सोशल मीडियावरील  ‘अ’ सोशल ट्रम्प

सोशल मीडियावरील  ‘अ’ सोशल ट्रम्प
Updated on

डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंट ट्‌विटरने बंद केले. फेसबुक आणि इन्स्टाग्रामने ट्रम्प यांचे अकाउंट २४ तासांकरिता निलंबित केले. यू-ट्यूबने ट्रम्प यांना इशारा दिला. स्नॅपचॅटने त्यांचे अकाउंट निलंबित केले. ट्‌विच या ॲमेझॉनच्या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांचे व्हिडिओ बंद करण्यात आले. ट्रम्प यांच्यासाठी ऑनलाइन डोनेशन गोळा करण्याची सेवा देणाऱ्या कंपनीने आपली सेवा थांबवली आहे. रेडिटने आधीच ट्रम्प यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून बाहेर काढले आहे...

ट्रम्प साऱ्या अमेरिकेला नको आहेत, म्हणून ही बंदी लादली जात आहे का?

वरवर पाहता असं दिसतं; प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही. ट्रम्प यांना आता ७,४२,२३,७४४ इतक्‍या अमेरिकी जनतेने मतदान केले आहे. त्यांचे विजयी प्रतिस्पर्धी ज्यो बायडेन यांना ८,१२,८३,४८५ मते मिळाली आहेत. याचा अर्थ, साऱ्या अमेरिकेला ट्रम्प नको आहेत, असं म्हणणं साफ खोटारडेपणाचं आहे.

मग, सोशल मीडिया कंपन्यांना ट्रम्प नको आहेत का?

पुन्हा वरवर पाहता असं दिसतं, की कंपन्यांना काल-परवापर्यंत ट्रम्प प्रिय होते; त्यांचे फॉलोअर्स वाढतील, तशी या कंपन्यांचीही चलती सुरू होती. त्यांना ट्रम्प आता नकोसे झाले आहेत, हे बंदीवरून स्वच्छ दिसतं.

आता मुख्य प्रश्नाकडं वळू. सोशल मीडिया कंपन्यांना; ज्यांना सिलिकॉन व्हॅलीत टेक जायंट्स (टेक्‍नॉलॉजीतल्या बड्या कंपन्या) म्हणतात, ट्रम्प का नकोसे झाले आहेत?

या कंपन्या डेटावर काम करतात. आपल्या प्लॅटफॉर्मवरील सेवा देण्याच्या मोबदल्यात कंपन्या वापरकर्त्यांचा बख्खळ डेटा गोळा करतात. या डेटाचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करतात. उदा. वापरकर्त्यांच्या सवयींची माहिती एखाद्या कंपनीला देऊन त्या कंपनीच्या उत्पादनाची विक्री वाढवतात. त्या बदल्यात कंपनीकडून नफा कमावतात. उत्पादनांची विक्री वाढवत राहणे आणि नफा कमावणे हे सोपे व्यावसायिक उद्दिष्ट असते. ट्रम्प फॉलोअर्स आणत आहेत, तोपर्यंत हे उद्दिष्ट साध्य होत असते. ट्रम्प यांचे फॉलोअर्स रस्तो-रस्ती दंगल घडवायला लागले, अमेरिका बंद पाडायला लागले तर उद्दिष्टालाच धक्का बसतो. आता, ट्रम्पच फॉलोअर्सना दंगा करायला चिथावणी द्यायला लागले, तर मुळ उद्दिष्ट साफ कोसळते.

अशावेळी सोशल मीडिया कंपन्यांना ट्रम्प यांची कर्कश्‍यता आठवते. वर्षानुवर्षे सोशल मीडियावरच पोसलेली चिथावणीखोर भाषा गैर वाटू लागते. ट्रम्प निरर्थक वाटू लागतात आणि त्यांच्यावर बंदी घातली जाते.

खरंतर, ट्रम्प यांना रोखून सोशल मीडिया कंपन्यांना आपली जबाबदारी झटकता येणारच नाही. उलट, या कंपन्यांना सामाजिक स्वास्थ्याची इतकी जाणीव अचानक होण्याचे धोके बंदीतून समोर आले आहेत. सारेच व्यवहार आठ-दहा टेक्‌ जायंट्‌सच्या हाती सोपविले, तर या कंपन्या स्वतःला हवा तोपर्यंत कुणाचाही वापर करू शकतात आणि नंतर बंदी घालू शकतात, असा संदेश ट्रम्प प्रकरणातून जातो आहे. शिवाय, सोशल मीडियावर संघटन करायची आणि रोष व्यक्त करायची सवय लागलेल्या जनतेला व्यक्त होण्याचा दुसरा मार्ग मिळाला नाही, तर अराजकाला निमंत्रण दिल्यासारखे आहे.

ट्रम्प यांच्या ‘राईज अँड फॉल’चा इतका तरी अर्थ आजच्यापुरता निघतो आहे.

सम्राट फडणीस (samrat.phadnis@esakal.com)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.