आपल्याला ससा-कासवाची गोष्ट माहीत असते; तीच ज्यात पळण्याची स्पर्धा असते, अन् त्यात सशाऐवजी कासव जिंकतं. आपल्याला कोल्हा-करकोच्याची गोष्ट माहीत असते; तीच ज्यात दोघं एकमेकांना घरी जेवायला बोलावून एकमेकांची फजिती करतात. पण, आपल्याला जी माहीत नसते ती ससा-कोल्ह्याची एक गोष्ट सांगतो! या गोष्टीत सशाचं पळणंही आहे आणि कोल्ह्याचं जेवणंही, पण एकदम वेगळी!
तर, एका संध्याकाळी एका कोल्ह्याला ‘आज डिनरला मस्त ससा खावा’ अशी इच्छा होते. शोधाशोध करायला तो जंगलात फिरायला लागतो अन् थोड्याच वेळात त्याला समोर एक ससा निवांतपणे गवत खात बसलेला दिसतो. कोल्हा दबक्या पावलांनी पुढं जात जात सशावर झडप घालायला जातो, पण त्या सशाला त्याची चाहूल लागते, अन तो टुण्णकन उडी मारून जिवाच्या आकांतानं पळायला लागतो. कोल्हा चमचमीत डिनरच्या आशेनं सशाचा पाठलाग करायला लागतो. ससा जीव वाचावण्यासाठी जोरदार धावायला लागतो. ससा हा कोल्ह्याहून बुटका, दुबळा अन् कमी वेगानं पळू शकणारा प्राणी आहे, हे आपल्याला माहितच आहे. पण तरीही कोल्हा सशाला पकडू शकत नाही. ससा कोल्ह्याच्या तावडीतून निसटून पळून जातो.
हे फक्त या गोष्टीपुरतंच मर्यादित नाही. कोल्हा हा जास्त उंच, बलवान अन् वेगानं धावू शकणारा प्राणी असूनही तो बहुसंख्यवेळा यशस्वी होत नाही. कोल्ह्या-सशाच्या पाठलागात बहुसंख्यवेळा दुबळा दिसणारा ससाच जीव वाचवून निसटून जातो.
याचं कारण अगदी साधं सोपं असतं.
कोल्हा त्याच्या डिनरसाठी, एकवेळच्या जेवणासाठी धावत असतो, तर ससा हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावत असतो. कोल्ह्याला डिनरसाठी ससा नाही मिळाला, तर तो दुसरं काही खाऊ शकणार असतो. किंवा एखादा दिवस काही खाल्लं नाही, तर लगेच मरणार नसतो. मात्र सशासाठी आपला जीव आज गेला तर तो जगाचा अंत असणार असतो.
या गोष्टीचा एक अगदी सरळ दिसणारा निष्कर्ष आहे : जो फक्त एकवेळच्या डिनरसाठी धावत असतो, तो यशस्वी होतोच असं नाही. मात्र, जो जिवाच्या आकांतानं धावत असतो तो यशस्वी व्हायची शक्यता खूप जास्त असते. मला ही गोष्ट खूप पॉवरफुल वाटते. आपण जे काही करतो ते करताना नेहमी विचार करावा, ‘ह्या गोष्टीत आपण ससा आहोत की कोल्हा? आपण फक्त एक-दोन वेळच्या डिनरसाठी राबत आहोत की जिवाच्या आकांतानं काही करत आहोत?’
धावत आपण सगळेच असतो. धावावं आपल्याला सळ्यांनाच लागतं. पण आपली धाव यशस्वी व्हायची असल्यास ती कोल्ह्याची कॅजुअल धाव असावी की सशाची जिवाच्या तगमगीची?
विचार करा!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.