सौंदर्यखणी : सूक्ष्म छिद्रांची नक्षी शिबोरी!

शिबोरी साडी तयार करण्यासाठी साडीच्या मापाचे, नैसर्गिक धाग्याचे पांढरे कापड वापरले जाते. सिल्क, कॉटन, टसरसारख्या नैसर्गिक धाग्यांच्या कापडावर शिबोरीकाम जास्त प्रभावीपणे साकारता येते.
Pooja Sawant
Pooja SawantSakal
Updated on

शिबोरी हा कलाप्रकार वापरून जपानमध्ये आठव्या शतकापासून ‘शिबोरी’ वस्त्रे तयार होत आली आहेत. ‘शिबोरी’मध्ये ओरिगामीप्रमाणेच, कापडाला विशिष्ट प्रकारच्या घड्या घालून ‘टाय अँड डाय’ पद्धतीने कापडावर नक्षीचे अनेकविध पॅटर्न्स साकारले जातात. ‘टाय अँड डाय’च्या या प्रकारात जेव्हा सुई-दोऱ्याने शिबोरी केली जाते, तेव्हा त्याला ‘निडल-शिबोरी’ म्हणतात. आज आपण याच कलाप्रकाराच्या म्हणजेच ‘निडल-शिबोरी’च्या साड्या कशा तयार होतात हे समजून घेणार आहोत. ‘निडल शिबोरी’ हा कलाप्रकार वापरून राजस्थान आणि गुजरातमधील काही प्रांतांमधून विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून शिबोरी साड्या तयार होत आहेत.

शिबोरी साडी तयार करण्यासाठी साडीच्या मापाचे, नैसर्गिक धाग्याचे पांढरे कापड वापरले जाते. सिल्क, कॉटन, टसरसारख्या नैसर्गिक धाग्यांच्या कापडावर शिबोरीकाम जास्त प्रभावीपणे साकारता येते. या कापडात असलेला ‘स्टार्च’चा अंश जाण्यासाठी आधी हे कापड धुवून घेतले जाते, त्यामुळे हे कापड मऊ पडते. कापड वाळल्यावर त्याला इस्त्री करून घेतली जाते. मग शिबोरी कलाकार, या कापडाला साडीवरील डिझाईननुसार विशिष्ट प्रकारच्या घड्या घालतात आणि त्यातील प्रत्येक घडी पुन्हा इस्त्री करून घेतली जाते. इस्त्री केलेल्या चपट्या घड्यांवर पेन्सिलचा वापर करून हाताने साडीवरची नक्षी काढली जाते. अनुभवी आर्टिस्ट ही नक्षी हाताने काढतात, तर काही कलाकार ट्रेसिंग पेपरचा वापर करून ही नक्षी साडीवर उतरवतात. नक्षी काढून झाल्यावर डिझाईननुसार विशिष्ट घड्यांना एकत्रित पकडून सुई-दोऱ्याचा वापर करून हाताने बारीक टीप घातली जाते. यासाठी वापरला जाणारा दोरा विशिष्ट प्रकारचा असून, ही साडी ‘डाय’ करताना या दोऱ्याने घातलेल्या टिपेच्या आत रंग शिरत नाही. याला ‘रेझिस्ट पेंटिंग’ असेही म्हटले जाते. अलीकडच्या काळात ही बारीक टीप घालण्यासाठी स्टेपलरसारख्या यंत्राचा वापर केला जातो. हे यंत्र हाताने स्टेपलरच्या पिना मारतो तशा पद्धतीने वापरून, काढलेल्या नक्षीवरून अखंड टीप घातली जाते. अशाप्रकारे घड्या घालून टीप मारलेली संपूर्ण साडी तयार करून घेतली जाते आणि हव्या त्या रंगात व्यवस्थित बुडवून डाय केली जाते.

साडीवर एकापेक्षा जास्त रंग असतील, तर साडीच्या ज्या घड्यांवर जो रंग हवा आहे त्या रंगात फक्त त्या ठराविक घड्या अतिशय काळजीपूर्वक डाय करून घेतल्या जातात आणि उरलेल्या घड्या, दुसऱ्या हव्या त्या रंगात डाय करून घेतल्या जातात. विशेषतः इंडिगो, पिंक, पिवळा, हलका ऑरेंज, लाल इत्यादी सुंदर रंग या साड्या डाय करण्यासाठी वापरले जातात. डाय झाल्यावर साडी निथळत ठेवून, बऱ्यापैकी वाळल्यावर त्यातील टीप घातलेले दोरे अलगद काढून टाकले जातात आणि संपूर्ण साडी उघडली जाते. विशिष्ट प्रकारच्या घड्यांमुळे ठराविक नक्षी ठराविक अंतरावर उतरलेली दिसते. साडी डाय करताना, नक्षीवर घातलेल्या बारीक टिपेच्या खाली साडी डाय होत नाही आणि संपूर्ण नक्षी अतिशय सुंदर पांढऱ्या बारीक रेषांनी साकारलेली दिसते. शिवाय बारकाईने निरखून पाहिल्यास सुई दोऱ्याने घातलेल्या ‘टीपे’मुळे नक्षीच्या पांढऱ्या रेषेवर अत्यंत बारीक छिद्रे दिसतात आणि त्या छिद्रांमुळे नक्षीच्या रेषा अजूनच सुंदर दिसतात आणि हीच ओरिजिनल शिबोरीची ओळख आहे.

पूजाचा खास ‘आउटफिट ऑफ द डे!’

कॉलेजमध्ये असताना, सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेणारी पूजा सावंत नृत्यही अतिशय सुंदर करत असे. त्या सौंदर्य स्पर्धांमधून तिला बक्षिसंही मिळत असत आणि त्यातून तिला चित्रपटांच्या ऑफर्सही येऊ लागल्या. २०१० मध्ये ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून तिचं मराठी सिनेसृष्टीत मोठं पदार्पण झालं आणि तिच्या अभिनयामुळे ती मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री बनली. चित्रपटांबरोबरच अनेक रिॲलिटी शोजमधूनही तिची खास अदा प्रेक्षकांना मोहून टाकते. अत्यंत रेखीव चेहऱ्याची पूजा कोणताही पेहराव खूप सुंदर कॅरी करते, त्यात तिचा विशेष आवडता पेहराव म्हणजे साडी!

नुकताच प्रदर्शित झालेल्या, सुभाष घई यांची निर्मिती असलेल्या, ‘विजेता’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटातील कलाकारांना ‘हास्यजत्रा’च्या कार्यक्रमात आमंत्रण होतं. पूजा म्हणाली, ‘‘त्या कार्यक्रमात मी सुभाष घाई आणि सुबोध भावे यांच्यासोबत प्रमुख पाहुणी म्हणून बसणार होते- त्यामुळे मला पारंपरिक; पण हटके असा स्पेशल पेहराव करायचा होता, म्हणून मी, माझी स्टायलिस्ट प्राची खाडेला, त्या कार्यक्रमासाठी माझा पेहराव डिझाईन करायला सांगितला. आम्ही दोघींनी खूप विचार करून शेवटी ‘इंडो वेस्टर्न पॅटर्न’ची एखादी साडीच नेसायची असं ठरवलं.’’

प्राचीला, पूजाच्या स्टायलिंगसाठी ‘ऑफबिट मीडिया’च्या हिरल आणि करिष्मा जैन यांनी सर्व गोष्टी एकत्र करून दिल्या आणि एक मोठी टीम पूजाच्या त्या एका ‘आउटफिट’साठी कामाला लागली. ‘नेची’ नावानं ‘कन्सेप्ट साडी’ डिझाइन करणाऱ्या नेहा आणि रुचिता यांची ऑरेंज-रेड कलरची फ्रील लावलेली प्युअर सिल्कची एक ‘प्री-स्टीच्ड निडल शिबोरी साडी’, ‘ऑफबिट’च्या कलेक्शनमध्ये होती. पूजा ‘हास्यजत्रा’च्या सेटच्या सोफ्यावर मुख्य पाहुणी म्हणून बसणार, तर तिच्या साडीचा फ्लो अतिशय सुंदर दिसावा म्हणून प्राची आणि पूजानं खास फ्रील लावलेली ती शिबोरी साडी त्या कार्यक्रमासाठी निवडली. शिबोरीच्या त्या साडीवर पारंपरिक पद्धतीनं केलेलं डिझाईन पांढऱ्या रंगाचं असल्यामुळे त्यावर पांढऱ्या रंगाचं भरतकाम केलेलं ‘नेची’चं ब्लाउज ‘पेअर’ करण्यात आलं. त्यावर श्रुती आणि निधीनं ‘ब्लिंग गर्लचे’ दिलेले छानसे इअररिंग्ज फारच खुलून दिसत होते. मेकअप आर्टिस्ट वृष्टीनं, शिबोरी साडीला साजेसा असा पूजाचा छानसा मेकअप केला तर रचनानं पूजाच्या केसांचं स्टायलिंग केलं.

हा सगळा साज चढल्यावर पूजा अतिशय सुंदर दिसत होती. पूजाचं शिबोरी साडीतलं ते सौंदर्य मनीष जोगानीनं कॅमेऱ्यामध्ये इतकं सुंदर टिपलं, की पूजा ते फोटो बघून स्वतःच्याच प्रेमात पडली असावी. ‘हास्यजत्रा’च्या त्या सेटवर पूजाची शिबोरी साडी सगळ्यांना खूपच आवडली. त्या सेटवर पूजाचं ते अभूतपूर्व सौदर्य पाहिल्यावर, सुभाष घई तिला म्हणालेदेखील, ‘‘बहुत सुंदर दिख रही हो आप!’’ पूजासाठी ती कॉम्प्लिमेंट खूप मोठी होती. पूजा म्हणाली, ‘‘शूटनिमित्त माझे असंख्य निरनिराळे पेहराव होत असतात, आणि त्या प्रत्येक खास पेहरावासाठी अनेक हात काम करत असतात... पण माझा शिबोरी साडीतला तो पेहराव मला कायमच लक्षात राहील- कारण त्या दिवशी मीच माझ्या ‘आउटफिट ऑफ द डे’च्या प्रेमात होते!’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.