सौंदर्यखणी : अंगठीतून आरपार जाणारी ‘मसलिन’ साडी!

पश्चिम बंगालची उल्लेखनीय साडी म्हणजे ‘मसलिन साडी!’ तिला ‘मल कॉटन साडी’ असंही म्हणतात.
Sayali Sanjiv
Sayali SanjivSakal
Updated on

पश्चिम बंगालची उल्लेखनीय साडी म्हणजे ‘मसलिन साडी!’ तिला ‘मल कॉटन साडी’ असंही म्हणतात. सतराव्या शतकात बंगालमधील ‘ढाका’ प्रांतात, मेघना नदीच्या किनारी, ‘फुटी कपास’ नावाची कापसाची झाडं होती. त्या झाडांच्या कापसापासून अत्यंत तलम सूत हातानं कातले जाई. त्यापासून हातमागावर विणलेलं कापड म्हणजे ‘मसलिन!’

‘फुटी कपास’ हा अत्यंत मऊ कापूस असून त्यापासून अतिशय कौशल्यानं सूत काढलं जात असे. काही ‘शे’ वर्षांपूर्वी इथे तयार होणारं तलम मसलिन जगभर ‘ढाका मसलिन’ म्हणून प्रसिद्ध होतं. मोठ्या कौशल्यानं नाजूकपणे स्थानिक महिला ‘मसलिन’चे धागे बनवत असत. मेघना नदीच्या सुपीक खोऱ्यात ‘फुटी कपास’ची शेती होत असे, झाडांच्या बियांवरही, पेरण्यापूर्वी मोठे संस्कार होत असत. चांगल्या बिया कडकडीत उन्हात वाळवून, मग आतून शुद्ध तूप लावलेल्या मातीच्या मडक्यात ठेवून, ते मडकं चुलीच्या वर ऊबदार जागेत काही दिवस बांधून ठेवले जात असे.

कापसापासून ‘मसलिन’चे धागे काढण्याचे काम फक्त पहाटे किवा संध्याकाळी केलं जाई- कारण त्या प्रहरी हवेत हे धागे बनवण्यासाठी लागणारे बाष्प योग्य त्या प्रमाणात असतं. कधीकधी हे धागे बनविताना त्या ठिकाणी पाण्याची मोठी भाडी ठेवली जात असत- त्यामुळे भांड्यातील पाण्याचं बाष्पीभवन होऊन, हवेत बाष्पाची योग्य मात्रा टिकून राहत असे, किंवा हवेतील बाष्पासाठी बऱ्याचदा हे धागे काढण्याचे काम, मेघना नदीच्या किनाऱ्यावर केले जात असे.

झाडावरून अलगद कापूस काढल्यानंतर त्यातील बिया काढून तो कापूस हातानं किंवा ‘धनुकली’ नावाच्या छोट्याशा धनुष्याच्या आकाराच्या वस्तूनं पिंजला जात असे. पिंजण करताना हे तंतू हवेत उडत असत आणि उडालेले हे हलके तंतू वेचून त्यांना हातानं पीळ देऊन अत्यंत तलम, नाजूक आणि पातळ ‘मसलिन’चे धागे बावविले जात असत. मग हे लांब धागे नदीच्या पाण्यात बुडवून वाळवले जात असत, त्यामुळे हे थोडे आकसत असत. ‘मसलिन’चे धागे तलम-पातळ असले तरी आकसल्यामुळे अत्यंत टिकाऊ होत असत. हे धागे मग हातमागावर विणून तलम पारदर्शी ‘मसलिन’च कापड विणलं जात असे. ‘मसलिन’चे हे पातळ धागे आणि ‘मसलिन’चं तलम कापड फक्त हातानंच तयार होऊ शकतं.

पुढे इंग्रजांनी हातमागावर चालणारा हा वस्त्रोद्योग बंद पाडला. या काळात ‘फुटी कपास’ ही कापसाची जात नामशेष झाली; पण नंतर ‘देवकापूस’सारख्या उच्च दर्जाच्या इतर काही कापसाच्या जातीच्या कापसा-पासूनसुद्धा मल कॉटन बनविण्याचे प्रयोग होऊ लागले. पूर्वी ५०० ते ७०० ‘काऊंट’चे ‘मसलिन’चे धागे बनविले जात असत, आता २५० ते ३०० ‘काऊंट’चे, ‘मसलिन’चे धागे हातानं बनविण्यात यश आलं आहे. धाग्याचा ‘काऊंट’ जेवढा जास्त तेवढा तो धागा पातळ! उदाहरणार्थ, ७०० ‘काऊंट’ ‘मसलिन’चा धागा म्हणजे- एक किलो ‘मसलिन’च्या धाग्याची लांबी तब्बल ७०० किलोमीटर इतकी असे... इतका तो धागा पातळ असे. पूर्वी ५०० ‘काऊंट’ ‘मसलिन’च्या एका मोठ्या धोतराची घडी इतकी छोटी होत असे, की ती काडेपेटीत मावत असे म्हणे!

आताची ३०० ‘काऊंट’ प्युअर ‘मसलिन’ची साडी एखाद्या अंगठीतून आरपार जाण्याइतकी तलम असते. जामदानी वर्क केलेली अशी ‘मसलिन’ची साडी आजही पश्चिम बंगालमध्ये काही विणकर बनवत आहेत. पश्चिम बंगालचे विणकर रवीन्द्रनाथ सहा म्हणाले, ‘‘दिवसभर ३ शिफ्टमध्ये तीन विणकरांनी विणकाम केल्यास साडेपाच मीटरची एक प्लेन साडी विणायला २ महिने लागतात आणि त्या साडीवर जामदानी काम असेल, तर त्यावर नक्षीनुसार अजून जास्त कालावधी लागतो!’’ त्यामुळे प्युअर ‘मसलिन’ धागा वापरून हाताने विणलेल्या तलम साड्यांच्या किमतीही जास्त असतात आणि ते योग्यच आहे! तांत्रिकदृष्ट्या १०० ‘काऊंट’च्या पुढच्या साड्यांना ‘मसलिन’ साड्या आणि ८० ते १०० ‘काऊंट’च्या सुती साड्यांना ‘मल कॉटन’च्या साड्या म्हणणं योग्य ठरेल. परंतु, हा फरक फारसा कोणाला माहीत नसल्यामुळे सध्या ‘मसलिन’लाच, ‘मल कॉटन’ म्हणलं जातं!

अशी एखादी प्युअर ‘मसलिन’ची साडी विकत घेणं म्हणजे त्या विणकरांना प्रोत्साहन देण्यासारखं आहे आणि हातानं काम करणाऱ्या त्या विणकरांना प्रोत्साहन मिळालं, तर ही कला पुढे टिकून राहील!

साडीप्रेमाची ‘पोच-पावती’

‘सायली संजीव चांदसरकर’ आपल्याला ‘सायली संजीव’ म्हणून माहीत आहे. ‘काहे दिया परदेस’मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या सायलीला ‘आटपाडी नाईट्स’ या तिच्या पहिल्याच चित्रपटातल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ‘झी गौरव’ पुरस्कार मिळाला. परंतु, ‘पॉलिटिकल सायन्स’चं शिक्षण घेणाऱ्या सायलीनं या क्षेत्रात येण्याचा कधी विचारही केला नव्हता.

सायली लहानपणापासून खूप सुंदर रांगोळ्या आणि चित्रं काढत असे. कॉलेजमध्ये असताना तर ती, पाच-सहा फूट लांब रांगोळी काढत असे. एकदा तिच्या गावी म्हणजे नाशिकला, ‘दीपक मंडळ’ या संस्थेच्या एका कार्यक्रमासाठी तिनं स्टेजवर सगळ्यांसमोर ‘लाइव्ह’ रांगोळी काढली होती. सगळ्यांसमोर धिटाईनं लीलया रांगोळी काढताना बघून संस्थेच्या चालकांनी तिला एका स्पर्धेसाठी एका एकांकिकेतील मुख्य भूमिकेच्या अभिनयासाठी विचारलं. गंमत म्हणून सायलीनं भाग घेतला आणि हिल्याच एकांकिकेसाठी तिला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ आणि ‘सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनया’ची पारितोषिकं मिळाली. परीक्षकांनी तिचं खूप कौतुक केलं आणि म्हणाले, ‘‘तू स्क्रीनवर खूप छान दिसशील, आणि मोठ्या पडद्यावरचा अभिनयसुद्धा तुला उत्तम जमेल, तू ऑडिशन्स द्यायला लाग!’’ मग सायलीनं खरंच ऑडिशन दिली आणि तिला पहिला चित्रपट मिळाला आणि पुढे तिला खूप ऑफर्स येतच राहिल्या.

सध्या सोशल मीडियावरचा सायचा फॅन फॉलोअर अचानक खूप वाढला आहे आणि त्याला कारण आहे तिच्या साड्या नेसलेल्या सुंदर पोस्ट्स! साड्यांमधले अप्रतिम फोटो पोस्ट करणारी सायली म्हणाली, ‘‘मला आधी, साडी हा प्रकार बिलकुल आवडत नव्हता. शाळा कॉलेजमध्ये असताना मी ‘टीचर्स डे’ला आणि ‘साडी डे’ला, ‘साडी’ नेसावी लागू नये म्हणून, ठरवून सुट्टी घेऊन घरी थांबत असे. पण बारावीनंतर मात्र एका फोटो शूटसाठी मला साडी नेसावी लागली. ती ‘मल कॉटन’ची साडी होती, साडी आणि ‘मल कॉटन’ वगैरे प्रकारही मला त्यावेळी नवीन होता. पण फोटो शूट मस्त झालं, आणि मलाच माझे साडीतले फोटो खूप आवडले आणि मी साडीच्या प्रेमात पडले! ‘मल कॉटन’च्या साड्या मला आजही खूप आवडतात. नंतरही मी वेगवेगळ्या भूमिकांसाठी साड्या नेसू लागले. आता तर साडी हा प्रकार इतका आवडतो, की सेटवर जातानाही अगदी सहज म्हणून मी साडी नेसून जात असते!’’ तिचं हे ‘साडी-प्रेम’ आता तिच्या काही ‘साडी-प्रेमी’ चाहत्यांनाही माहीत झालं आहे, त्यामुळे त्या तिला, एखाद्या उत्तम अभिनयाची ‘पोच-पावती’ म्हणून साड्या भेट देत असतात. अशाच तिच्या एका चाहतीनं म्हणजे साक्षीनं तिला एक सुंदर लाल रंगाची, बुट्ट्यांसारख्या टिकल्या लावलेली साडी भेट दिली आणि ती साडी होती सायलीच्या खास आवडीची ‘मल कॉटन’ची!

सायलीचं साडीप्रेम वाढलं ते अजून एका व्यक्तीमुळे! ‘काहे दिया परदेस’च्या चित्रीकरणादरम्यान सायलीची आणि मालिकेत तिच्या आईची भूमिका करणाऱ्या शुभांगीताई गोखले यांची छान गट्टी जमली आणि शुभांगीताई म्हणजे ‘साड्यांचा एनसायक्लोपीडिया’ आहेत! शुभांगीताईंच्या साड्या आणि त्यांना असलेली साड्यांची माहिती ऐकून सायली भारावून जात असे आणि त्यामुळे सायलीची, शुभांगीताईंबरोबरच साड्यांसोबतही छान गट्टी जमली!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.