सौंदर्यखणी : ‘रॉ-टेक्श्चर’चं ‘रेशीम’नातं

आज आपण ‘रॉ सिल्क’ म्हणजे नक्की काय ते बघू. रेशमाच्या किड्यांच्या वेगवेगळ्या जाती अस्तित्वात आहेत, त्यातील ‘बॉम्बीक्स मोरी’ नावाच्या रेशमाच्या किड्यांनी बनवलेलं सिल्क जगभरात उच्च दर्जाचं मानलं जातं.
mrunmayee deshpande
mrunmayee deshpandeSakal
Updated on

आज आपण ‘रॉ सिल्क’ म्हणजे नक्की काय ते बघू. रेशमाच्या किड्यांच्या वेगवेगळ्या जाती अस्तित्वात आहेत, त्यातील ‘बॉम्बीक्स मोरी’ नावाच्या रेशमाच्या किड्यांनी बनवलेलं सिल्क जगभरात उच्च दर्जाचं मानलं जातं. रेशमाचे मादी किडे एका वेळेस अंदाजे ५०० अंडी घालतात आणि मग दहा दिवसांनी त्या अंड्यातून बारीक अळ्या बाहेर येतात, त्यांना ‘लार्व्हा’ म्हणतात. त्यानंतर त्या अळ्यांना मलबेरी झाडाची ताजी पानं खायला दिली जातात. मग त्या अळ्या लागोपाठ ३५ दिवस सतत पानं खातच राहतात आणि ३५ दिवसांनी पूर्ण वाढ झाल्यावर पानं खायचं थांबवतात, तेव्हा त्यांचं वजन चक्क १०,००० पटींनी वाढलेलं असते. त्यानंतर त्या स्वतःभोवती कोश विणायला घेतात. या अळ्यांच्या लाळग्रंथीतून प्रोटिनयुक्त पदार्थ स्रवत असतो, त्या पदार्थात त्या अळ्यांच्या तोंडात ‘सेरीसीन’ नावाचा चिकट पदार्थ मिसळला जातो आणि एक मिश्रण तयार होतं. कोश बनवायला सुरुवात केल्यावर त्या अळ्यांच्या तोंडाच्या खालच्या बाजूला असलेल्या छिद्रातून हे मिश्रण तंतूसारखं बाहेर येऊ लागतं आणि हवेतल्या ऑक्सिजनशी संपर्कात आल्यावर त्या मिश्रणाचा धागा बनतो.

तीन दिवसांत तो कोश बनून तयार होतो. मग पुढे पंधरा-सोळा दिवस त्या अळ्या त्या कोशातच राहतात! सोळाव्या दिवशी आतील अळीचं पाकोळीत (मॉथमध्ये ) रूपांतर होतं. या पाकोळीच्या तोंडातून अल्कली द्राव स्रवतो आणि कोशाला छिद्र पडतं. या छिद्राच्या मदतीनं पाकोळी, कोश तोडून बाहेर येते. या तुटलेल्या कोशापासून रेशीम बनतं; परंतु व्यावसायिकदृष्ट्या अखंड रेशीम मिळवण्यासाठी अळीचं पाकोळीत रूपांतर होण्याच्या आधीच हे रेशमाचे कोश गरम पाण्यात टाकले जातात! गरम पाण्यामुळे ‘सेरीसीन’ पदार्थ धुतला जातो आणि कोशातले धागे सुट्टे होतात. त्यातीलच एक सुट्टं टोक पकडून तकाकी असलेला मऊसूत अखंड सिल्कचा धागा मिळवला जातो. मात्र, अशा प्रकारे सिल्क मिळवताना ‘सिल्क वर्म्स’ना हानी पोचते म्हणून ‘ॲनिमल राईट्स’चा कट्टर पुरस्कार करणारे, अशा पद्धतीनं बनवलेले सिल्क वापरत नाहीत. त्यामुळे नैसर्गिकरित्या पाकोळ्या बाहेर येतात, तेव्हा त्या तुटलेल्या कोशांपासून सिल्क बनवण्याच्या प्रक्रियेत, अळ्या असलेले रेशमाचे कोश गरम पाण्यात टाकले जात नाहीत, तर नुसते धुवून घेतले जातात आणि त्यामुळे त्या रेशमी धाग्यातला ‘सेरिसिन’ पदार्थ बऱ्याच अंशी तसाच राहतो.

तुटलेल्या कोशापासून अखंड रेशीम मिळत नाही; पण कापसापासून जसं सूत काढलं जातं तशा पद्धतीनं रेशमांच्या तुटलेल्या तंतूंना पीळ देऊन रेशमी सूत बनवलं जातं. त्यामुळे या सुतांचा पोत अखंड रेशमी सुताइतका मुलायम नसतो. दोन ते पाच-सहा सुतांना एकत्र पीळ देऊन दोन प्लाय ते पाच-सहा प्लायचे रेशमी धागे बनवले जातात. अशा पद्धतीनं मिळवलेल्या सिल्कला ‘अहिंसा सिल्क’ म्हणतात. कोश फुटायच्या आधी किंवा कोश फुटल्यावर त्यातून काढलेल्या सिल्कच्या धाग्यांवर कोणतीही केमिकल प्रक्रिया केली नाही, तर ते ‘रॉ सिल्क’चे धागे असतात आणि त्या धाग्यांमध्ये असलेल्या ‘सेरिसिन’मुळे आणि धाग्यांच्या विशिष्ट पोतामुळे ‘रॉ-सिल्क’च्या साड्यांना एक विशिष्ट ‘टेक्श्चर’ असतं. या ‘रॉ-टेक्श्चर’ला स्वतःचं एक खास सौंदर्य आहे आणि हे ‘टेक्श्चर’च रॉ सिल्कच्या साड्यांची खासियत आहे! ‘रॉ-सिल्क’च्या साड्यांना मोठी ऐतिहासिक परंपरा नसली, तरी ‘रॉ-सिल्क’मध्ये मोठ्या प्रमाणात डिझायनर साड्या बनत आहेत. प्लेन रॉ सिल्कच्या साडीवर कॉन्ट्रास्ट कलमकारी किंवा खणाचं ब्लाऊज ‘ट्रेंड’मध्ये आहे.

मृण्मयीची पहिली कमाई

आवाजात आणि चेहऱ्यात कमालीचा गोडवा असलेली, मधाळ डोळ्यांची मृण्मयी देशपांडे आपल्याला मराठी-हिंदी चित्रपटांमधून, नाटकांमधून, मालिकांमधून, वेब सिरीज मधून भेटत आली आहे आणि त्यातील तिचा चोख अभिनय कायमच आपल्याला खास लक्षात राहतो. तिचं दिग्दर्शनही आपण ‘मन फकीरा’मध्ये पाहिलं आहे आणि लवकरच ‘मनाचे श्लोक’ या आगामी चित्रपटामधूनही तिच्या दिग्दर्शनाची ताकद आपल्याला पाहायला मिळणार आहे. लहानपणापासूनच स्वावलंबनाची जाण असलेल्या मृण्मयीनं वयाच्या १८ व्या वर्षीच काम करायला सुरुवात केली. तिच्यासाठी तिचं काम आणि तिची पहिली कमाई खूप महत्त्वाची होती. मृण्मयीनं तिच्या पहिल्या कमाईतून, आईसाठी एक छानशी पिवळ्या रंगाची ‘रॉ सिल्क’ची साडी घेतली होती. तेव्हा चार हजार किंमत असलेली ती साडी घेऊन बिलाचे पैसे देताना, मृण्मयी भूतकाळात गेली... कपड्यांवर इतके पैसे एकरकमी खर्च केलेले तिनं कधी पाहिलेच नव्हते...!

आईच्या वाढदिवसानिमित्त मृण्मयीनं, तेव्हा तिला साड्यांविषयी फार माहिती नसतानाही एकटीनं जाऊन ती साडी घेतली आणि आईला गोड सरप्राईझ दिलं. आईलाही ते ‘सरप्राईझ’ आणि ती साडी फार आवडली. ‘पहिल्या कमाईच्या पहिल्या साडीमुळे’ दोघीही खूप ‘इमोशनल’ झाल्या होत्या. पहिल्या कामातून आलेली ती साडी पुढे मृण्मयीच्या यशाची साक्षीदार बनत गेली. ‘लाईम लाईटमध्ये एकदा घातलेला पेहेराव परत घातला जाऊ नये...’ च्या जमान्यात कसलाही विचार न करता मृण्मयीनं ती साडी अनेक वेळा अनेक ठिकाणी नेसली !

विशेष म्हणजे, दिग्पाल लांजेकरच्या ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या दोन्ही चित्रपटात ‘केसर’ साकारणाऱ्या मृण्मयीचा अभिनय म्हणजे ‘मास्टर पीस’ होता. या दोन्ही ऐतिहासिक चित्रपटांनी ‘बॉक्स-ऑफिस’वर इतिहास घडवला. याच ‘फर्जंद’च्या प्रमोशनसाठी ‘चला हवा येऊ दे’च्या कार्यक्रमात मृण्मयीनं तिची तीच ‘फेवरेट साडी’ नेसली होती. याच पिवळ्या ‘रॉ सिल्क’च्या साडीमुळे, ‘साडी’ प्रकाराच्या प्रेमात पडलेल्या मृण्मयीनं ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’च्या प्रमोशनच्या सगळ्या कार्यक्रमांना आवर्जून साड्याच नेसल्या! पुढे २०१७ मध्ये मृण्मयीला लग्नात आईकडून आलेल्या पाच मुहूर्ताच्या साड्यांबरोबर तिच्या करिअरच्या मुहूर्ताची ही पिवळी साडीही तिच्याकडे आली आणि तिच्या कपाटात आणि मनात विराजमान झाली ती... कायमची!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.