरोपमध्ये शिफॉनच्या धाग्यांमध्ये सिल्कचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असे- त्यामुळे फक्त उच्चभ्रू लोकच हे ‘सिल्क-शिफॉन’ वापरत असत; पण औद्योगिक क्रांतीनंतर जगभर या कापडाचा प्रसार झाल्यानंतर शिफॉनमधील सिल्कचं प्रमाण कमी होऊन सिंथेटिक धाग्याचं प्रमाण वाढलं. त्यामुळे या साड्यांमध्येही ‘सिंथेटिक-शिफॉन’ आणि ‘सिल्क-शिफॉन’ असे प्रकार असतात. उच्च प्रतीच्या डिझायनर शिफॉन साड्या बनवताना ‘सिल्क-शिफॉन’ वापरलं जातं. या साड्या अतिशय झुळझुळीत असून त्यांना किंचित तकाकी असते. बऱ्याचदा साडी खरेदी करताना, शिफॉन साड्या आणि जॉर्जेट साड्यांमधला फरक माहीत नसतो. शिफॉन साड्या, ‘सुपर फाइन’ धाग्यानं विणल्या जातात, त्यामुळे त्या जॉर्जेट साड्यांपेक्षा जास्त तलम, झुळझुळीत आणि किंचित तकाकी असणाऱ्या असतात.

शिफॉन साडीचा फ्लो खूप छान असल्यामुळे मोठमोठ्या फॅशन शोजमध्येसुद्धा ‘डिझायनर शिफॉन साड्या’ झळकताना दिसतात. जरीवर्कच्या शिफॉन साड्यासुद्धा हल्ली ट्रेन्डमध्ये आहेत. ड्रेप केल्यावर या साड्या बिलकुल फुगत नाहीत आणि छान चापून-चोपून बसतात. प्लेन शिफॉन साडीवर, ‘सिक्वेन्सचं डिझायनर ब्लाऊज’ किंवा ‘कॉन्ट्रास्ट कलमकारी’ किंवा ‘ईकत कॉटन’चं ब्लाऊजही सुरेख दिसतं, तर प्रिंटेड शिफॉनवर प्लेन ब्लाऊज सुरेख दिसतं.

कोणत्याही प्रसंगी नेसता येणाऱ्या या साड्या, महिला वर्गात अतिशय लोकप्रिय आहेत आणि या साडीचं ‘झुळझुळीत-सौंदर्य’, नेसल्यावर तर अधिकच खुलतं.

धागा नात्याचा, अन् सर्जनशीलतेचाही!

दर्जेदार मराठी नाटकं आणि मालिकांमधून दिसणाऱ्या लाघवी चेहऱ्याच्या ऋतुजा बागवेला लहानपणापासूनच अभिनयाची आवड तिच्या आईनं रुजवली होती. ऋतुजा शाळा-कॉलेजमध्ये असल्यापासूनच नाट्य आणि एकांकिका स्पर्धेत भाग घ्यायची. तेव्हा तिला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ची खूप बक्षिसंदेखील मिळाली होती. पुढे प्रायोगिक आणि व्यवसायिक नाटकांमधून तिचं ‘टॅलेंट’ बघून तिला मालिका आणि चित्रपटांच्याही खूप ऑफर्स आल्या आणि तिचा सिनेक्षेत्रात प्रवेश झाला. मिलिटरी स्कूलमध्ये जाणारी ऋतुजा लहानपणापासूनच हरहुन्नरी होती. शाळेत असताना कराटे, रायफल शूटिंग, हॉर्स-रायडिंगमध्ये तिचं प्रावीण्य होतं. तसंच वाचन, दर्जेदार चित्रपटांचा आस्वाद घेणं, बागकाम, पाककला या गोष्टीही, ती सवड मिळेल तसं आवर्जून करत असते. शिवाय पेंटिंग आणि वेगवेगळी माध्यमं वापरून फुलं बनवण्याची कला तिला लहानपणापासूनच अवगत होती. या कलाकुसरीची प्रचिती ऋतुजा खूप लहान असतानाच आली होती.

तेव्हा ऋतुजा फक्त अडीच वर्षांची होती. एके दिवशी ऋतुजा घरात, हॉलमध्ये खेळत असताना आणि तिची आई तिथेच टीव्ही बघत भाजी निवडत बसली होती. कलाकुसरीची आवड असणारी ऋतुजा कात्रीशी खेळत होती. तिच्या आईनं तेव्हा शिफॉनची साडी नेसली होती आणि आईच्या साडीचा लांबलचक पदर आईच्या पाठीमागे खाली लोळत होता. त्या झुळझुळीत ‘ऑफ व्हाइट’ रंगाच्या साडीवरची सुंदर फुलं बघून, हातात कात्री असलेल्या ऋतुजाला कलाकुसर करण्याची उर्मी दाटून आली आणि तिनं कात्रीनं त्या पदरावर जमेल तसं कापून बारीक नक्षीकाम केलं. टीव्ही बघण्यात मग्न असलेल्या आईला ते कळलंदेखील नाही. ऋतुजाचं नक्षीकाम झाल्यावर ती आईला म्हणाली, ‘‘आई, हे बघ मी किती छान नक्षी कापली आहे!’’ ते बघून तिच्या आईला, तिला ओरडू, की रडू, की हसू... काहीच कळेना. मात्र, कायमच ऋतुजाला प्रोत्साहन देणारी तिची आई तिला बिलकुल ओरडली नाही- उलट तिच्या ‘क्रिएटिव्ह लेकी’चा हा किस्सा ती सगळ्यांना अजूनही सांगत असते. ती कापलेली साडी आता नाही; पण ऋतुजानं दुसऱ्या शिफॉन साडीमधला फोटो ‘सकाळ’साठी दिला!

मोठी झाल्यावर ऋतुजानं या गमतीदार किश्श्याची आठवण म्हणून एक ‘क्रिएटिव्ह फ्रेम’ करून आईला भेट दिली. त्या फ्रेममध्ये तिनं आईचं एक ‘सिम्बॉलिक चित्र’ आणि हातात कात्री घेतलेल्या दोन-अडीच वर्षांच्या छोट्या बाळाच्या चित्राचं कोलाज केलं. त्यात तिनं अजून एक क्रिएटिव्हिटी केली. आईचा जरीचा एक भरजरी ब्लाऊजपीस घेऊन, ‘लहानपणी तिनं कापलेल्या पदराची’ आठवण म्हणून ते ब्लाऊजपीस चित्रातील आईचा पदर म्हणून लावला. मग त्या ‘युनिक’ चित्राच्या बाजूला स्वतः आईवर लिहिलेली कविता लिहून आईच्या वाढदिवसाला ती फ्रेम भेट दिली. शिवाय आईला ‘ऑफ व्हाइट’ रंग आवडतो म्हणून ऋतुजा तिच्या कमाईमधून आईसाठी ‘ऑफ व्हाइट’ रंगाच्या वेगवेगळ्या साड्या नेहमी घेत असते. खूप वर्षांपूर्वी ऋतुजानं तिच्या आईच्या पदराचे धागे जरी कापले, तरी त्यांच्या नात्याचा धागा मात्र ‘त्या फ्रेम’मध्ये अजूनही डोकावतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.